Parenting Styles Impact : अलीकडे ‘कौन बनेगा करोडपती’ या लोकप्रिय शोमध्ये गुजरातमधील एका लहान मुलाने सहभाग घेतला अन् सोशल मीडियावर तो चर्चेत आला. दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याशी संवाद साधताना पाचवीत शिकणाऱ्या या मुलाच्या वर्तणुकीमुळे ही चर्चा सुरू झाली. काहींनी त्या मुलाची बोलण्याची शैली आत्मविश्वासपूर्ण होती, असे मानले. तर, काहींनी ती बेशिस्त किंवा उद्धट होती, असे मानले. सोशल मीडियावर या मुलावर आणि त्याच्या पालकांवर टीका करण्यात आली. दरम्यान, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी काही क्षणांच्या टेलिव्हिजन क्लिपवरून पालकांच्या ‘पालकत्व शैली’वर प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली. या पार्श्वभूमीवर, मुलांच्या आत्मविश्वासूपणे बोलण्याला उद्धटपणा समजला जातो का? किंवा काही मुलं अशी उद्धटपणे का वागतात? पालकांनी अशा परिस्थितीमध्ये काय केले पाहिजे? अशा काही प्रश्नांची उत्तरे समजून घेण्यासाठी लोकसत्ताने तज्ज्ञांशी संवाद साधला.

मुलांच्या वर्तनामागील मानसिक आणि कौटुंबिक कारणे समजून घेणे (Understanding the Mental and Family Reasons Behind Children’s Behavior)

मुंबईतील अंधेरी येथील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. रश्मी जोशी-शेट्टी या लोकसत्ताला माहिती देताना सांगतात,”जेव्हा एखादे मूल उद्धटपणे वागते तेव्हा ते तसे का वागते हे समजून घेणे आवश्यक असते. त्यावेळी अशा मुलांची मानसिक स्थिती काय आहे हेदेखील लक्षात घेतले पाहिजे. कोणत्याही मुलांच्या वर्तणुकीमागे अनेक कारणे असतात. त्यांच्या घरातील वातावरण कसे आहे, घरात आई-वडील, आजी-आजोबा कसे वागतात, घरात वाद होतात का? या सर्व गोष्टी मुलांच्या मनावर परिणाम करतात.

पालकांचे एकमत आणि घरातील वातावरणाचे मुलांवर परिणाम (Parental Unity and Home Environment Impact on Children)

आई-वडिलांचे किंवा घरातील लोकांचे एकमत होते का? हेदेखील अत्यंत महत्त्वाचे ठरते. कारण- जेव्हा एखादे मूल चूक करते तेव्हा त्याला जर त्याची आई ती गोष्ट करू नको म्हणून समजावत असेल, तर तेव्हा वडिलांनी आईच्या भूमिकेचे समर्थन केले पाहिजे. पण जर वडीलच “एवढं काही नाही झालंय, करू दे” असे बोलत असतील, तर ते मुलांना त्यांची चूक समजून घेण्याची संधीच देत नाही. तसेच आई आणि वडिलांचे एकमत नसेल, तर मुलांच्या मनातही गोंधळ निर्माण होतो. त्यामुळे त्यांना चूक काय किंवा बरोबर काय हे समजत नाही. मुलांबाबत कोणताही निर्णय घेताना आई-वडिलांसह घरातील सर्वांचे एकमत असले पाहिजे.

घरातील वातावरणाचे मुलांवर परिणाम( Impact Home Environment on Children)

अनेकदा घरातील वातावरणदेखील मुलांच्या मानसिकतेवर परिणाम करते. पालकांमध्ये खूप वाद होत असतील, मतभेद असतील, तर त्याचा परिणाम मुलांच्या मनावर होतो. अनेकदा पालक एकमेकांबद्दल मुलांसमोर बोलतात. त्यामुळे मुलांच्या मनात एकटेपणाची भावना निर्माण होतो. कारण- त्या वागण्यामुळे त्यांच्या मनावर खूप ओझे येते. कारण- त्यांना ती भावनाच माहीत नसते. अशा वेळी त्यांच्या मनात खूप गोंधळ निर्माण होतो. कारण- त्यांच्या मनात तुम्ही त्यांच्यासाठी आदर्श असतात.

