“मला तहानच लागत नाही आणि मी वाचलंय एका ठिकाणी – जोपर्यंत भूक लागत नाही तोवर खाऊ नये आणि जोवर तहान लागत नाही तोवर पाणी पिऊ नये”, शर्वरी तिच्या मतावर ठाम होती.
“ हो पण त्यांना तू किती पाणी पितेयस ते माहित नाहीये ना” मला एक ग्लास पाणी पण इतकं जास्त वाटतं. शर्वरीच्या स्वरात आपण करतोय ते चुकीचं आहे हे जाणवून देखील त्याच्या समर्थनार्थ काहीतरी बळंच ठरवून मुद्दा मांडल्याचे समाधान होतं.
शर्वरी वय वर्ष २६.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोरडी त्वचा, अमाप केस गळती , मासिक पाळीच्या वेळी येणार थकवा , पचनाच्या अनेक तक्रारी, मध्येच येणारं टोकाचं एक्झॉशन आणि गेले अनेक महिने केलेलं गुगल आहार नियमन या सगळ्यांशी आमचा संवाद सुरु होता. आहाराबद्दल जाणून घेताना तिच्या पाणी पिण्याच्या सवयींवर आमचं सेशन बरंच लांबलं आणि त्याचदरम्यान मला अशा अनेक शर्वरी दिसू लागल्या.

आणखी वाचा: Health Special: अवास्तव वेदनेची प्रतिक्रिया

अनेक मुली आणि वेगेवेगळ्या वयोगटातील स्त्रियांची पाणी पिण्याबद्दल तक्रार असते – मला तहान लागत नाही. शाळेत वॉशरूम मध्ये जायला आवडत नाही किंवा ऑफिस मध्ये कुठे सारखं पाणी पिणार? किंवा सारखं वॉशरूम मध्ये पळावं लागतं किंवा एसी मध्ये कुठून तहान लागणार? किंवा आपल्याकडे वॉशरूम चांगले नसल्यामुळे मी वॉशरूमला जावं लागू नये म्हणून पाणी पीत नाही. अशी लांबलचक यादी घेऊन पाणी न पिण्याची १०१ कारणं घेऊन वावरत असतात.

आणि ही यादी मी अजिबातच नाकारत नाहीये. पाणी पिणं तहान लागण्यावर अवलंबून असावं का ? तर त्याच उत्तर आहे “नक्कीच “ परंतु शरीराला पाण्याची कितपत आवश्यकता आहे हे जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे.

आणखी वाचा: Health Special: ‘संस्कृत सूप’ करी आरोग्याचे रक्षण

अनादी अनंत काळापासून वेगवेगळ्या सजीवांनी डिहायड्रेशन टाळण्यासाठी शरीरातील पाण्याचे प्रमाण वातावरण बरहुकूम बदलून त्यांच्या शरीरात बदल केलेले आहेत. मानवी त्वचा आणि शरीर पाहता आपल्या शरीरात वेगेवेगळ्या पेशी, न्यूरॉन्स, स्नायू, नसा ,शीरा यांचे अब्जावधी जाळ्यांनी बनलेले आहे. यात असणारे पाणी आणि त्याद्वारे शरीराला मिळणारे पोषण यांचे संतुलन राखण्यासाठी आपल्याला पाण्याचे प्रमाण योग्य रीतीने राखणे आवश्यक आहे.

अनेकदा तहान न लागणाऱ्या व्यक्तींमध्ये शीतपेये आणि मद्यपान करण्याचे प्रमाण जास्त असते. किंबहुना शीतपेये किंवा गोड द्रव्यांमध्ये देखील पाणी पिण्याचे प्रमाण अत्यल्प असते. आपल्या मेंदूला शरीरातील पाणी आणि खनिजे यांचे संतुलन (वॉटर इलेकट्रोलाईट बॅलन्स ) योग्य राखले जाते आहे कि नाही याकडे सातत्याने लक्ष पुरवावे लागते . त्यासाठी न्यूरोहॉर्मोन्स सातत्याने लाळग्रंथी (सलायवरी ग्लॅण्डस) , घर्मग्रंथी (स्वेटग्लॅण्डस ) , मूत्रपिंड यांच्या नियमितपणावर लक्ष ठेवून असतात आणि त्यासाठी कार्यक्षम देखील असतात.

