दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लोकप्रिय कन्नड अभिनेता आणि डान्स कर्नाटक डान्सचा परिक्षक विजय राघवेंद्रच्या पत्नीचे निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने तिचे निधन झाले. स्पंदनाने छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती आणि त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र तिचा मृत्यू झाला. यावेळी कुटुंबाने दावा केला की, तिचा रक्तदाब खूपच कमी झाल्यामुळे तिला हृदयविकाराचा झटका आला होता. तरीही आजकाल ४५ पेक्षा कमी वयाच्या मध्यमवयीन महिलांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढला आहे हे नाकारून चालत नाही. महिलांच्या मृत्यूसाठी हृदयविकार सर्वाधिक कारणीभूत आहे, हे किती जणांना माहीत आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांना हृदयाच्या रक्तवाहिनीचा आजार १० वर्षे उशिरा होतो; पण त्याचे स्वरूप अधिक गंभीर असते. हृदयविकाराचा झटका आलेल्या अनेक महिलांना याबाबत माहितीच नसते.

भारतातील महिलांचे सरासरी आयुर्मान ७० वर्षांचे असल्यामुळे वयाच्या पन्नाशीनंतर महिलांनासुद्धा पुरुषांइतकाच हृदयविकाराचा धोका असतो. दर चारपैंकी एका महिलेला एखादा हृदयविकार जडला असल्याचे अनेक अभ्यासांती आढळून आले आहे. हृदयरोग सल्लागार, डॉ सुनील द्विवेदी यांच्या मते, धुम्रपान, चुकीची जीवनशैली यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो, त्यामुळे याकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

४५ वयानंतर स्त्रियांना अधिक धोका

हृदयाची पंपिंग क्षमता कमी होणे म्हणजे पर्यायाने हृदयाचे स्नायू कमकुवत होऊन, ते कमकुवत होते. यालाच ‘डायलेटेड कार्डिओमायोपॅथी’ असे म्हणतात. ५५ वर्षांच्या वयानंतर स्त्रीला हा आजार होण्याचा धोका पाच पटींनी वाढतो. त्याचे कारण असे की, एखाद्या स्त्रीवर अचानक भावनिक व शारीरिक अशा दोन्ही पद्धतींचा तीव्र ताण येतो. त्यामुळे तिच्या हृदयाचे स्नायू वेगाने कमकुवत होऊ शकतात. रुग्णाच्या मनावर त्याचा परिणाम होतो. अत्यंत आश्चर्यकारक, गंभीर घटना किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीसंदर्भात वाईट बातमी ऐकून धक्का बसणे. बहुतांशी रुग्णांना याची जाणीव नसते की, त्यांना तणावपूर्ण घटना आतून खात आहेत. ३० टक्के रुग्णांना यासंबंधीची लक्षणे कळत नाहीत. डॉ द्विवेदी म्हणतात की, कधी कधी शारीरिक आजार, शरीरातील तीव्र रक्तस्राव, रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होणे यामुळेही तणाव निर्माण होऊ शकतो.

रजोनिवृत्तीनंतर धोका अधिक

रजोनिवृत्तीनंतर महिलांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. रजोनिवृत्तीची प्रक्रिया साधारण ४५-५० वयादरम्यान सुरू होते. या कालावधीत महिलांच्या शरीरातील एस्ट्रोजेन या संप्रेरकाची पातळी कमी होते. त्यामुळे हृदयविकार होण्याची शक्यता वाढते. रजोनिवृत्तीनंतर एलडीएल किंवा अपायकारक कोलेस्टेरॉल स्रवल्यामुळे उपकारक कोलेस्टरॉलचे प्रमाण कमी होऊन अपायकारक कोलेस्टरॉलचे प्रमाण वाढते. परिणामत: हृदयविकार होण्याची शक्यता वाढते. याचे स्पष्टीकरण देताना डॉ. द्विवेदी म्हणतात, “जेव्हा हृदयाला ताण जाणवतो, तेव्हा रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि हृदयाला होणाऱ्या रक्तप्रवाहात अडथळा येतो. सेवानिवृत्त झालेल्या महिलांमध्ये याचा धोका अधिक असतो. मात्र, ही स्थिती पूर्णपणे पूर्ववत होऊन, रुग्ण सहजपणे बरा होऊ शकतो. त्यामुळे या वयोगटातील महिलांनी तणावपूर्ण परिस्थितीत छातीत दुखणे किंवा श्वास लागणे याकडे लक्ष द्यावे आणि आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी वैद्यकीय सल्ला घ्यावा.”