शिक्षाऐवजी संवादाचे महत्त्व (Importance of Dialogue Over Punishment )

मुलांची वर्तणूक जेव्हा चुकते तेव्हा त्या क्षणी त्यांना काहीही बोलू नका, रागावू नका, मारू नका; पण नंतर शांतपणे त्यांच्याशी बोला. मुलांमध्ये अशा वेळी काय बोलायचे अशी उत्सुकता निर्माण होते. दुसरे कारण- शिक्षा देणे हा काही पर्याय नाहीये. कारण- असे वागल्याने मुले आणखी चुकीचे वागतात, खोटे वागतात.

पालकांचे नियंत्रण, सहभाग आणि भावनिक संवाद मुलांच्या विकासावर कसा परिणाम करतो (How Parental Control, Involvement, and Emotional Communication Affect Child Development)

अनेकदा काही पालक असतात, जे मुलांना अत्यंत नियंत्रणात ठेवतात, काही पालक मुलांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये सहभागी होतात आणि मुलांसाठी निर्णय घेतात, ज्यामुळे मुलांना स्वत:ला काय बरोबर, काय चूक हे ठरवताच येत नाही. तर काही पालक अत्यंत बिनधास्त असतात, जे मुलांनी काहीही केले तरी काहीच बोलत नाहीत. त्यामुळे त्यांना चूक, काय बरोबर हे कधी कोणी सांगतच नाही. त्यामुळे मुलांच्या घरात काय वातावरण आहे, पालक कसे वागतात हे अत्यंत महत्त्वाचे असते. काही पालक मुलांशी कोणत्याही विषयावर गप्पा मारतात; पण भावनिक संवाद साधत नाहीत. पालक मुलांशी सामान्य ज्ञान, टेक्नॉलॉजी, मनोरंजन अशा विविध विषयांवर बोलतात; पण मुलांना काय वाटते, त्यांचा दिवस कसा गेला? तुला कोणी काय बोलले का? असा भावनिक संवाद साधत नाहीत. आजकालचे पालक स्पर्धेच्या जगात हरवलेले असतात. त्यांना वाटते की, आपल्या मुलांनी नेहमी काहीतरी साध्य केले पाहिजे. ते ध्येय साध्य करण्याच्या नादात पालक मुलांना आयुष्यातील छोट्या-मोठ्या गोष्टी शिकवत नाहीत.

पालकांना दोष न देता मुलांच्या वर्तनामागील कारण समजून घेणे गरजेचे (Understanding the Reasons Behind Children’s Behavior Without Blaming Parents)

असे नाही की, प्रत्येक वेळी पालकच जबाबदार असतात. अनेकदा मुलंदेखील अजिबात ऐकत नाहीत. पालकांनी अनेकदा समजावूनही मुलाचे वागणे बदलत नाही. काही मुले एका जागी शांत बसत नाहीत, ती वर्गात गोंधळ घालतात, काही मुलांचे हस्ताक्षर चांगले नसते, काही मुलं शाळेतील गृहपाठ पूर्ण करीत नाहीत किंवा काही ना काही वस्तू विसरतात तेव्हा पालकांनी १० वेळा सांगितले तरी त्यांना काही मुलांचे वागणे नियंत्रित करता येत नाही. अनेकदा मुलं पटकन कोणालाही काहीही बोलतात किंवा पटकन मारतात तेव्हा पालकांनी अत्यंत काळजीपूर्वक वागले पाहिजे

आवेगपूर्ण किंवा लक्ष विचलित असल्यासारखी वर्तणूक: ADHD ची शक्यता (Impulsive or Distracted Behavior: Possibility of ADHD

काही मुले एखादी गोष्ट बोलताना समोरच्याचे अजिबात ऐकून घेत नाहीत. ते समोरच्याचे बोलणे पूर्ण होण्याआधीच मधे बोलतात. तर, तिथे त्यांची चूक नसते. कारण-तसे ते मुद्दाम करीत नाही. काही मुलांना Attention Deficit Hyperactivity Disorder (ADHD) आजार असू शकतो. याच आजाराचे एक लक्षण म्हणजे विचार न करता, तत्काळ कृती करणे; ज्याला आवेगपूर्ण (impulsive) वर्तणूक म्हणतात. अशी मुले त्यांची बोलण्याची वेळ येईपर्यंत वाट पाहू शकत नाहीत. त्यात त्यांची चूक नाही. कारण- त्यांचा मेंदू त्या पद्धतीने कार्य करतो. अशा परिस्थितीमध्ये पालकांना समुपदेशन केले जाते आणि मुलांना वयानुसार औषधे दिली जातात आणि त्यानंतर त्यांच्या वर्तणुकीमध्ये बदल होतो. पण, त्यासाठी मुलांचा वैद्यकीय इतिहास, वैद्यकीय चाचण्या कराव्या लागतात. त्यानंतर त्यांच्यावर उपचार केले जातात. तसेच मुलांची ADHD संबंधित तपासणी केली जाते.म

