World Heart Day 2022 : बदललेली जीवनशैली, धकाधकीचे जीवन, अयोग्य आहार सवयी यामुळे सध्याच्या काळात अनेक गंभीर आजारांचा धोका वाढू लागला आहे. पूर्वी मधुमेह, हृदयविकार यासारखे आजार केवळ वयस्क लोकांना होत असत. मात्र आता सर्वच वयोगटातील लोकांना या आजारांचा धोका आहे. विशेष म्हणजे यातून नवजात बालकांचीही सुटका नाही. नवजात बाळांना जन्मतः हृदयासंबंधी आजार होत असल्याची अनेक प्रकरणं समोर येत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनेकदा नवजात बालकांना जन्मतःच हृदयविकाराने ग्रासलेले असते. अशा परिस्थितीत त्यांच्या मृत्यूचा धोकाही अधिक असतो. मात्र, अजूनही अशा बाळांच्या पालकांमध्ये जागरुकतेचा अभाव आहे. वेळेवर हा आजार लक्षात न आल्यास याच्या वाईट परिणामांना सामोरे जावे लागू शकते. म्हणूनच जन्मानंतर नवजात बालकांची हृदय चाचणी करणे अत्यंत आवश्यक आहे.

हृदयविकार असणाऱ्या बाळांच्या हृदयामध्ये छिद्र असू शकते. ज्यावेळी बाळाचे हृदय शरीराला योग्य त्या प्रमाणात ऑक्सिजन पुरवू शकत नाही, त्यावेळी बाळांना जन्मजात हृदयरोग होतो. त्यामुळे पालकांना आपल्या बाळांमध्ये काही विशिष्ट लक्षणे दिसत असल्यास त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. मुंबईतील एसआरव्ही हॉस्पिटलमधील हृदयरोगतज्ज्ञ, डॉ. जयदीप राजेबहादूर यांनी नवजात बालकांमध्ये हृदयविकारासंबंधी कोणती लक्षणे दिसून येतात याबद्दल माहिती दिली आहे.

Diabetes : महिला अगदी सहज नियंत्रणात आणू शकतात टाइप २ मधुमेह; ‘या’ उपायांनी मिळेल आराम

हृदयविकार असलेल्या नवजात बालकांमध्ये दिसून येणारी लक्षणे :

जन्मजात हृदयविकाराने ग्रासलेले नवजात बालक जन्मतः निरोगी दिसू शकते, परंतु काही दिवसांनी त्यामध्ये गंभीर लक्षणे दिसू शकतात. या लक्षणांमध्ये खालील समस्यांचा समावेश होतो.

  • बाळाच्या त्वचेचा रंग निळसर पडणे.
  • श्वास घेण्यास त्रास होणे.
  • चेहऱ्याला किंवा हातापायाला सूज येणे.
  • डोळे किंवा छातीत दुखणे.
  • रक्तदाब कमी होणे.
  • धाप लागणे.
  • वजन कमी होणे.
  • योग्य प्रमाणात वजन न वाढणे.
  • वारंवार फुफ्फुसाचा जंतूसंसर्ग होणे.
  • दूध पिताना खूप घाम येणे किंवा अर्धवट दूध पिणे.

गरोदरपणात आईला ताप येणे, यावेळी आईने घातक औषधांचे सेवन करणे, गर्भधारणेदरम्यान आईला मधुमेह होणे या कारणांमुळे नवजात बालकांना हृदयरोग होऊ शकतो. गर्भाशयात हृदयाचा अपूर्ण किंवा सदोष विकास यामुळेही बालकांमध्ये हृदयविकार उद्भवू शकतो.

Health Tips : शरीरात ‘या’ कमतरता निर्माण झाल्यावर होते गोड खाण्याची इच्छा; वेळीच सावध व्हा

हृदयविकार असणाऱ्या नवजात बालकांसाठी स्क्रीनिंग का महत्त्वाची?

हृदयविकार असणाऱ्या नवजात बालकांच्या हृदयाची तपासणी न केल्यास गंभीर समस्या उद्भवू शकतात. बाळाला हृदयविकाराचा झटका येणे, हृदयाची गती मंदावणे, तसेच शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्याचप्रमाणे बाळामधील हा विकार वेळीच लक्षात न आल्यास बाळ दगावण्याची शक्यता अधिक असते. म्हणूनच जन्मानंतर प्रत्येक नवजात बाळाची हृदय तपासणी करणे गरजेचे आहे. जेणेकरून बाळामध्ये हृदयासंबंधी विकार लक्षात आल्यास त्यावर तातडीने उपचार करून बाळाचे प्राण वाचवता येऊ शकतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Newborns also at risk of congenital heart disease how to recognize the symptoms find out heartattack risk health pvp
First published on: 29-09-2022 at 11:37 IST