मूत्रपिंड शरीरातील द्रव पदार्थांचे योग्य संतुलन राखत असतात. जर शरीरात मुबलक पाणी असेल तर मूत्रपिंडाची कार्यक्षमता द्विगुणित होते. म्हणजे काय तर पाण्याचे प्रमाण कमी असल्यास लघवीचा रंग बदलतो- गडद होतो (तांबडा किंवा तपकिरी) कारण मूत्रपिंडावर अतिरिक्त ताण असतो. आहारात असणारे मीठ किंवा घटक पदार्थ शरीराबाहेर काढून टाकल्यास योग्य पाण्याचे प्रमाण नसल्यास हा रंग दिसून येतो. मुबलक पाणी प्यायल्यास मूत्रपिंडाचे अनावश्यक पदार्थ शरीरातून काढून टाकण्याचे काम सोपे होते.

तहान लागण्याच्या प्रक्रियेमध्ये पेशींच्या आतील अनेक पदार्थ सोबत घेऊन वाहक म्हणून काम करणारे पाणी आणि पेशीबाहेरील पाणी या दोन्हीच्या संतुलनाचं महत्व खूप आहे. शरीरातील आर्द्रता कमी झाल्यास त्यातील अणूंची घनता वाढते आणि पेशी आकुंचन पावतात. या सगळ्या घडामोडींमध्ये मेंदूत वायूवेगाने संदेशवहन होऊन तहान लागल्याचे शरीराला सांगितले जाते. यादरम्यान पाणी पिणे पुढे ढकलल्यास संपूर्ण शरीरावर ताण येऊ शकतो. खूप घाम आल्यास मीठ असणारे पाणी प्यायले जाते ( विशेषतः व्यायाम करणाऱ्यांमध्ये किंवा धावणाऱ्यांमध्ये मीठ आणि साखरेचे पाणी ठराविक वेळाने पिणे आवश्यक आहे )

वातावरणातील बदलानुसार पिण्याच्या पाण्याचे प्रमाण बदलू शकते . मात्र अशावेळी एक सोपा नियम लक्षात ठेवणे आवश्यक आहे . खूप तहान लागेपर्यंत पाणी पिणे टाळू नये . त्या आधी पाणी प्यावे. शरीरातील आर्द्रता, हॉर्मोन्सचे संतुलन यासाठी आवश्यक असणारी पोषकतत्त्वे योग्य वेळी, योग्य प्रमाणात , योग्य प्रकारे पुरविण्यासाठी पाणी हे महत्वाचे माध्यम आहे. त्यामुळे पाण्याला पर्याय शोधण्यापेक्षा शिस्त म्हणून योग्य प्रमाणात पाण्याचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे.

आपल्या शरीरात किमान ३ ते ६ लिटर पाणी दररोज वापरले जाते. आपण पिण्याच्या पाण्याचे प्रमाण किमान १लिटर इतके माफक तरी ठेवायलाच हवे. आणि पाण्याचे प्रमाण वाढवताना एकावेळी भरघोस पाणी पिण्यापेक्षा दर ७ ते १५ दिवसांनी हळूहळू पाण्याचे प्रमाण वाढवावे.

पुण्याला जीवन नाव आहे कारण ते मानवी आयुष्याचं गमक आहे. ज्या स्त्रियांना थकवा येणे किंवा निस्तेज त्वचा असणे, केसगळती होणे या तक्रारींना सामोरे जावे लागते त्यांनी पोषक आहार सोबत पाण्यावर लक्ष केंद्रित करणे देखील तितकेच आवश्यक आहे.

आम्ही आहार शास्त्रात काही छुपे पाण्याचे स्रोत कायम “खायला “ सांगत असतो. खाली दिलेली लिस्ट तुम्हालाही उपयोगी ठरेल अशी आशा आहे 🙂

आपण काही पदार्थांतील पाण्याचे प्रमाण जाणून घेऊ (पाणी प्यायचा कंटाळा आहे- मग पाणी खाऊन पाहा)

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why drinking water is important for health hldc psp