मुलांच्या चुका आणि अपयशावर दोष न ठेवता कारण समजून घेणे (Understanding the Reasons Behind Children’s Mistakes Instead of Blaming Them)

त्याबरोबर मुलांमध्ये आणखी काही दोष आहेत का, मुलांना नवीन गोष्टी समजून घेण्यात अडचण येते का, मुलांकडून स्पेलिंग किंवा व्याकरणात चुका होतात का? साधी बेरीज व वजाबाकी करताना त्यांना अडचणी येतात का हे बघितले पाहिजे. मुलांचे हे वर्तन लर्निंग डिसॅबिलिटीजमुळे (Learning Disability) असू शकते, ज्याचे निदान रुग्णालयात चाचणी करून करता येते. पण, मुलांच्या अशा वागण्यासाठी दोष देण्याऐवजी ती अशी का वागत आहेत याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. सहसा पालक असे वागत नाहीत. मुलांकडून अशा चुका झाल्यास ते मुलांचे अपयश म्हणून पाहिले जाते. एखादे मूल चुकीचे वागले, बोलले किंवा एखादी गोष्ट चुकीची केली, तर ती त्याने का केली याचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला जात नाही आणि उलट मुलांनाच दोष दिला जातो. मुलांमधील अशा लक्षणांचे लवकर निदान झाले, तर मुलांना वेळी मदत करता येते.

मुलांवर टीका करण्याऐवजी मुलांचे कौशल्य पहा (Focus on Children’s Skills, Not Social Media Criticism)

एखादे मूल चुकीचे वागत असेल, तर त्याचा अर्थ असा होत नाही की, ते मानसिकदृष्ट्या कमकुवत आहे किंवा त्याला मानसिक आजार आहे; पण कुठेतरी त्या मुलाच्या वागण्यामागे काहीतरी कारण असू शकते हे लक्षात घेतले पाहिजे. पण, सोशल मीडियावर एखादा व्हिडीओ व्हायरल झाला म्हणून एखाद्या मुलाला चूक ठरवण्याची किंवा टीका करण्याची आवश्यकता नाही. आजकाल सोशल मीडियावर प्रत्येक गोष्टीवर प्रत्येकाला आपले मत मांडायचे असते. पण, एखादा व्हिडीओ चर्चेत येतो तेव्हा लोक त्यांच्या मूल्यांनुसार त्या गोष्टीकडे पाहतात. अशा वेळी टीका करण्याऐवजी मुलांची परिस्थिती समजून घेतली पाहिजे. अनेकदा एखाद्या मुलाकडे असलेले ज्ञान, कौशल्य यांचे कौतुक केले गेले पाहिजे. त्यांना कदाचित मदतीची गरज असू शकते हेदेखील लक्षात घेतले पाहिजे.

वर्तन सुधारण्यासाठी सुरुवातीपासून मदत (Early Support for Better Behavior)

त्याशिवाय वेगवेगळ्या कारणामुळे काही मुलांच्या मेंदूला इजा पोहोचलेली असते. अशा वेळी काही मुलांमध्ये खोटे बोलणे, चोरी करणे अशा सवयी दिसतात. जर अशा गोष्टींचे योग्य वेळी निदान करून उपचार केले गेले नाहीत, तर त्यांना समाजात वावरताना टीकेचा सामना करावा लागू शकतो. अनेकदा मुलांमध्ये या गोष्टी जास्त प्रमाणात होऊ लागतात तेव्हा पालक त्याकडे लक्ष देतात; पण तेव्हा परिस्थिती आणखी अवघड झालेली असते. त्या बाबतीत वेळीच त्यावर उपचार केले, तर अशी परिस्थिती टाळता येते.

