Squats or walks: तुम्ही कामात कितीही व्यग्र असलात तरीही दीर्घकाळ एकाच जागी बसून राहण्याचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी छोटासा ब्रेक घेणेही महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने आपल्याला अनेकदा शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी कामादरम्यान झटपट चालायला सांगितले जात असते. तज्ज्ञांनी सुचविल्याप्रमाणे आणि स्पोर्ट्समधील ‘स्कँडिनेव्हियन जर्नल ऑफ मेडिसिन अँड सायन्स’मध्ये प्रकाशित झालेल्या एप्रिल २०२४ च्या अभ्यासानुसार, जास्त वेळ एकाच ठिकाणी बसल्यानंतर अनेकदा मधे मधे उठून चालण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, चालण्यापेक्षा स्क्वॅटिंग अधिक प्रभावी ठरू शकते.
मुंबईतील परळ येथील ग्लेनिगल्स हॉस्पिटलचे ऑर्थोपेडिक्स व वरिष्ठ सल्लागार डॉ. अनूप खत्री यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. डॉ. अनूप खत्री यांनी सांगितले की, जास्त वेळ बसल्याने सायटिका, स्नायुशोष, गुडघेदुखी, टाईप-२ मधुमेह व कार्पल टनेल सिंड्रोमदेखील होऊ शकतो. म्हणूनच कामादरम्यान वारंवार विश्रांती घेणे आणि चालणे किंवा स्क्वॅटिंगसारख्या क्रियाकलापांचा समावेश करणे महत्त्वाचे आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हैदराबाद येथील अपोलो हॉस्पिटलचे सल्लागार व न्यूरोलॉजिस्ट डॉ. सुधीर कुमार यांनी या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. डॉक्टर सांगतात की, अधिक वजन, लठ्ठपणा, मधुमेह, हायपरटेन्शन मेलिट्स व कार्डिव्ह रोग होण्याचे प्रमुख कारण म्हणजे एका ठिकाणी भरपूर वेळ बसणे. डॉ. कुमार यांच्या मते, आधुनिक जीवनशैली, तसेच कामासाठी दीर्घकाळ बसणे आवश्यक ठरते. त्यामध्ये काहींना दररोज ८ ते १२ तास किंवा त्याहूनही जास्त वेळ बसून काम करावे लागते. मात्र, यातूनही थोडा वेळ काढून चालणे किंवा स्क्वॅट्ससारखे व्यायाम केल्यास वजन वाढणे, अन्य शारीरिक विकारांचा धोका कमी होतो.

अभ्यासात असेही नमूद करण्यात आले आहे की, स्क्वॅटिंगद्वारे खालच्या अंगांचे स्नायू सक्रिय होण्याची तीव्रता जास्त असते. स्क्वॅटिंग आणि चालणे तितकेच फायदेशीर असले तरी लवचिकता आणि स्नायूंची ताकद सुधारण्यासाठी स्क्वॅट्स जास्त उपयुक्त ठरतात. विशेषतः त्यामध्ये तुमच्या मुख्य स्नायूंना लक्ष्य केले जाते आणि त्यामुळे स्क्वॅट्स जास्त फायदेशीर आहेत, असे डॉ. खत्री यांनी स्पष्ट केले. मात्र, स्क्वॅट्स करणे नेहमीच विशेषतः कार्यालयीन वेळेत किंवा घराबाहेर असताना शक्य होऊ शकत नाही. अशा वेळी चालणे हा सर्वांत सोपा; पण प्रभावी पर्याय आहे. तुमच्या ऑफिसच्या परिसरात किंवा घराभोवती नियमित फिरण्यामुळे एकूणच आरोग्य सुधारण्यास मदत होते.

डॉ. खत्री यांच्या मते, १० ते २० मिनिटांपेक्षा जास्त वेळ चालण्यामुळेही स्नायूंचा कमकुवतपणा, पाठदुखी व पाय दुखणे यांसारख्या शारीरिक त्रासांचे व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने लक्षणीय मदत मिळू शकते. “तुम्ही तुमच्या व्यग्र वेळापत्रकात अधिकाधिक शारीरिक हालचालींचा समावेश केला गेलाय याची खात्री करून घ्या. उदा. कामाच्या ठिकाणी किंवा घरी लिफ्टऐवजी पायऱ्या चढणे आणि वीकेंडला घरी व्यायाम करणे,“ असा आरोग्यदायी सल्ला डॉ. खत्री यांनी आवर्जून दिला.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Squats or walks the better exercise to interrupt prolonged sitting is home exercise tips to reduce body pain in marathi srk