How To Easily Crack Job Interview: मागील काही महिन्यात अनेक मोठ्या कंपन्यांनी रातोरात कर्मचारी कपात केली होती. जगभरावर संभाव्य मंदीचे सावट असताना प्रत्येकजण हा मिळेल त्या नोकरीला धरून राहण्याच्या प्रयत्नात आहे. ज्यांच्याकडे नोकरी नाही किंवा जे नवी नोकरी शोधत आहेत अशी मंडळी मंदीच्या भीतीने आपल्या विचारांना मुरड घालून इंटरव्ह्यूच्या वेळी काही मोठ्या चुका करून बसतात. यामुळे एकतर तुम्ही नोकरीची संधी गमावून बसू शकता किंवा तुम्हाला अत्यंत कमी पगारात नोकरीवर ठेवले जाईल. या चुका कोणत्या व त्या टाळण्यासाठी नेमकं काय करायला हवं हे आता आपण पाहणार आहोत.

Deloitte या कंपनीतील मुख्य अधिकारी Leo Alexandru यांनी आपल्या ट्विटरवरून सांगितल्याप्रमाणे तुम्ही मुलाखतीच्या पहिल्या ९ मिनिटात काय करता यावरूनच तुम्हाला नोकरी मिळणार का हे ठरत असते. १०० हुन अधिक कर्मचाऱ्यांची नेमणूक करणाऱ्या लिओ यांनी एक बॉस नोकरीसाठी कसा उमेदवार नेमू इच्छितो याची काही गुपिते सांगितली आहेत. यातील पाच सिक्रेट्स आपण जाणून घेऊयात..

  1. नोकरीच्या इंटरव्ह्यूला अनेकजण आपल्याला सगळं काही माहित असल्याचं दाखवतात पण थोडं सविस्तर विचारल्यावर त्यांची गाडी अडकते. यापेक्षा तुम्ही न ऐकलेल्या, न वाचलेल्या किंवा तुम्हाला नेमकं ठाऊक नाही गोष्टी मान्य करा. तसेच त्या गोष्टी जाणून घेण्यासाठी, शिकण्यासाठी तुम्ही कसे प्रयत्न कराल हे सांगा. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही कामात किती प्रामाणिक आहात. ते तुमच्या समोर बसलेल्या बॉसला दिसायला हवं
  2. कामात अनेकदा खटके उडतात. सहकारीच नव्हे तर कितीतरी वेळा बॉसचे म्हणणे ही आपल्याला खटकू शकते. अशावेळी तुम्ही आरोप ढकलता की उत्तर शोधता हे महत्त्वाचं असतं. म्हणूनच तुम्ही कसे टीम मध्ये खेळणारे खेळाडू आहात हे दाखवून द्या. थोडक्यात तुम्ही इगो सोडून डोकं थंड कसं ठेवू शकता हे पाहण्यात बॉसला जास्त रस असतो.
  3. तुम्ही तुमच्या पूर्व कंपनीविषयी कसे बोलता हे सुद्धा तपासले जाते. चुकूनही तुमच्या जुन्या बॉसविषयी वाईट बोलू नका. सहकाऱ्यांविषयी गॉसिप करू नका. तुमचे विचार वेगळे असल्याने जॉब बदलत असाल तर तसं सांगा पण त्यातही कुणाचा अपमान होईल असे बोलणे टाळा.
  4. मार्क झुकरबर्गच्या नियमानुसार कोणताही बॉस अशा व्यक्तीला नोकरी देतो ज्याचे ध्येय कंपनीशी मिळते जुळते असेल. यासाठी अनेकजण खोटी सहमती दाखवतात पण असं करून तुम्ही तुमचा आदर गमावून बसाल. तुम्हाला तुमचे मतभेद आदराने मांडता यायला हवेत.
  5. एखादी बाब पटत नसूनही ‘हो ला हो’ करण्याची चूक चुकूनही करू नका. यामुळे तुम्हाला गृहीत धरले जाऊ शकते. कदाचित यामुळे तुम्हाला जॉब मिळू शकतो पण तुमचा आदर राहणार नाही. तसेच प्रत्येक गोष्टीला हो म्हणण्यापेक्षा तुमचा वेगळा विचार तुमचे पॉईंट्स जास्त वाढवू शकतो.

पुढच्या नोकरीसाठी खूप खूप शुभेच्छा!