कोरोनानंतर जगभरात आता H3N2 या व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. यात खोकला, सर्दी, ताप, घसा खवखवणे अशी सामान्य लक्षणं दिसून येत आहेत. भारतात लहान मुलांना या व्हायरसचा सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे. फ्लूसारख्या दिसणाऱ्या लक्षणांमुळे प्रत्येक १० पैकी ६ मुलांना डॉक्टरांकडे जावे लागत आहे. यामुळे भारतात सातत्याने या व्हायरसचे रुग्ण वाढत आहेत. गेल्या आठवड्यात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, पुढच्या महिन्यात H3N2 व्हायरसचे रुग्ण कमी होण्यास सुरुवात होईल, पण याचा लहान मुले आमि वृद्ध व्यक्तींना धोका अधिक आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पाच ते सात दिवस या व्हायरसची लक्षणं दिसून येतात. यात ताप तीन दिवसांत बरा होतो पण खोकला जास्त दिवस राहतो. हा खोकला अनेकांना त्रासदायक ठरू शकतो. परंतु अलीकडे पाच वर्षाखालील मुलांना श्वसनाच्या त्रासामुळे आयसीयमध्ये दाखल करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत पालकांनी या व्हायरसची मुलांमध्ये दिसणारी लक्षणं वेळीच ओळखली पाहिजेत.

H3N2 व्हायरसचा संसर्ग कसा ओळखायचा?

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, खूप ताप, तीव्र अंगदुखी, डोकेदुखी, सर्दी, खोकला, नाकातून पाणी वाहणे आणि श्वसनाचा त्रास ही H3N2 व्हायरसची लक्षणं आहेत. याशिवाय लहान मुलांमध्ये जुलाब, उलट्या आणि जठरासंबंधीत समस्या दिसू शकतात. ताप काही दिवसात कमी होतो पण खोकला वाढतचं जातो, हा संसर्ग ८ ते १० दिवस त्रासदायक असतो.

कोणत्या मुलांना सर्वाधिक धोका?

दमा, लठ्ठपणा, न्यूरोलॉजिकल आणि ह्रदयविकार यांसारखे आजार असलेल्या मुलांना H3N2 व्हायरसचा सर्वाधिक धोका आहे. आत्तापर्यंत या व्हायरसची लागण झालेल्या मुलांचा बरे होण्याचा कालावधी ४ ते ५ दिवसांचा आहे. व्हायरल इन्फेक्शन, कोविड-19, एडेनोव्हायरस किंवा H3N2 व्हायरसचा संसर्ग असो लहान मुले नेहमीच उच्च जोखमीच्या श्रेणीत येतात. याच विशेषत:५ वर्षांखालील ज्या मुलांना दमा, मधुमेह, हृदयविकार आणि ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत आहे, त्या मुलांची पालकांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.

मुलांची काळजी घेण्याची गरज का आहे?

गेल्या काही दिवसांपासून श्वसनाच्या लक्षणांमुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या लहान मुलांची संख्या वाढली आहे. यात संसर्ग तीन दिवसात कमी झाला तरी खोकला आणि ताप कमी होण्याचं नाव घेत नाही. यामुळे H3N2 व्हायरसचा संसर्ग निमोनिया आजाराचे कारण ठरत आहे. यामुळे व्हेंटिलेटर सपोर्ट आणि आयसीयूची गरज लागते.

‘या’ व्हायरसपासून लहान मुलांचा बचाव कसा करायचा?

H3N2 हा व्हायरस एका व्यक्तीच्या तोंडातून आणि नाकातून निघणाऱ्या थेंबातून वेगाने पसरतोय. यामुळे साफसफाई गरजेची आहे. प्रत्येकाने आपल्या संरक्षणासाठी मास्क घातला पाहिजे. हात, पाय स्वच्छ पाण्याने धुवा, सॅनिटायझरचा वापर करा. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा आणि सर्दी, खोकल्यासारखी लक्षणं दिसत असल्यास लोकांपासून सुरक्षित अंतर ठेवा. तसेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health how to spot signs of h3n2 symptoms in kids know preventive measures h3n2 influenza symptoms in kids sjr