Yashasvi Jaiswal Century, IND vs WI: टीम इंडियाचा सलामीवीर यशस्वी जैस्वालने पदार्पणाच्या कसोटी सामन्यातच दहशत निर्माण केली. यशस्वीने १४३ धावा केल्या असून अजूनही नाबाद आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी लोक त्याच्याकडून द्विशतकाची वाट पाहत आहेत. डॉमिनिका येथे सुरु असलेल्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताने २ बाद ३१२ धावा केल्या असून १६२ धावांची आघाडी आहे. अशा स्थितीत या कसोटी सामन्यात टीम इंडियाचे पारडे सध्या चांगलेच जड दिसत आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला आणि यशस्वी ड्रेसिंग रूममध्ये परतला तेव्हा त्याचे भव्य स्वागत करण्यात आले. इशान किशन, मोहम्मद सिराज, कॅप्टन रोहित शर्मा आणि इतर सर्व सपोर्ट स्टाफनेही उभे राहून त्याचे अभिनंदन केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात पहिला कसोटी सामना सुरू आहे, तिथे या सामन्यात यशस्वी जैस्वालने अशी छाप सोडली आहे की, सर्वजण त्याच्याबद्दल बोलत आहेत. यासोबतच यशस्वीने पदार्पणाच्या कसोटी सामन्यातच शतक झळकावून दिग्गजांना आपले चाहते बनवले आहे. आता टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममधून या खेळाडूचा एक खास व्हिडीओ समोर आला असून खूप व्हायरल होत आहे.

यशस्वी जैस्वाल नाबाद परतला

यशस्वी जैस्वालला रोखणे वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांसाठी खूप कठीण झाले आहे, जिथे हा फलंदाज सध्या त्यांची खूप धुलाई करत आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत या युवा फलंदाजाने ३५० चेंडूत १४३ धावा केल्या होत्या आणि विराट कोहली त्याच्यासोबत फलंदाजी करत होता. याशिवाय दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर जैस्वालचे ड्रेसिंग रूममध्ये भव्य स्वागत करण्यात आले, ज्याचा व्हिडीओ बीसीसीआयने शेअर केला आहे. व्हिडिओला सोशल मीडियामध्ये चाहत्यांची खूप पसंती मिळत आहे. नाबाद इनिंग खेळल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये पोहोचताच सर्व भारतीय खेळाडू टाळ्या वाजवून युवा फलंदाजाचे स्वागत करताना दिसत आहेत. ड्रेसिंग रुममध्ये पोहोचल्यानंतर जैस्वालला पहिल्यांदा इशान किशनने मिठी मारली.

हेही वाचा: IND vs WI: ना शतक केले ना मोठी खेळी; मग तरीही विराट कोहलीने जल्लोष का केला? पाहा Video

त्याच वेळी, जर सामन्याबद्दल बोलायचे तर, जैस्वालने रोहित (१०३) सोबत पहिल्या विकेटसाठी २२९ धावांची भागीदारी केली, जी आशियाबाहेर भारताची सर्वात मोठी पहिल्या विकेटची भागीदारी आहे. या जोडीने चेतन चौहान आणि सुनील गावसकर यांच्या जोडीला मागे टाकले ज्यांनी ऑगस्ट १९७९ मध्ये ओव्हल येथे इंग्लंडविरुद्ध पहिल्या विकेटसाठी २१३ धावांची भागीदारी केली होती. जैस्वालने आतापर्यंत ३५० चेंडूंचा सामना करताना १४ चौकार मारले आहेत. रोहितच्या २२१ चेंडूंच्या खेळीत १० चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. कोहलीने आतापर्यंत ९६ चेंडूंच्या खेळीत केवळ एक चौकार मारला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yashasvi jaiswal received a warm welcome in the dressing room veterans also stood up to salute avw