Gautam Gambhir Statement On Japsrit Bumrah: भारतीय संघ नव्या आव्हानासाठी सज्ज झाला आहे. भारतीय संघ येत्या २० जूनपासून इंग्लंडविरूद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या दौऱ्यावर शुबमन गिल भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसणार आहे. लवकरच भारतीय खेळाडू इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. दरम्यान या दौऱ्यावर जाण्यापूर्वी भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि नवा कर्णधार शुबमन गिलने जसप्रीत बुमराहबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

इंग्लंड दौऱ्याआधी भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. रोहितने निवृत्तीची घोषणा केल्यामुळे कसोटी कर्णधारपदाची जागा रिकामी झाली. ही जागा भरून काढण्यासाठी बीसीसीआयसमोर ऋषभ पंत, केएल राहुल आणि जसप्रीत बुमराह हे ३ पर्याय उपलब्ध होते. जसप्रीत बुमराहला भारतीय कसोटी संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी मिळण्याची दाट शक्यता वर्तविली जात होती. पण, त्याच्या फिटनेसमुळे त्याला ही जबाबदारी देण्यात आलेलं नाही.

रोहित कर्णधार असताना उपकर्णधारपदाची जबाबदारी जसप्रीत बुमराहकडे होती. रोहितच्या अनुपस्थितीत त्याने भारतीय संघाचं नेतृत्व केलं होतं. त्यानंतर अशी चर्चा रंगली होती की, जसप्रीत बुमराह इंग्लंड दौऱ्यावरील पाचही सामन्यांसाठी उपलब्ध नसेल. दरम्यान या दौऱ्यावर तो किती सामने खेळणार, याबाबत गौतम गंभीरने खुलासा केला आहे.

पत्रकार परिषदेत जसप्रीत बुमराहबाबत बोलताना गौतम गंभीर म्हणाला,”बुमराह कोणते ३ कसोटी सामने खेळणार, हे आम्ही अजूनपर्यंत ठरवलेलं नाही. मालिकेची स्थिती पाहून याबाबत निर्णय घेण्यात येईल.” यावरून हे स्पष्ट झालं आहे की, जसप्रीत बुमराह इंग्लंड दौऱ्यावर ३ सामने खेळताना दिसून येऊ शकतो. तर २ सामन्यांसाठी त्याला विश्रांती दिली जाऊ शकते.”

इंग्लंड दौऱ्यावर शुबमन गिलची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. तर उपकर्णधार म्हणून, ऋषभ पंतची निवड केली गेली आहे. वेगवान गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराहसह मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग आणि आकाश दीप यांना संधी दिली गेली आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराह जर संघाचा भाग नसेल, तर वेगवान गोलंदाजीची जबाबदारी मोहम्मद सिराजवर असणार आहे. कारण तो संघातील अनुभवी वेगवान गोलंदाज आहे.

इंग्लंड दौऱ्यासाठी असा आहे भारतीय संघ :

शुबमन गिल ( कर्णधार) यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत ( यष्टीरक्षक/ उपकर्णधार), केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, रविंद्र जडेजा, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदिप सिंग, आकाश दीप, कुलदीप यादव</p>