पहिल्यांदा जेव्हा असे मूल चोरी करते किंवा खोटे बोलते तेव्हा तेदेखील घाबरलेले असते तेव्हा त्याला ओरडण्याऐवजी आधी त्याला जवळ घ्या. त्याला शांत करा आणि मग त्याला समजावून सांगा. त्यामुळे मुलांचा पालकांवर विश्वास निर्माण होतो. त्यामुळे मग पुढच्या वेळी मुलं पालकांना एखादी गोष्ट हवी असेल, तर स्वत:हून मागतात किंवा खोटं बोलत नाहीत.

मुलांबरोबर अगदी सुरुवातीच्या टप्प्यापासून त्यांच्या संवाद कसा आहे हे महत्त्वाचे असते. जर संवाद साधूनही मुले तसेच वागत असतील, तर ते आनुवंशिक असते किंवा त्यांच्यामध्ये तो आजार असू शकतो त्यामुळे Antisocial personality म्हणजेच ’समाजाविरुद्ध वर्तणूक करणारे व्यक्तिमत्त्व’ निर्माण होण्याची शक्यता असते. त्याला सातत्याने समुपदेशन, वैद्यकीय मदतीची आवश्यकता असते.

डॉक्टर जोशी सांगतात, “मुलांच्या वर्तणुकीबाबत अशा अनेक समस्या असतात, ज्या फक्त एक व्हिडीओ पाहून कोणालाही समजू शकत नाहीत. जे कोणी अशा व्हिडीओवर कमेंट करतात, त्यांना एकच विनंती आहे की थोडं शांत राहा, मुलांना त्याच्या आयुष्यातील सर्व पैलूंचा अनुभव घेऊ द्या. तसेच त्यांना काय चुकीचे आहे किंवा काय बरोबर आहे हे समजून घेऊ द्या. प्रत्येक मुलाच्या बाबतीत हे शक्य नसेल, तर तशा मुलांना त्यांच्या पालकांच्या मदतीने किंवा मानसोपचार तज्ज्ञांच्या मदतीने समजून घेऊ द्या.”

पालकांनी काय करायला पाहिजे?

मुलांच्या चुकीच्या वर्तनावर सुरुवातीच्या टप्प्यात समजावणे महत्त्वाचे (important to explain children’s misbehavior at an early stage)

प्रत्येक मुलं हे वेगवगेळ्या पद्धतीने वागते किंवा प्रतिक्रिया देत असते. त्यामुळे सुरुवातीच्या टप्यात जेव्हा मुलं चुकीच्या पद्धतीने वागतात तेव्हा त्यावर पालक कशी काय प्रतिक्रिया देतात हे महत्त्वाचे असते. अनेकदा लहान मुलांचे चुकीचे वागणे हा त्यांचा गोंडसपणा समजला जातो किंवा त्यावर हसून दुर्लक्ष केले जाते; पण तेच वागणे पुढे जाऊन त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे सुरुवातीला जेव्हा मुले अशी वागतात तेव्हा त्यांना समजावणे आवश्यक असते. पालक सुरुवातीलाच मुलांना समजावू शकतात. उदा. “त्यांच्या वागण्यामुळे समोरच्याला वाईट वाटू शकते किंवा तू तुझे मत वेगळ्या पद्धतीने मांडू शकला असतास. तर तुला काय वाटते” या पद्धतीने संवाद साधू शकता. त्यामुळे त्यांच्या वागण्याबाबत ते बरोबर होते की चुकीचे होते हे त्यांना समजते.

मुलांना नकार स्वीकारण्याची सवय लावणे आवश्यक (Teaching Children to Handle ‘No’)

अनेकदा पालक मुलांना हव्या त्या गोष्टी देतात. त्यामुळे त्यांना नकार ऐकण्याची सवयच नसते. मग जेव्हा अचानक त्यांना एखाद्या गोष्टीसाठी नकार मिळतो तेव्हा तो त्यांना पचवता येत नाही. त्यामुळे मुलांना नकार ऐकायची सवय असली पाहिजे. त्यांच्या चुका होतात तेव्हा त्यांना त्यांच्या चुका सांगितल्या पाहिजेत. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या मुलांचे चांगल्या गोष्टींचे कौतुकही केले पाहिजे. म्हणजे त्यांचा पालकांवरील विश्वास वाढतो. पालकांना दोन्ही बाबतीत संतुलन ठेवता आले ,पाहिजे. त्याचबरोबर मुलांना समोरच्याचे ऐकून घेण्याची सवय लावली पाहिजे. मुलांना जसे नकार ऐकण्याची सवय असली पाहिजे तसेच त्यांना कुठे नकार द्यावा याचीदेखील समज असली पाहिजे. कारण- मूल जेव्हा प्रत्येक गोष्टीला होकार देत राहते तेव्हा त्यांचा स्वत:वरील विश्वासदेखील कमी होतो. त्यामुळे गरज असेल तेव्हा मुलांनाही नकारही देता येण्याची मुभा असायला हवी.

