-डॉ. किरण नाबर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या लेखात आपण मानेवरील व काखेतील चामखीळांबद्दल माहिती घेतली. आज आपण  विषाणूंच्या संसर्गामुळे होणाऱ्या चामखीळांबद्दल बद्दल माहिती घेणार आहोत. ही चामखीळे थोडी खडबडीत व  खरखरीत असतात. ही अंगावर कुठेही होऊ शकतात. पण जास्त करून ती हातापायावर, चेहरा, नखांजवळ व जननेंद्रियांवर होतात. ज्यांना अशी चामखीळे असतात त्यांच्या संपर्कात आल्यास इतरांनाही ती होऊ शकतात. यांना विषाणूजन्य चामखीळ किंवा Viral Wart  असे म्हणतात.

ही चामखीळे होण्याचे कारण म्हणजे मानवी  पॅपिलोमा विषाणू अर्थात Human Papilloma Virus ( HPV). त्वचेत जर कुठे ओरखडा असेल तर तिथून हा विषाणू त्वचेमध्ये प्रवेश करतो. आधी एक चामखीळ येतं. पण हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे हळूहळू काही आठवडे किंवा काही महिन्यात ते संख्येने वाढून २-४  किंवा ३०-४०  देखील होऊ शकतात. ते किती वाढतील हे त्या व्यक्तीच्या त्या विषाणूविरुद्ध असलेल्या प्रतिकारशक्तीवर अवलंबून असते. लहान मुलांना खेळताना व तरुणांना काम करताना काही लागून तेथे ओरखडा येऊ शकतो व अशा ओरखड्यातून हे विषाणू आत जात असल्यामुळे लहान मुले व तरुणांमध्ये हा आजार जास्त प्रमाणात पाहिला जातो. तरुणांच्या चेहऱ्यावर ती असल्यास दाढी केल्यामुळे ती संख्येने जलद वाढतात. मधुमेही व्यक्ती व गरोदर स्त्रियांमध्ये जर अशी चामखीळे आली तर ती आकाराने व संख्येने जलद वाढू शकतात.

आणखी वचा-Health Special: आरोग्यपूरक गोळ्या – कोणी घ्याव्यात? किती घ्याव्यात?

चामखीळांचे काय प्रकार आहेत?

हातापायांवरील चामखीळे:  या चामखीळांना  सामान्य चामखीळ ( Common warts or  verruca vulgaris)  असेही म्हणतात.  ही चामखीळे जास्त करून हातापायांना येतात. पण कधी कधी छाती, पोट व  पाठ येथेही अशी चामखीळे  येऊ शकतात.

चपटी चामखीळे ( Flat warts) : ही जास्त करून चेहऱ्यावर पाहावयास मिळतात. दाढीमध्ये, गालावर व कपाळावर अशी चपटी चामखीळे दिसतात.

नखाखालील व नखाभोवतीची चामखीळे ( Subungual and periungual warts ) : ही चामखिळे नखांखाली  व नखांभोवती  होतात.

जननेंद्रियांवरील चामखीळे ( Venereal warts ) : ही चामखिळे पुरुष व स्त्रीच्या जननेंद्रियांवर होतात व तो लैंगिक संबंधामुळे होणाऱ्या आजारांपैकी एक आजार असतो. ज्या व्यक्तीच्या जननेंद्रियांवर चामखीळे आहेत अशा व्यक्तीशी लैंगिक संबंध ठेवल्यावर दुसऱ्या व्यक्तीस ही चामखीळे होऊ शकतात.

तळहात व तळपायांवर होणारी चामखीळे ( Palmoplantar warts ) : ही चामखीळे जास्त करून तळपायांवर व कधीकधी तळहातांवर होतात. तळपायांची चामखीळे फार दुखतात.

ही चामखीळे कशी पसरतात?

