पीटीआय, नवी दिल्ली
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर कायमच फलंदाजीला बळकटी देण्याचा विचार करत असतात. या पार्श्वभूमीवर संघ व्यवस्थापनासमोर इच्छा असूनही कुलदीप यादवला खेळविण्याचा प्रश्न उपस्थित राहत आहे आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतही तो कायम राहणार असेच काहीसे सध्याचे चित्र आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये ११३ सामन्यांत १८१ बळी मिळविणाऱ्या कुलदीप यादवसाठी गंभीरच्या अशा विचारसरणीमुळे संघात स्थान मिळविणे कठीण झाले आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध संघ निवडताना खेळपट्टीचे स्वरूप हा एकमेव मार्ग असू शकत नाही. येथे खेळपट्टीवर उसळी अधिक असते आणि चेंडू चांगला ‘स्विंग’ही मिळतो. त्यामुळे संघात केवळ अष्टपैलू खेळाडू खेळवणे हा मार्ग होऊ शकत नाही. भारताने नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर हे तीन अष्टपैलू खेळाडू खेळवले. यामध्ये दोन फिरकी गोलंदाज असतील, तर कानपूरच्या खेळपट्टीवर देखील कुलदीपला संधी मिळणे अशक्य असेल असे मानले जात आहे.
भारत गुरुवारी ॲडलेडमध्ये होणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात संघात बदल करण्याची शक्यता कमी आहे. प्रतिस्पर्धी संघाला रोखण्यासाठी हे नियोजन सर्वोत्तम असेल का हा प्रश्न कायम राहणार आहे. अशा नियोजनामुळे कुलदीपला आपल्यामुळेच संघ हरत आहे, अशी भीती वाटू लागेल. कुलदीपसारख्या गुणी खेळाडूसाठी ही गोष्ट गोलंदाजाच्या मनाला दुखावू शकते असे माजी यशस्वी फिरकीपटू अश्विनला वाटते.
वॉशिंग्टनला केवळ फलंदाजी नजरेसमोर ठेवून संघात स्थान मिळत आहे. वॉशिंग्टन हा बळी मिळविणारा नाही, तर फलंदाजी रोखणारा गोलंदाज आहे. वॉशिंग्टन नेहमीच आधी धावा रोखण्याचा विचार करतो आणि नंतर बळी मिळविण्याकडे लक्ष केंद्रित करू शकतो. दुसरीकडे कुलदीप असा मनगटी फिरकी गोलंदाज आहे, की फलंदाज त्याच्यासमोर येण्यास कचरतात. चेंडूची उंची आणि खोलवर टप्पा ही त्याची मुख्य अस्त्रे आहेत. त्यामुळे तो कायमच आक्रमक वाटतो असे क्रिकेट पंडितांचे म्हणणे आहे.
मात्र, छोटी सीमारेषा असलेल्या ॲडलेड मैदानावर कुलदीपला खेळविणे निश्चित आव्हानात्मक असेल. तेथे त्याच्या गोलंदाजीवर सहज हल्ला चढवला जाऊ शकतो. त्यामुळे पुन्हा एकदा कुलदीपला ऑस्ट्रेलियात संधी मिळणार का? हा प्रश्न कायम राहतो.
ऑस्ट्रेलियात संघ निवड निश्चितपणे सोपी नाही. वॉशिंग्टनसारखा मर्यादा असलेला सुरक्षित गोलंदाज हवा की धोका पत्करुन गोलंदाजी करणारा कुलदीप हवा याचा विचार करून गंभीर आणि कर्णधार शुभमन गिल यांना अचूक संघ निवडीचा मार्ग शोधावाच लागेल, असेच सध्याचे चित्र सांगत आहे.
मार्गदर्शक बदलले, तरी मानसिकता कायम
क्रिकेटचे प्रारूप कुठलेही असले, तरी डावखुरा मनगटी फिरकी गोलंदाज कुलदीपची निवड कायमच तो खरंच योग्य आहे का? या प्रश्नातच अडकली. गंभीर आहे म्हणून असे होते अशातला भाग नाही. यापूर्वी रवी शास्त्री आणि राहुल द्रविड असताना देखील कुलदीपला बाहेरच ठेवले जात होते. या वेळी त्यांच्या निर्णयाची केवळ पुनरावृत्ती होत आहे. थोडक्यात काय तर, मार्गदर्शक बदलले तरी संघ व्यवस्थापनाची मानसिकता कायम राहिली आहे.