Turmeric side effects on liver: हळद एक असा मसाला आहे, ज्याचा वापर आहारामध्ये तर होतोच पण अनेक आजारांमध्ये उपचार म्हणूनसुद्धा हळदीचा वापर केला जातो. हळदीमध्ये असणारे करक्यूमिन नावाचे तत्व त्याला पिवळा रंग प्रदान करते आणि हेच तत्व हळदीची सगळ्यात मोठी ताकदसुद्धा आहे. हळदीचा वापर आयुर्वेदिक उपचार पद्धतीमध्ये अगदी जुन्या काळापासून केला जात आहे आणि आजसुद्धा भारतातील कित्येक घरांमध्ये विविध उपायांसाठी हळदीचा वापर केला जातो. हळदीचे एवढे सारे लाभ नक्कीच आहेत, पण तुम्हालासुद्धा माहीत आहे की प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात; एक चांगली आणि एक वाईट बाजू! हळदीचीसुद्धा एक वाईट बाजू आहे. तुम्ही एका मर्यादित प्रमाणात उपयोग केला तर नक्कीच हळद ही लाभदायक आहे, पण अति प्रमाणात वापर केला तर त्याचे तोटेसुद्धा तुम्हाला भोगावे लागू शकतातच.
सध्या समोर आलेल्या एका प्रकरणात, अमेरिकेतील एका ५७ वर्षीय महिलेला यकृतातील एंजाइम सामान्य पातळीपेक्षा ७० पट जास्त असल्याने रुग्णालयात दाखल करावे लागले. इन्स्टाग्रामवर एका डॉक्टरने जळजळ आणि सांधेदुखी कमी करण्यासाठी हळदीच्या फायद्यांबद्दल सांगितल्यानंतर मार्चमध्ये तिने दररोज हळदीच्या गोळ्या घेण्यास सुरुवात केली. परंतु, काही आठवड्यांतच तिला पोटदुखी, मळमळ आणि थकवा जाणवत असल्याचे दिसून आले.
एनबीसीच्या एका वृत्तानुसार तिने सांगितले की, दररोज भरपूर पाणी पिऊनही तिच्या लघवीचा रंग गडद होत चालला होता. तिच्या डॉक्टरांनी एनबीसीला सांगितले की, तिचे यकृत पूर्णपणे खराब होण्याच्या काही पावलंच ती दर होती. “जर हळद जास्त प्रमाणात घेतली तर ती यकृतावर परिणाम करू शकते. प्रत्येक व्यक्तीची पचनशक्ती वेगळी असते, काही जण हळद जास्त प्रमाणात शोषून घेतात. म्हणूनच हळदीचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.” फरीदाबाद येथील मरेंगो एशिया हॉस्पिटल्सच्या इन्स्टिट्यूट ऑफ लिव्हर ट्रान्सप्लांट अँड एचपीबी सर्जरीचे प्रोग्राम क्लिनिकल डायरेक्टर डॉ. पुनित सिंगला यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.
सामान्य प्रौढ व्यक्तीसाठी दररोज ५०० ते २००० मिलीग्राम कर्क्युमिन हे पूरक स्वरूपात सुरक्षित आहे. मात्र, डॉक्टरांनी ते लिहून दिल्याशिवाय घेऊ नका. कॅप्सूल स्वरूपात हळदीचे पूरक फक्त कर्क्युमिन अर्क असतात, जे हळदीला त्याचा रंग देणारे संयुग असते, म्हणून यामध्ये कर्क्युमिनचे प्रमाण तुम्हाला हळदीच्या सामान्य सर्व्हिंगमध्ये मिळणाऱ्या प्रमाणापेक्षा खूपच जास्त असते.
सप्लिमेंट्स कुणी घेऊ नये?
फॅटी लिव्हर, अल्कोहोलिक लिव्हरचा त्रास किंवा काही यकृताचे आजार असलेल्यांनी या सप्लिमेंट्स घेऊ नये, अन्यथा त्यांना त्रास होऊ शकतो, हे २०२३ मध्ये झालेल्या अभ्यासात सिद्ध झाले आहे. जर हळद काळी मिरीसोबत घेतली तर ती त्याचे शोषण वाढवते. जर योगायोगाने तुम्ही असे करत असाल तर एकदा तुमच्या यकृताची तपासणी करा. जर तुम्हाला याचे सेवन केल्यानंतर तुमची लघवी पिवळी पडताना दिसली किंवा अशक्तपणा, पोटात जडपणा आणि थकवा जाणवत असेल तर एकदा यकृताच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. आपण आपल्या रोजच्या जेवणात जितकी हळद घालतो ती पुरेशी आहे, जास्त हळदीच्या सेवनाची गरज नाही.
कोणत्या लक्षणांकडे लक्ष द्यावे?
जर हळदीचे जास्त प्रमाणात सेवन केले तर तुमच्या लघवीचा रंग पिवळा होऊ शकतो. तुम्हाला सुस्ती, पोटात जडपणा, अशक्तपणा आणि जठरांच्या समस्या जाणवू शकतात. ही यकृताच्या ताणाची किंवा नुकसानाची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. जर ही लक्षणे आढळली तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि यकृताच्या कार्याची चाचणी घ्यावी.