त्वचेवर जिथे कुठे ओरखडा असेल त्यामधून हा विषाणू त्वचेत प्रवेश करतो. हा विषाणू बऱ्यापैकी संसर्गजन्य आहे. त्यामुळे घरात जर एखाद्याला चामखीळ झाले असेल तर दुसऱ्याला देखील होण्याची शक्यता बऱ्यापैकी असते. चामखीळे प्रत्यक्ष स्पर्शामुळे होऊ शकतात. तसेच विषाणूने दूषित झालेल्या  वस्तूला स्पर्श केल्यामुळे देखील होऊ शकतात. उदाहरणार्थ नॅपकिन, टॉवेल, रुमाल, कंगवा, दरवाज्याच्या कड्या, नळ वगैरे वस्तू. जननेंद्रियांवरील चामखीळे ही आधी उल्लेख केल्याप्रमाणे लैंगिक संबंधांमुळे होतात. विषाणूने दूषित  झालेल्या रेझरने  दाढी केल्यामुळे चेहऱ्यावरील चपटी चामखीळ होतात. घरात एखाद्याला तळपायावरील चामखीळे असल्यास त्याचे विषाणू हे अशा व्यक्तीच्या  घरी घालण्याच्या स्लीपर  किंवा घरातील जमिनीवर पडतात. त्यामुळे घरातील दुसऱ्या व्यक्तीलाही तळपायाला अशी चामखिळे  होऊ शकतात. ज्यांना  नखांच्या आसपासचा भाग चावण्याची सवय आहे किंवा जे मातीमध्ये काम करतात त्यांना नखांखालील  व नखांभोवतालची  चामखीळे होण्याची शक्यता जास्त असते.

आणखी वाचा-Health Special: मानेवर चामखीळ कशामुळे येतात?

या  चामखीळांची लक्षणे काय? 

आपण मागच्या लेखात पाहिलं होतं की मानेवरची व काखेतली चामखीळे ही नरम व बहुधा  देठवाली असतात.  पण ही विषाणूजन्य चामखीळे त्यापेक्षा वेगळी दिसतात. यांचा आकार एक मिलिमीटर पासून ते थेट दहा-बारा मिलिमीटर एवढा देखील असतो. ही घूमटाकार आकाराची असतात. ही चामखीळे नरम नसून थोडी घट्ट असतात व यांचा पृष्ठभाग हा कॉलीफ्लॉवर सारखा  खरखरीत व खडबडीत असतो. ही एकतर त्वचेच्या रंगाची , राखाडी रंगाची , तपकिरी रंगाची किंवा काळपट असतात.आधी एक चामखीळ येते व नंतर त्याच्या आजूबाजूला  हळूहळू आणखी चामखीळे येतात. दाढीमधील चामखीळे ही बहुधा चपटी चामखिळे असतात. पण कधी कधी  घुमटाकार सामान्य चामखिळे  देखील असतात. चपटी चामखिळे असल्यास दाढी केल्यामुळे ती पटकन वाढतात. तळपायावर येणारी चामखीळे ही कधी एक दोन असतात. तर कधी बाजू बाजूला वाढून दहा-पंधरा देखील येऊ शकतात. चालताना या चामखीळांवर दाब आल्यास ती फार दुखतात व त्यामुळे कित्येकांना ही चामखीळे म्हणजे पायाला आलेली भोवरी आहे असे वाटते. 

या चामखीळांवर उपाय काय?

या चामखीळांना कारणीभूत असणाऱ्या विषाणूविरुद्ध आपली प्रतिकारशक्ती सुधारली तर ही चामखिळे आपोआपही निघून जातात किंवा नवीन नवीन चामखीळे येणे तरी थांबते . त्यासाठी रोज एअरोबिक व्यायाम करणे,  तसेच  सकस व संतुलित आहार घेणे  आवश्यक आहे. रोज ध्यानस्थ बसून स्वतःच्या मनाला ही चामखीळे जाण्याबद्दल सकारात्मक स्वयं-सूचना दिल्यास काही जणांना याचा फायदा होऊ शकतो. जननेंद्रियांवर होणारी चामखीळे टाळण्यासाठी विवाहपूर्व किंवा विवाहबाह्य लैंगिक संबंध ठेवल्यास निरोध वापरणे आवश्यक आहे. ज्या व्यक्तीच्या नखाजवळ चामखीळे आहेत अशा व्यक्तीने तोंडात, नाकात किंवा कानात ते बोट घालणे  टाळावे. नाहीतर तिथेही चामखीळे होऊ शकतात.

बहुतेक वेळा ही चामखीळे संख्येने हळूहळू वाढत जातात. ती दिसण्यास कुरूप दिसतात.  दाढीमध्ये चामखीळे आल्यास दाढी करताना ती कापली जाऊन रक्त येऊ शकते व काही चामखीळे विशेष करून तळपायाला येणारी चामखीळे  दुखतात. त्यामुळे चामखीळांवर उपचार करण्याची गरज असते. चामखीळांवर उपचार करण्यासाठी त्वचारोग तज्ञांचा सल्ला घ्यावा. चामखीळे थोडी असल्यास किंवा तळपायावर चामखीळ असल्यास त्वचारोग तज्ञ त्यावर घरी लावण्यासाठी म्हणून एक प्रकारचे मध्यम तीव्र आम्ल किंवा भोवरीच्या पट्टीची शिफारस करतात. पण त्यानंतर तेथील मृत झालेली त्वचा  सर्जिकल ब्लेडने काढून घेण्यासाठी आठवड्यातून एकदा असे काही आठवडे त्वचारोगतज्ञाकडे जावे लागते. 