रोज संवाद साधल्यास विश्वास आणि समज वाढतो (Daily Communication Builds Trust and Understanding)

मुलांना कुठे होकार द्यायचा किंवा कुठे नाही बोलायचे हे समजण्यासाठी त्यांच्याशी नियमित संवाद साधला गेला पाहिजे. रोजच्या धावपाळीत थोडासा वेळ काढून त्यांच्याशी बोलले पाहिजे, ज्यामुळे त्यांचे कोणीतरी ऐकून घेत आहे, त्यांना समजून घेत आहे ही भावना निर्माण होते. अनेकदा पालकांनी मुलांच्या चुकीच्या गोष्टींवर हसणे किंवा काहीही वागले तरी काहीही न बोलणे किंवा त्यांच्या प्रत्येक गोष्टीला होकार देणे टाळले पाहिजे. मुलांच्या चुका तिथल्या तिथे योग्य रीतीने सांगितल्या पाहिजेत किंवा एक-दोन दिवसांनीत्यांच्याशी शांतपणे संवाद साधून, त्यांना समजावणे आवश्यक असते.

प्रत्येक मुल वेगळा असतो: तुलना टाळा आणि स्वतःला स्वीकारा (Every Child is Unique: Avoid Comparison and Embrace Individuality)

सोशल मीडियावर अनेकदा पालक आणि मुलं व्हिडीओ पोस्ट करतात तेव्हा जसे त्यांचे कौतुक होते तसाच त्यांना टीकेचादेखील सामना करावा लागतो. अनेकदा आसपासची मुले एकमेकांना चिडवतात किंवा नावे ठेवतात. पण, अशा वेळी मुलांना समजावले पाहिजे की, प्रत्येक व्यक्ती ही इतरांपेक्षा वेगळी असते. ते स्वत:ही सर्वांपेक्षा वेगळी व्यक्ती आहे. त्यांना समजेल अशी उदाहरणे देऊन समजावले पाहिजे. जसे की, आकाशात सूर्य आणि चंद्र दोन्ही आहेत; पण दोघांचीही वेगवेगळी ओळख आहे. दोघे एकमेकांपेक्षा खूप वेगळे आहेत. सूर्य जसा आपल्याला प्रकाश देतो, तसेच त्याच्या उष्णतेमुळे आपल्याला चटकेही बसतात. म्हणजेच कोणीही परिपूर्ण नाही. प्रत्येकामध्ये काही ना काही दोष असतात. त्याचप्रमाणे ते स्वत: एक वेगळी व्यक्ती असली तरी त्यांच्यातही काही चांगले गुण आहेत आणि काही वाईट गुण असतात. पण, आपण जसे आहोत तसे आपण स्वत:ला स्वीकारले पाहिजे. मुलांनी जर चांगल्या गोष्टी काय आहेत यावर जर लक्ष दिले, तर त्यांचा आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे पालकांनी त्यांच्या चांगल्या कलागुणांना वाव दिला पाहिजे.

सोशल मीडियावर ट्र्रोलिंगचा मुलांवर कसा परिणाम होतो? (Impact of Social Media Trolling on Children)

सोशल मीडियावरील ट्रोलिंगचा सामना मुलांना करावा लागला, तर त्यांच्यातील आत्मविश्वास कमी होतो. मग अशी परिस्थिती एखाद्यावर मानसिक आघात करणारी ठरू शकते, ज्यामुळे त्यांना वाटते की, काहीतरी चुकत आहे आणि त्यामुळे असे घडते. मग अशी मुले जास्त बोलत नाहीत आणि आपल्या भावना त्यांना आतच कोंडून ठेवण्याची सवय लागते. त्यामुळे ती कायमचा आत्मविश्वास गमावू शकतात. त्यामुळे सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना मुलांच्या मनावर आणि त्यांच्या आयुष्यावर काय परिणाम होईल याची जाण प्रत्येकाने ठेवली पाहिजे.