साबुदाण्याच्या खिचडी, वडे, थालीपीठ, साबुदाण्याच्या पिठाचे साजूक तुपातले लाडू हे पदार्थ खाल्ल्याशिवाय उपास केल्यासारखे वाटतच नाही मुळी! हे पदार्थ अगदी रुचकर लागतात हे मान्य, पण साबुदाण्यात फक्त आणि फक्त पिष्टमय पदार्थ मिळतात. त्यातून जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने यांचा अंश नगण्य असतो. १०० ग्रॅम साबुदाण्यातून साधारणत: ३५० उष्मांक मिळतात, या १०० ग्रॅममध्ये ९४ ग्रॅम तर निव्वळ पिष्टमय पदार्थ असतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वडे, खीर, लाडू या पदार्थामध्ये तेल आणि साखरेचाही भरपूर वापर होत असल्यामुळे उष्मांकांमध्ये भरच पडते. ‘पौष्टिक’ असं या पदार्थात काहीच नाही, उलट वारंवार उपवास करणारी मंडळी हेच पदार्थ भरपूर खात असतील तर वजन वाढण्यासाठी हे पदार्थ नक्कीच कारणीभूत ठरू शकतात. उपवासाला अधिक प्रमाणात शेंगदाणे खाल्यामुळेही आम्लपित हे ठरलेलेच असते. अशावेळी, उपवासाला कोणते पदार्थ खावे असा प्रश्न आपल्याला पडला असेल. आज आपण जाणून घेऊया की साबुदाण्याव्यतिरिक्त आपण उपवासाच्या दिवशी कोणत्या पौष्टिक पदार्थांचा समावेश आपल्या आहारात करू शकतो.

महाशिवरात्रीच्या उपवासाने वर्षांची सुरुवात होते. त्यानंतर रामनवमी, वटपौर्णिमा, आषाढी एकादशी, श्रावणी सोमवार आणि शनिवार, जन्माष्टमी, हरतालिका, नवरात्री असे अनेक उपवास सुरूच राहतात. काहींचा तर प्रत्येक संकष्टीचा उपवासदेखील असतो. उपवास कुठले करावेत हा झाला प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग. कडक उपास करावा का उपासांच्या पदार्थावर ताव मारून करावा हा झाला वैयक्तिक भाग. परंतु कडक उपवास केल्याने अतिरिक्त आम्लता वाढून उलटय़ा होणे, डोके दुखणे, चक्कर येणे अथवा उपवासाच्या पदार्थावर ताव मारल्यामुळे पित्त वाढणे असे त्रास होऊ शकतात. हे त्रास होऊ नयेत याची काळजी घ्यायला हवी. त्यासाठी उपवासाच्या दिवशी पोटाला त्रास न होणारे कुठले पदार्थ खावेत याबद्दलही माहिती असायला हवी.

  • राजगिरा

१०० ग्रॅम राजगिऱ्यात साधारणपणे १०३ उष्मांक आणि १९ ग्रॅम पिष्टमय पदार्थ असतात. त्यात कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, मॅग्नेशियम व पोटॅशियम ही खनिजेही आहेत. राजगिऱ्यात तंतूमय पदार्थही चांगले असून इतर कोणत्याही धान्यात ज्यांचा अभाव असतो असे ‘क’ जीवनसत्व आणि ‘लायसिन’ हे अमिनो आम्ल यात आहे. प्राणिजन्य पदार्थांइतकीच राजगिऱ्यातली प्रथिनेही चांगली असतात. राजगिऱ्याच्या पिठाचे थालीपीठ, घावन हे पदार्थ अतिशय चविष्ट लागतात. लहान मुले किंवा वजनाची चिंता करावी न लागणाऱ्या व्यक्तींसाठी राजगिऱ्याच्या पुऱ्याही करता येतील. राजगिऱ्याची खीर देखील जेवणाच्या ताटात समाविष्ट होऊ शकेल. मधल्या वेळच्या पदार्थामध्ये आणि ज्यांना गोड नको असेल त्यांना केवळ राजगिरा लाह्य दुधात घालूनदेखील खाता येतील.

  • शिंगाडा

शंभर ग्रॅम शिंगाडय़ातून सुमारे ९७ उष्मांक मिळतात. त्यात प्रथिने, कॅल्शियम, मॅग्निशियम आणि ‘क’ जीवनसत्व आहे, तर चरबीचे प्रमाण अजिबात नाही. आख्खा शिंगाडा (ताजा) मीठ घालून उकडून खाता येईल. शिंगाडय़ाच्या पिठाची खीर किंवा या पिठाची दाण्याच्या आमटीसारखीच आमटीही करता येते. शिंगाडय़ाचे पीठ साजूक तुपावर परतून त्यात खजूर घालून केलेले लाडू मधल्या वेळेसाठी चांगले.

  • वरीचे तांदूळ

ज्यांना उपवासाला वरीचे तांदूळ चालत असतील त्यांना ते उपवासाच्या दिवशी भातासारखे खाता येतील. वरीच्या तांदळातही जीवनसत्त्वे, खनिजे व तंतूमय पदार्थ आहेत.

Photos: आषाढी एकादशीचा उपवास करताय? मग ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

उपवासाच्या दिवशी खाण्यासारखे काही आरोग्याला बरे असलेले पदार्थही आहेत. असे पदार्थ खाल्ल्यास वारंवार उपास करणाऱ्यांना ते त्रासदायक ठरणार नाहीत. शहाळ्याचे पाणी, दूध, मसाला दूध, मिल्कशेक, फळे, खजूर, अंजीर, बेदाणे, नुसताच एखादा उकडलेला बटाटा किंवा रताळे, राजगिऱ्याचा लाडू वा चिक्की, शेंगदाण्याचा गूळ घालून केलेला किंवा शिंगाडय़ाचे पीठ व खजूर याचे लाडू हे पदार्थ चांगले. अळकुड्यांमध्ये ‘ड’ जीवनसत्व, पोटॅशियम व तंतूमय पदार्थ असतात. या अळकुड्या उकडून, कुस्करून त्यात मिरची व जिरे घालून टिक्की करता येतील. सुरण व कच्च्या केळ्याचे काप थोड्या तुपावर भाजून त्याला तिखट-मीठ लावून खाता येईल. हे पदार्थ पूर्ण जेवणाची भूक भागवणारे नसले तरी मधल्या वेळेसाठी ते चांगले.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Healthy food is it right or wrong to eat sabudana during fasting learn the special benefits of these alternative foods pvp