Benefits and side effects of protein powder: बॉडी बनवण्याची तरुणांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. त्यासाठी ते जिममध्ये तासनतास वर्कआउट करतात. क्रीडापटूंपासून ते व्यायामशाळेच्या उत्साही लोकांपर्यंत सगळेच हल्ली प्रोटीन सप्लिमेंट्स पावडर आणि प्रोटीन शेक घेत असतात. शरीर निरोगी ठेवण्यासाठी जर तुम्ही प्रोटीन पावडर किंवा प्रोटीनचे डब्बे, प्रोटीन सप्लिमेंट्स खात असाल तर त्याचे शरीरावर होणारे परिणाम, सकारात्मक आणि संभाव्य तोटे समजून घेणे महत्त्वाचे आहे. अथ्रेया हॉस्पिटल बेंगळुरूच्या वरिष्ठ पोषणतज्ज्ञ अक्षिता रेड्डी यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.

प्रोटीन सप्लिमेंट्स आज इतके लोकप्रिय का आहेत?

अथ्रेया हॉस्पिटल बेंगळुरूच्या वरिष्ठ पोषणतज्ज्ञ अक्षिता रेड्डी म्हणतात, “प्रोटीन सप्लिमेंट्सची अलीकडच्या काळात लोकप्रियता वाढली आहे. मात्र, याला पर्याय म्हणून आपण मठ्ठा, केसिन, सोया, वाटाणा किंवा तांदूळ यांसारख्या प्रथिनांचा आहारात समावेश करू शकतो. प्रोटीन सप्लिमेंट्सच्या अलीकडच्या काळातील लोकप्रियतेचे स्पष्टीकरण देताना अक्षिता रेड्डी म्हणतात की, आहारातून जे प्रथिने आपल्या शरीरात जातात त्याचा परिणाम दिसायला वेळ लागतो. तर प्रोटीन ड्रिंक, प्रोटीन सप्लिमेंट्स हा एक जलद आणि सोपा मार्ग आहे. याव्यतिरिक्त जे शाकाहारी आहेत, असे लोक पौष्टिक गरजा पूर्ण करण्यासाठी प्रोटीन सप्लिमेंट्स खातात.

दररोज प्रोटीन सप्लिमेंट्स घेतल्यावर काय परिणाम होतो ?

१. सकारात्मक परिणाम

स्नायूंची वाढ : प्रोटीन सप्लिमेंट्स विशेषत: वर्कआउटनंतर सेवन केल्यावर स्नायूंच्या वाढीसाठी फायदेशीर ठरते.

वजन व्यवस्थापन : प्रोटीन सप्लिमेंट्सच्या सेवनानं एकूण कॅलरीचे सेवन कमी होते, त्यामुळे वजन कमी करण्यासाठीही हे फायदेशीर ठरते.

पोषक तत्वे : आपल्या रोजच्या आहारातून जर गरजेचे प्रोटीन्स शरीराला मिळत नसतील तर या प्रोटीन सप्लिमेंट्स, प्रोटीन शेकद्वारे ते शरीराला मिळते, ज्यामुळे तुम्हाला विविध शारीरिक कार्यांसाठी आवश्यक पोषक तत्वे मिळतात.

२. प्रोटीन सप्लिमेंट्सचे दुष्परिणाम

प्रोटीन सप्लिमेंट्स तुमच्या शरीरासाठी फायदेशीर ठरू शकतात. मात्र, दररोज प्रोटीन सप्लिमेंट्स घेताना त्याच्या परिणामांचा विचार केला पाहिजे. तुम्हाला आधीच किडनीच्या समस्या असल्यास, जास्त प्रमाणात प्रथिने घेतल्याने तुमच्या मूत्रपिंडावर अतिरिक्त ताण येऊ शकतो. तुमच्या आरोग्याच्या विशिष्ट गरजांसाठी योग्य प्रोटीनचे सेवन निश्चित करण्यासाठी तुमच्या डॉक्टरांशी सल्लामसलत करणे महत्त्वाचे आहे.

जसजसे आपले वय वाढते, तसतसे आपले शरीर प्रथिनांवर वेगळ्या पद्धतीने प्रक्रिया करते. वृद्धांनी त्यांच्या प्रथिनांचे सेवन लक्षात घेतले पाहिजे आणि त्याचे प्रमाण ठरवण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. तुमच्या वैयक्तिक गरजा पूर्ण करणारी प्रथिने सप्लिमेंट नेहमी निवडा.

हेही वाचा >> पावसाळ्यात फिरायला जाताय? मलेरिया होऊ नये म्हणून ‘अशी’ घ्या काळजी अन् ॲडमिट होण्याचा धोका टाळा

तुमच्या प्रथिनांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रथिने पूरकांवर अवलंबून राहणे हा शाश्वत किंवा आरोग्यदायी दृष्टिकोन नाही. तुमच्या आरोग्याला साहाय्य करण्यासाठी तुम्हाला पोषक तत्त्वांचा एक विस्तृत श्रेणी मिळत आहे याची खात्री करण्यासाठी तुम्ही संपूर्ण पदार्थांनी समृद्ध संतुलित आहार घेत आहात याची खात्री करा. गरज असेल तरच प्रोटीन सप्लिमेंट्सचे सेवन करावे. शरीरामध्ये प्रोटीन्सचे प्रमाण जास्त असल्यास त्याचा परिणाम मूत्रपिंडावर होऊ शकतो. मूत्रपिंडावर ताण आल्याने इतर समस्या उद्भवू शकतात. त्यासह डिहायड्रेशनदेखील होऊ शकते. शरीराच्या प्रति किलोग्रॅम वजनाच्या तुलनेनुसार दोन ग्रॅमपेक्षा जास्त प्रोटीन्स शरीरामध्ये असणे हानिकारक असते.