Satish Shah death: सतीश शाह यांना किडनीच्या तीव्र आजारामुळे नुकतेच हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांनी रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला. किडनी हा आपल्या शरीरातील सर्वांत महत्त्वाचा भाग आहे. किडनी प्रामुख्याने युरिया, क्रिएटिनिन, अॅसिड यांसारख्या नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थांपासून रक्ताला फिल्टर करण्यासाठी मदत करते. दुखापत, उच्च रक्तदाबामुळे किंवा मधुमेहामुळे मूत्रपिंड खराब झाल्यास ते शरीरातील विषारी पदार्थ फिल्टर करू शकत नाही, ज्यामुळे शरीरात विष तयार होते. अशा स्थितीत किडनी नीट काम करीत नाही आणि विषारी पदार्थ जमा होत राहतात. इथे आज आम्ही तुम्हाला टॉक्सिक किडनीची काही लक्षणं सांगणार आहोत, जी तुम्हाला वेळेवर सांगतील की, तुमची किडनी खराब होऊ लागली आहे आणि तुम्ही त्याकडे लवकर लक्ष दिले पाहिजे. सतीश शाह हे गेल्या अनेक वर्षांपासून टाईप-२ मधुमेहाशी झुंजत होते आणि त्यांच्यावर पूर्वी मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती. दुर्दैवाने, गेल्या काही आठवड्यांत त्यांच्या प्रकृतीबाबतच्या गुंतागुंती आणखी वाढल्या.

मूत्रपिंड निकामी होण्याची सुरुवातीची लक्षणे

मूत्रपिंड निकामी होणे हे एका रात्रीत होत नाही. मूत्रपिंडाच्या समस्या बऱ्याचदा हळूहळू विकसित होतात आणि कधी कधी सुरुवातीची लक्षणे ओळखणे कठीण असते. कारण- त्या नेहमीच्या समस्यांसारख्या दिसतात आणि त्यांना दररोजचा थकवा किंवा वृद्धत्व समजले जाऊ शकते. तज्ज्ञांच्या मते, लोकांनी, विशेषतः मधुमेह किंवा उच्च रक्तदाब असलेल्यांनी त्यांच्या आरोग्यातील लहान लहान बदलांकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे.

मूत्रपिंड निकामी होण्याची काही सुरुवातीची लक्षणे :

  • रक्तात कचरा साचल्यामुळे सतत थकवा किंवा अशक्तपणा येणे
  • द्रवपदार्थ साचल्यामुळे पाय, घोटे किंवा डोळ्यांभोवती सूज येणे,
  • रात्री वारंवार लघवी होणे किंवा लघवीचा रंग आणि आकारमान बदलणे
  • भूक न लागणे, मळमळ होणे किंवा तोंडात धातूची चव येणे
  • श्वास घेण्यास त्रास होणे; कारण- फुप्फुसांमध्ये द्रवपदार्थ साचू शकतात
  • खाज सुटणे किंवा कोरडी त्वचा, मूत्रपिंड विषारी पदार्थ योग्यरीत्या काढून टाकत नसल्याचे लक्षण

हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की, तुमच्या मूत्रपिंडांना लक्षणीय नुकसान झाल्यानंतरदेखील ही लक्षणे दिसून येतात. म्हणूनच नियमितपणे मूत्रपिंड कार्य चाचण्या करून घेणे, विशेषतः मधुमेहींसाठी आवश्यक आहेत. तुमची शारीरिक स्थिती बिघडण्यापूर्वी तुम्ही तुमच्या क्रिएटिनिनची पातळी तपासण्यासाठी नियमित रक्त चाचण्या आणि प्रथिनांसाठी मूत्र चाचणी निवडू शकता.

मूत्रपिंड प्रत्यारोपणानंतरचे धोके आणि गुंतागुंत

एचटीमधील एका वृत्तानुसार, सतीश शाह यांच्या शरीरात मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण केले गेले होते; परंतु त्यांना अलीकडेच संसर्ग झाला होता. मूत्रपिंड प्रत्यारोपणामुळे रुग्णांना नवीन जीवन मिळू शकते; परंतु त्यासाठी आयुष्यभर काळजी आणि सतत देखरेखीची आवश्यकता असते. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, शस्त्रक्रिया यशस्वी झाली तरीही औषधे घ्यावी लागतात. परंतु, ही औषधे अचूक नसतील, तर ती रोगप्रतिकारक शक्तीवर विपरीत परिणाम करतात आणि त्यामुले रुग्णांना संसर्ग होण्याची शक्यता वाढू शकते.

मूत्रपिंड प्रत्यारोपणाशी संबंधित काही सामान्य जोखीमांमध्ये समाविष्ट बाबी :

  • शस्त्रक्रियेनंतरही वर्षानुवर्षे प्रत्यारोपित मूत्रपिंड नाकारणे
  • रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे होणारे संसर्ग
  • उच्च रक्तदाब आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीच्या समस्या
  • मधुमेहाच्या गुंतागुंती, ज्या शस्त्रक्रियेनंतर पुन्हा दिसू शकतात किंवा बिघडू शकतात.