IND vs ENG, 1st Test Playing XI Prediction: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना २० जूनपासून रंगणार आहे. हेडिंग्लेच्या मैदानावर होणाऱ्या पहिल्या सामन्यासाठी कशी असेल भारतीय संघाची प्लेइंग ११? जाणून घ्या.
भारतीय संघाला गेल्या १८ वर्षांपासून इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. त्यामुळे भारतीय संघासमोर इंग्लंडला हरवण्याचं मोठं आव्हान असणार आहे. मुख्य बाब म्हणजे, इंग्लंड दौरा सुरू होण्यापूर्वीच विराट कोहली आणि रोहित शर्माने कसोटी क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रोहित शर्माच्या जागी कर्णधारपदाची जबाबदारी युवा फलंदाज शुबमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. शुबमन गिलकडे नेतृत्वाचा फार अनुभव नाही. याशिवाय तो पहिल्यांदाच कसोटी संघाचं नेतृत्व करणार आहे. त्यामुळे गिलसाठी इंग्लंडचा पेपर मुळीच सोपा नसेल.
असा असू शकतो फलंदाजी क्रम
इंग्लंडविरूद्ध होणाऱ्या पहिल्या सामन्यात सलामीला फलंदाजी करण्यासाठी यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुलचा प्लेइंग ११ मध्ये समावेश केला जाऊ शकतो. तर अनुभवी फलंदाज करूण नायरला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळू शकते. कर्णधार शुबमन गिल चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो. तर उपकर्णधार ऋषभ पंत पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो.
यासह अभिमन्यू ईश्वरन किंवा साई सुदर्शन पैकी एकाचा प्लेइंग ११ मध्ये समावेश केला जाऊ शकतो. तर रविंद्र जडेजाचा देखील प्लेइंग ११ मध्ये समावेश केला जाऊ शकतो. वेगवान गोलंदाज म्हणून, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा यांना संधी दिली जाऊ शकते. अष्टपैलू खेळाडू म्हणून नितीश कुमार रेड्डी आणि शार्दुल ठाकूरपैकी एकाचा प्लेइंग ११ मध्ये समावेश केला जाऊ शकतो. त्यामुळे कुलदीप यादवला इतक्यात संधी मिळणं कठीण आहे.
इंग्लंड दौऱ्यासाठी असा आहे भारतीय संघ:
शुबमन गिल ( कर्णधार) यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत ( यष्टीरक्षक/ उपकर्णधार), केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, रविंद्र जडेजा, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदिप सिंग, आकाश दीप, कुलदीप यादव</p>
मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी असा आहे इंग्लंडचा संघ:
बेन स्टोक्स (कर्णधार), शोएब बशीर, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्राडन कार्स, सॅम कुक, जॅक क्रॉली, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, ओली पोप,जो रूट, जेमी स्मिथ, जोश टंग, ख्रिस वोक्स.