त्रिकटू या संज्ञेने आयुर्वेदात ओळखल्या जाणाऱ्या सुंठ, मिरी व पिंपळी यांच्यातील भूक वाढविण्याच्या गुणात मिरी श्रेष्ठ आहे. आयुर्वेदशास्त्राप्रमाणे सर्व रोगांचे मूळ कारण बहुधा अग्निमांद्य हे असते. अग्नीचे बळ वाढविण्याकरिता शेकडो पदार्थ, औषधे वा उपाय आहेत, पण एक-दोन मिरे चावून खाल्ल्याने जे काम लगेच होते ते इतर पदार्थांकडून होत नाही.
पित्तप्रकोपी तीक्ष्णोष्णं रूक्षं दीपनरोचनम्।
रसे पाके च कटुकं कफघ्नं
मरिचं लघु॥
मिरीच्या व्यावहारिक तपशिलात जाण्याअगोदर मिरीचा एक गमतीदार इतिहास व त्याची भारताच्या शोधाकरिता झालेल्या अनमोल मदतीची कथा खूपच वाचनीय, रोचक आहे. प्राचीन काळापासून युरोपात बहुसंख्य जनता मांसाहार करीत आलेली आहे. या मांसाहारात त्यांना मिरी ही ‘मस्ट’ असते. सतराव्या शतकात मध्य आशियात ख्रिश्चन-मुस्लीम धर्मयुद्ध झाले. त्या काळात भारताचा युरोपशी व्यापार ‘खुष्की’च्या मार्गानेच होत असे. हा मार्ग अचानक बंद झाला. ‘आपणास मिरी पुरवणारा हिंदुस्थान हा देश कुठे आहे, हे शोधण्याकरिता कोलंबस समुद्रमार्गाने निघाला. पण तो चुकून अमेरिकेकडे गेला. त्यानंतर इतरांनी ही चूक सुधारून भारत शोधला. असो. अशी ही ‘मिरी शोधार्थ समुद्रसफर’ कथा आहे.
मिरी ही शरीरात खोलवर पोहोचून शरीरातील सर्व वहनसंस्थांना, सर्व धातूच्या प्रमुख अवयवांना उष्णता पुरवते. त्या त्या भागात फाजील कफ साठू देत नाही. शरीरात सार्वदेहिक ऊब देण्याचे काम मिरी करते. त्यामुळे सर्व प्रकारच्या तापात मिरी चूर्ण, पाणी, उकळून काढा, मध किंवा तुळशीच्या रसाबरोबर चाटण, मिरी व तूप अशा विविध प्रकारे मिऱ्याचा वापर होतो. ज्या तापात अरुची, मंद भूक कफ अशी लक्षणे आहेत, तेथे एकमेव मिरी उत्तम काम देईल. आजकाल वाढत चाललेल्या हिवतापावर, थंडी भरून येणाऱ्या तापावर मिरी तुळशीच्या रसाबरोबर दिल्यास तापाला उतार पडतो. भूक सुधारते. रुची येते. आयुर्वेदीय औषधी महासागरात अनेकानेक बल्य औषधे, टॉनिक आहेत. त्यातील वसंत कल्पात लघुमालिनी, मधुमालिनी, सुवर्णमालिनीमध्ये मिरी हे प्रमुख घटकद्रव्य आहे.
अरुची, तोंडाला चिकटा, घशात कफ या विकारांत ओली मिरी व लिंबूरस असे लोणचे वरदान आहे. एक-दोन मिरी लिंबूरसात कुस्करून ते चाटण खाल्ल्याबरोबर दोन घास अन्न जास्त जाते. अंगी लागते. आमाशयांत डब्बपणा होत नाही. ज्यांना एवढ्या-तेवढ्या जास्त जेवणाने अजीर्ण होते त्यांनी भोजनानंतर ताकाबरोबर किंचित मिरी चूर्ण घ्यावे. मलप्रवृत्तीला वेळ लागत असल्यास, घाण वास मारत असल्यास, जंत व कृमी यांची खोड मोडण्याकरिता जेवणात नियमाने मिरपूड वापरावी.
कृश व लहान बालकांकरिता विशेषत: वय तीन ते सात वर्षेपर्यंत मुलांची प्राकृत वा निकोप वाढ होण्याकरिता मिरी व मध असे चाटण नियमित द्याावे. खाल्लेले अंगी लागते. वेळच्या वेळी वजन वाढण्यास सुरुवात होते. सुतासारखे बारीक कृमी, संडासच्या जागेची सूज व त्यामुळे संडासवाटे रक्त पडणे याकरिता मिरी चूर्ण गरम पाणी व तुपाबरोबर द्याावे.
शीतपित्त, अंगावर गांधी उठणे, चकंदळे, खाज या विकारांत बाहेरून लावण्याकरिता तूप व मिरेपूड असे मिश्रण घासून लावावे. तसेच औषध पोटात घ्यावे. सर्दी, कफ, दमा या विकारांत नेमाने मधाबरोबर मिरी चूर्णाचे चाटण घ्यावे. मासिक पाळी साफ होत नसेल, फाजील चरबी वाढली असेल तर मिरीचा काढा किंवा चूर्ण सकाळी रिकाम्यापोटी घ्यावे. दाढदुखी किंवा दातातून पू येणे, घाण वास मारणे या तक्रारींत मिरी उकळून त्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात.
रांजणवाडी या विकारात मिरी उगाळून त्याचे गंध बाहेरून पापणीला लावावे. रांजणवाडीची सूज कमी होते. जुनाट सर्दी, डोकेदुखी, नाक चोंदणे या विकारात प्रथम नाकात तूप सोडावे व त्यानंतर मिरी उकळलेले पाणी सोडावे. नाकाला इजा न होता नाक मोकळे होते.
मिरी ही योगवाही आहेत. मिरी ज्या ज्या पदार्थाबरोबर आपण वापरू त्या त्या पदार्थाचे व स्वत:चे असे दोन्ही प्रकारचे गुण शरीरात खोलवर पोहोचवते. मिरी भेदनाचे, शरीरातील फाजील दोषांचा संचय नाहीसा करण्याचे उत्तम काम करते. स्थूलपणा, फाजील चरबी कमी होण्याकरिता रोजच्या आहारात दोन-तीन मिरी हवीत. उष्ण प्रकृतीच्या व्यक्तींनी मिरी तारतम्याने वापरावी…
संग्रहित लेख, दिनांक 22nd Mar 2025 रोजी प्रकाशित
जंत आणि कृमींची खोड मोडण्यासाठी हे नक्की खा!
मिरी ही शरीरात खोलवर पोहोचून शरीरातील सर्व वहनसंस्थांना, सर्व धातूच्या प्रमुख अवयवांना उष्णता पुरवते. त्या त्या भागात फाजील कफ साठू देत नाही.
Written by वैद्य प. य. वैद्य खडिवाले

First published on: 22-03-2025 at 16:43 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
TOPICSआयुर्वेदिक उपचारAyurvedic Treatmentलोकसत्ता प्रीमियमPremium Loksattaहेल्थHealthहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्थ न्यूजHealth Newsहेल्थ बेनिफीट्सHealth Benefits
मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Black pepper is very useful to tackle whipworms tapeworms roundworms psp