हेही वाचा – Gas And Acidity: जेवल्यानंतर गॅस आणि अपचन होईल दूर; ट्राय करा ‘ही’ सोपी योगासने

मध्यमवयीन महिलांमध्ये अचानक हृदयविकाराचा झटका येण्यास कारणीभूत ठरणारा घटक म्हणजे महाधमनी विच्छेदन. महाधमनी विच्छेदन ही एक जीवघेणी स्थिती आहे; ज्यामध्ये शरीरातील हृदयातून रक्त वाहून नेणारी मुख्य धमनी (महाधमनी) आतील थरामध्ये फाटलेली असते. हे हृदयाच्या रक्तवाहिनीची झीज झाल्यामुळे घडते. या कारणास्तव उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल किंवा मधुमेह यांसारखे आजार नसले तरीही ४० वा ५० वर्षांच्या स्त्रियांना या जीवघेण्या स्थितीचा त्रास होऊ शकतो.

हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथी –

“हा एक आनुवंशिक आजार असून, तो हृदयाच्या स्नायूंशी संबंधित आहे. या आजारात थकवा, चक्कर येणे, छातीत दुखणे, श्वास न लागणे व पाय सुजणे ही लक्षणे दिसून येतात. दीर्घकालीन उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, अल्कोहोलचा दीर्घ काळ गैरवापर, मधुमेह, थायरॉईड किंवा शरीरातील अतिरिक्त लोह यांमुळे असे होऊ शकते,” असे डॉ. द्विवेदी सांगतात. शरीरातील क्षार विशेषत: पोटॅशियम व मॅग्नेशियम कमी झाल्यावर हृदयविकाराचा झटका येऊ शकतो असेदेखील डॉक्टरांचे म्हणणे आहे.

लक्षणांकडे फारसं लक्ष न देणं

महिला आराम करीत असताना किंवा निद्रावस्थेतही ही स्थिती उदभवू शकते. बहुतांशी महिला हृदयाला नुकसान झाल्यानंतरच हॉस्पिटलमध्ये दाखल होतात. कारण- ही लक्षणे बहुधा हृदयविकाराच्या झटक्याशी जोडली गेलेली नसतात किंवा कदाचित महिलांनी त्या लक्षणांना फारसे महत्त्व दिलेले नसते. हृदयविकाराशी जोडल्या गेलेल्या तीव्र वेदनेऐवजी ही लक्षणे अत्यंत सपक असू शकतात. “बर्‍याच स्त्रियांना छातीत वेदना होत नाहीत; ज्यामुळे लवकर निदान आणि उपचार करणे कठीण होते. अनेकदा घरगुती वा नोकरी-व्यावसायिक जबाबदाऱ्यांमुळे स्त्रिया त्यांच्या स्वतःच्या आरोग्याकडे अथवा त्रासदायक असलेल्या सौम्य लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. मात्र, त्यांनी असे दुर्लक्ष न करता वेळीच हृदयविकाराचा धोका ओळखून, त्यानुसार तपासणी केली पाहिजे, असा सल्ला कार्डिओलॉजिस्ट डॉ. संजीव गेरा देतात.

हेही वाचा – बाळाला आईचे दूध का नाकारता? वर्किंग वूमन असलात तरी बाळाला बाटलीने दूध देणे थांबवा; वाचा डॉक्टर काय सांगतायत….

छातीत दुखणे किंवा जळजळ होणे, एक किंवा दोन्ही हात किंवा डावा खांदा, घसा किंवा जबडा दुखणे, दम लागणे किंवा घाम येणे, सारखा थकवा येणे यांसारख्या हृदयविकाराच्या लक्षणांकडे स्त्रियांनी दुर्लक्ष करू नये. अनेकदा स्त्रिया हृदय तपासणी करून घेत नाहीत. त्यामुळे खूप उशीर होतो आणि हृदयविकाराच्या झटक्याला सामोरे जाण्याची वेळ येऊन‌ ठेपते.