नेहमी ताठ बसावं! वाकून बसू नये ! अशा सूचना आपण लहानपणापासून ऐकत आलोय. पण खरंच, केवळ सरळ बसणं म्हणजेच चांगलं पोश्चर आहे का? बऱ्याच वेळा बैठे काम करणारे रुग्ण आम्हाला सांगतात की आम्ही जाणीवपूर्वक पाठीचा कणा सरळ ठेवून बसतो, पण तरीही आम्हाला मानदुखी, खांद्याला ताण, आणि कधी-कधी हाताला सुन्नपणा जाणवतो, योगा केला, खुर्ची बदलली, पण त्रास कमी होत नाही.
पोश्चरल हॅबिट्स म्हणजे नक्की काय?
‘पोश्चरल हॅबिट्स’ म्हणजे केवळ आपण कसे बसतो किंवा उभे राहतो हे नव्हे, तर शरीराची संपूर्ण रचना, चालताना, वाकताना, उठताना, झोपताना आपण शरीर कसं वापरतो, या सगळ्या सवयींचा समावेश पोश्चरल हॅबिट्समध्ये होतो. आपल्या शरीराला कार्यक्षम स्नायू, हालचालीचं योग्य नियोजन, आणि मेंदू-स्नायू यांचा समन्वय (न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन) या तिन्ही गोष्टींची आवश्यकता असते, तेव्हाच या ‘पोश्चरल हॅबिट्स’ योग्य आणि आरोग्यदायी असतात.
अयोग्य पोश्चरल हॅबिट्स : लक्षणं काय असतात?
बऱ्याच व्यक्तींना अयोग्य पोश्चर असून देखील कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही, म्हणून त्याकडे लक्ष दिलं जात नाही. पण इथे हे लक्षात घ्यायला हवं की अयोग्य पोश्चरमुळे वेदना जरी झाल्या नाही तरीही स्नायूंच्या आरोग्यावर त्याचा दीर्घकालीन परिणाम होतो. प्रत्येक वेळी अयोग्य पोश्चरचे संकेत शरीर वेदनेतूनच देईल अस नाही. खालील दिलेल्या पैकी एक किंवा अनेक लक्षणे सतत जाणवत असतील तर आपल्या हालचालींकडे, सवयींकडे लक्ष द्यायला हवं
-मान, खांदे, पाठ, कंबर किंवा गुडघ्याला सतत ताण जाणवणं
-झोपेतून उठल्यावर शरीर अखडल्यासारखं वाटणं किंवा मान, पाठ या ठिकाणी वेदना जाणवणं
-वारंवार डोकेदुखी किंवा थकवा
-हात किंवा पायात सुन्नपणा, मुंग्या येणं
-वजन उचलताना अडचणी येणं.
अयोग्य पोश्चरल हॅबिट्स कोणत्या?
मान पुढे करून स्क्रीन्स बघणं : यामुळे मान आणि डोकं नकळत फॉरवर्ड हेड पोश्चर मध्ये जातात.
मान खाली झुकवून मोबाईल फोन बघणं : यामुळे डोक्याचं वाढलेलं वजन मानेच्या मणक्यांवर येतं
चालताना सतत एकाच हातात वजन उचलणं: यामुळे पाठीच्या आणि पोटाच्या स्नायूंवर वर एकाच बाजूने भार येतो आणि त्यांचा समन्वय बिघडतो.
पाठीवरची बॅग २ दोन्ही खांद्यांना न अडकवता एकाच खांद्याला अडकवणं
झोपताना खूप जाड किंवा खूप पातळ उशी घेणं
सतत कंबरेतून वाकून बसणं किंवा अती ताठ बसणं
खूप वेळ एका जागी बसून राहणं
योग्य पोश्चरल हॅबिट्स साठी काय गरजेचं?
- स्नायूंची ताकद आणि लवचिकता (स्ट्रेंथ आणि फ्लेक्सिबिलिटी)
शरीरातील मोठे स्नायू मुख्यत्वे पाठ, कंबर, पोटाचे, आणि पायाचे स्नायू जर मजबूत असतील तर ते शरीराला आधार देतात. - सांध्यांची योग्य हालचाल (जॉइंट मोबिलिटी)
मान, खांदे, कंबर, गुडघे : यांची दररोज योग्य प्रमाणात हालचाल गरजेची असते. ती झाली नाही तर हे सांधे आखडून जातात. - सवयींबद्दल आणि हालचालींबद्दल जागरुकता : आपण बसताना, चालताना, काम करताना शरीराच्या नक्की कोणत्या भागांवर ताण येतो याबद्दल जागरूक असणं
- शरीराचा समतोल आणि जागरूकता (प्रोप्रिओसेप्शन): आपण शरीर कसं हलवत आहोत याची संवेदना मेंदूपर्यंत पोहोचणं महत्त्वाचं असतं. यासाठी जॉइंट प्रोप्रिओसेप्शन वाढवणारे व्यायाम करावे लागतात.
फिजिओथेरपीतून उपचार
पोस्चर अॅनालिसिस : फिजिओथेरेपिस्ट डॉक्टर प्रत्येक रुग्णाच्या पोश्चरल हॅबिट्सचा बारकाईने अभ्यास करून त्यात योग्य ते बदल सुचवतात
स्नायूंचे व्यायाम: विशिष्ट स्नायूंची कार्यक्षमता वाढवणारे आणि विशिष्ट स्नायूंचा लवचिकपणा वाढवणारे व्यायाम सांगितले जातात.
न्यूरो-मस्क्युलर ट्रेनिंग : मेंदू आणि स्नायूंचा समन्वय सुधारण्यासाठी व्यायाम
प्रोप्रिओसेप्शन ट्रेनिंग: संतुलन आणि हालचाली सुधारण्यासाठीचे व्यायाम
चांगलं पोश्चर हे ‘सरळ बसणं’ याहून अधिक आहे, ते आपल्या संपूर्ण शरीराच्या काम करण्याच्या पद्धतीवर अवलंबून असतं. रोजच्या सवयींमधे जाणीवपूर्वक बदल केले, सजगपणे हालचाली केल्या आणि तज्ज्ञ मार्गदर्शन घेतल्यास, पोश्चरल पेन पूर्णपणे बरा होतो.