आणखी वाचा-Health Special : पेन बिहेवियर म्हणजे काय?

आणखी एका  उपचारामध्ये अती थंड अशा द्रवरूप नत्रवायूचा ( Liquid Nitrogen ) फवारा थेट चामखीळावर मारून चामखीळे नष्ट केली जातात. याला क्रायोथेरेपी असेही म्हणतात. हा वायू  उणे १९२  डिग्री सेंटीग्रेड एवढा थंड असतो. एवढ्या थंडाव्यामुळे तिथे  भाजल्यासारखा फोड येतो व त्यामध्ये तो चामखीळही निघून जातो. एखाद दुसरे चामखीळ असल्यास त्वचारोगतज्ञ ते चामखीळ तो भाग इंजेक्शनने सुन्न करून व इलेक्ट्रोकॉटरीचा उपयोग करून  काढतात.  पण हीच चामखीळे जर भरपूर असतील तर मग त्या व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काही विशिष्ट विटामिन्सच्या,  झिंकच्या  तसेच अ जीवनसत्वाच्या गोळ्या  दिल्या जातात. 

हल्ली तर काही विशिष्ट इंजेक्शने (  काही लशी किंवा ड जीवनसत्वाचे इंजेक्शन )  एखाद दुसऱ्या चामखीळामध्ये 15 दिवसाच्या अंतराने काही वेळा मारली जातात. त्यामुळे ती चामखिळे थोडी सुजतात व लाल होतात. त्यावेळी तिथे आपल्या शरीरातील पांढऱ्या पेशी जास्त प्रमाणात जमा होतात व त्यामुळे त्या विषाणूविरुद्धची आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढते व इतर चामखीळे देखील त्यामुळे नष्ट होतात. आणखी एका उपचार पद्धतीमध्ये एखादे चामखीळ काढून त्याचा लगदा करून तो त्वचेला छोटा छेद घेऊन त्वचेखाली ठेवला जातो. जेणेकरून  त्या विषाणूविरुद्धची त्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती वाढते व काही आठवड्यात बाकी सर्व चामखीळे नष्ट होतात. 

आणखी वाचा-Foxtail Millet : मधुमेह ते कोलेस्ट्रॉल सर्वांवर गुणकारी ‘बाजरी’! पाहा डॉक्टरांनी सांगितलेले फायदे… 

विषाणूजन्य चामखीळांमुळे काही गुंतागुंत होऊ शकते का?

ज्या व्यक्तींना पूर्वी मानवी पॅपिलोमा  विषाणूंचा संपर्क होऊन जननेंद्रियांवर किंवा  गुदद्वाराजवळ  किंवा घशात  चामखीळे  आली असतील त्यापैकी काहींना भविष्यामध्ये कर्करोगाचा धोका उद्भवतो.  पुरुषांना जननेंद्रियांचा कर्करोग तर स्त्रियांना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याची शक्यता असते. तसेच पुरुष किंवा स्त्रियांना गुदद्वाराचा ( anus ), गुदाशयाचा ( rectum )  किंवा घशाचा ( oropharynx )  कर्करोग होण्याची शक्यता असते. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी मुलींना वयाच्या दहाव्या वर्षापासून ४५ वर्षांपर्यंत मानवी पॅपिलोमा विषाणूची लस  देणे आवश्यक आहे  याची पालकांनी नोंद घ्यावी. ही लस एकदा दिल्यानंतर परत दुसऱ्या व सहाव्या महिन्यात घ्यावी लागते. पण वैवाहिक जीवन व लैंगिक संबंध सुरु होण्यापूर्वी ही लस घेऊन पूर्ण करणे अधिक फायदेशीर असते. मानेवर किंवा काखेमध्ये येणारी नरम व देठयुक्त चामखीळे ही तशी निरूपद्रवी असतात. पण विषाणूंमुळे होणारी चामखीळे मात्र पुढे वाढत जाऊ शकतात व अशा चामखीळांमुळे भविष्यात गुंतागुंत होऊ शकते. त्यामुळे या चामखीळांवर वेळीच उपचार करून घेणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How are warts spread and what are the symptoms hldc mrj