Reasons Behind Team India Defeat Against South Africa: भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात भारतीय संघाला दारूण पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. या पराभवामुळे भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील अंतिम फेरीत प्रवेश करता आला नव्हता. मायदेशात अजेय राहणाऱ्या भारतीय संघाला आता आणखी एका धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला आहे.

ईडन गार्डन्सवर झालेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी १२४ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव अवघ्या ९३ धावांवर आटोपला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. दरम्यान काय आहेत या पराभवाची प्रमुख कारणं? जाणून घ्या.

१. खेळपट्टी

हा सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्सच्या मैदानावर पार पडला. या मैदानावरील खेळपट्टी पहिल्या दिवशी वेगवान गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरते. त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी फिरकी गोलंदाजांना मदत मिळते. पण या सामन्यात उलट चित्र पाहायला मिळालं. पहिल्याच दिवसापासून फिरकी गोलंदाज फलंदाजांवर भारी पडले. त्यामुळे फलंदाजांना खेळपट्टीवर पुरेसा वेळ घालवता आला नाही. दक्षिण आफ्रिकेकडून २० पैकी १३ विकेट्स या फिरकी गोलंदाजांनी घेतल्या. भारतीय फलंदाज फिरकी गोलंदाजांविरूद्ध खेळताना चांगला खेळ करतात, पण या सामन्यात असं काहीच पाहायला मिळालं नाही. दक्षिण आफ्रिकेच्या फिरकी गोलंदाजांनी मिळालेल्या संधीचा दोन्ही हातांनी स्वीकार केला. तर दुसरीकडे भारतीय फलंदाज आपल्याच जाळ्याच अडकल्याचं दिसून आलं.

२. फलंदाजांचा फ्लॉप शो

या सामन्यातील दोन्ही डावात भारतीय फलंदाजांचा फ्लॉप शो पाहायला मिळाला. मुख्य बाब म्हणजे, मायदेशात खेळून सुद्धा दोन्ही डावात एकाही भारतीय फलंदाजाला अर्धशतकी खेळी करता आली नाही. केएल राहुलने पहिल्या डावात केलेली ३९ धावांची खेळी ही सर्वोत्तम खेळी केली. संपूर्ण सामन्यात एकट्या तेंबा बावुमाने ५० धावांचा पल्ला गाठला. बावुमाने सर्वाधिक ५५ धावांची खेळी केली.

पहिल्या डावात फलंदाजी करताना जैस्वालने १२, केएल राहुलने ३९, वॉशिंग्टन सुंदरने २९, ऋषभ पंतने २७, रवींद्र जडेजाने २७, ध्रुव जुरेलने १४, अक्षर पटेलने १६ धावांची खेळी केली. तर दुसऱ्या डावात फलंदाजी करताना यशस्वी जैस्वाल ०, केएल राहुल १, वॉशिंग्टन सुंदरने ३१, ध्रुव जुरेलने १३, ऋषभ पंतने २, रवींद्र जडेजाने १८, अक्षर पटेलने २६ धावांची खेळी केली.

३. शुबमन गिल बाहेर

शुबमन गिल बाहेर होणं हा भारतीय संघासाठी सर्वात मोठा धक्का होता. शुबमन गिलने चौकार मारल्यानंतर त्याच्या मानेला दुखापत झाली, त्यामुळे त्याला बाहेर व्हावं लागलं. त्यामुळे पहिल्या डावात भारतीय संघाला १० फलंदाजांसह फलंदाजी करावी लागली. त्यानंतर दुसऱ्या डावातही भारतीय संघाला १० फलंदाजांसह फलंदाजी करावी लागली. जर गिल फलंदाजीला आला असता, तर सामन्याचा निकाल वेगळा लागू शकला असता.

४. तेंबा बावुमाची फलंदाजी

तेंबा बावुमा हा या सामन्यातील सर्वात यशस्वी फलंदाज ठरला. ज्या खेळपट्टीवर फलंदाज संघर्ष करताना दिसून येत होते. त्या खेळपट्टीवर तेंबा बावुमाने दमदार कामगिरी केली. पहिल्या डावात तो अवघ्या ३ धावांवर माघारी परतला. पण दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेचा संघ अडचणीत असताना, तेंबा बावुमाने नाबाद ५५ धावांची खेळी केली. सामन्यातील तिसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा संघ ऑलआऊट होण्याच्या उंबरठ्यावर असताना, तेंबा बावुमाने कॉर्बिन बॉशसोबत मिळून महत्वपूर्ण भागीदारी केली.

५. ६ गोलंदाजांना घेऊन उतरले मैदानात

या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेईंग ११ मध्ये ६ गोलंदाज आणि ५ फलंदाजांचा समावेश करण्यात आला होता. गिल बाहेर झाल्यानंतर भारतीय संघाचं टेंशन आणखी वाढलं. कारण भारतीय संघात यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, ध्रुव जुरेल आणि ऋषभ पंत हे ४ मुख्य फलंदाज होते. तर वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल हे अष्टपैलू खेळाडूच्या भूमिकेत होते. त्यामुळे फलंदाजीत भारतीय संघ मागे राहिला.