बॉलीवूडमध्ये पठडीबाज चित्रपटांऐवजी गाजणाऱ्या कलावंतांना घेऊन कथानकात थोडा वेगळेपणा आणून तद्दन चित्रपट बनविण्याऐवजी ‘नवं’ काही करण्याचा प्रयत्न निर्माते-दिग्दर्शक करीत आहेत. एकता कपूरच्या बालाजी मोशन पिक्चर्सने ‘द डर्टी पिक्चर’सारखा चित्रपट केला, तसेच ‘रागिणी एमएमएस’, ‘लव्ह, सेक्स और धोखा’ यांसारख्या निरनिराळ्या प्रकारांतल्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. थरारपट, प्रेमपट आणि अॅक्शन यांचे मिश्रण असलेला ‘एक व्हिलन’ हा एकता कपूर निर्मित आगामी चित्रपट आहे.
‘हर एक लव्ह स्टोरी में एक होता है व्हिलन’ अशी या चित्रपटाची टॅगलाइन ऑनलाइन मीडियामध्ये चर्चेत होती. नायक केंद्री चित्रपटांपासून ते आता चक्क ‘खलनायक’केंद्री चित्रपट असा हिंदी चित्रपटांचा प्रवास होतो आहे. शाहरुख खानने साकारलेला ‘अॅण्टिहीरो’ हाही लोकप्रिय ठरला. परंतु, मुळात तो ‘हीरो’ होता म्हणून तो नकारात्मक छटा साकारूनही लोकांनी त्याला स्वीकारले. जागतिकीकरण, इंटरनेटचा वाढता वापर, मल्टिप्लेक्सचा उदय आणि त्यामुळे जगभरातील देशोदेशींचे चित्रपट भारतीय प्रेक्षकांना सहजपणे उपलब्ध होऊ लागले. त्यामुळेच केवळ नायक-नायिका, त्यांचे प्रेम, त्यांच्या प्रेमात बिब्बा घालणारा खलनायक किंवा नायिकेचा बाप, मग क्लायमॅक्सची हाणामारी आणि शेवट गोड. नायक-नायिकेचे लग्न असा ठरीव फॉम्र्युला बदलणे बॉलीवूडला भाग पडले असेच म्हणावे लागेल. त्यातूनच बिगबजेट, बडे स्टार कलावंत, परदेशी लोकेशन्स, गाण्यांसाठीचे भव्यदिव्य सेट्स याचे प्रमाण कमी होत गेले. २००५ नंतरच्या काळात अनेक नवीन ‘टॅलेण्ट’, नव्या दमाच्या अस्सल तरुणाईच्या हिंदी चित्रपटातील प्रवेशामुळेही वेगवेगळी छोटा जीव असलेली कथानके, नवोदित कलावंतांना घेऊन हाताळण्याचे प्रमाणही वाढले. छोटय़ा बजेटचे चित्रपटही चालतात, विषय वेगळा असला की झाले याचा प्रत्यय बडय़ा निर्मात्यांना आल्यानंतर असे चित्रपट मोठय़ा प्रमाणावर येऊ लागले आहेत.
रितेश देशमुख, सिद्धार्थ मल्होत्रा आणि श्रद्धा कपूर अशी स्टारकास्ट या चित्रपटात आहे.
‘एक व्हिलन’ची अनेक वैशिष्टय़े आहेत ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण व्हायला हरकत नाही. प्रमुख वैशिष्टय़ म्हणजे आतापर्यंत सदोदित फक्त आणि फक्त विनोदी भूमिका, उडाणटप्पू, ‘गुड फॉर नथिंग’ तरुणाच्या भूमिका साकारणारा रितेश देशमुख प्रथमच आपल्या प्रतिमेच्या बाहेर जाऊन नकारात्मक छटेची व्यक्तिरेखा साकारतो आहे. चित्रपटाच्या ट्रेलरने खरी उत्कंठा वाढवली आहे. सिद्धार्थ मल्होत्रा-श्रद्धा कपूर ही नायक-नायिकांची जोडी आहे ट्रेलरवरूनच प्रेक्षकांना कळले आहे. परंतु, एका ट्रेलरमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा ‘व्हिलन’ असल्याचे दिसतेय. त्यामुळे एकीकडे चित्रपटाच्या निर्मात्यांनी रितेश देशमुख प्रथमच नकारात्मक छटेच्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे अशी जाहिरात केली आहे. पण ट्रेलरमधून सिद्धार्थ मल्होत्राची व्यक्तिरेखा नकारात्मक दाखविण्याची क्लृप्ती केली आहे. त्यामुळेच नक्की ‘एक व्हिलन’मधला ‘व्हिलन’ कोण याबाबत उत्सुकता ताणली गेली आहे. ‘आशिकी २’च्या यशानंतर मोहित सुरी या चित्रपटाचे दिग्दर्शन करतोय. म्हणूनच श्रद्धा कपूरने चित्रपट सहजपणे स्वीकारला असावा असे मानले जाते. पहिलाच चित्रपट यशस्वी ठरल्यानंतर आपोआपच त्याच दिग्दर्शकाबरोबर काम करणे सोपे आणि करिअरच्या दृष्टीने सोयीचे ठरते हा सरळ विचार श्रद्धा कपूरने केला असावा. ‘जेव्हा त्याची प्रेमिका एका सीरियल किलरचा बळी ठरते तेव्हा गुरू सूड घेण्याच्या मिषाने सत् आणि असत् यामधील सीमारेषा पुसून टाकतो’, असा एका वाक्यात या चित्रपटाचा सारांश देण्यात आला आहे. त्यावरून गुरू ही व्यक्तिरेखा नि:संशय सिद्धार्थ मल्होत्राची असणार असे मानायला हरकत नाही.
संग्रहित लेख, दिनांक 13th Jun 2014 रोजी प्रकाशित
एक व्हिलन
रितेश देशमुख प्रथमच खलनायकी छटेची नकारात्मक भूमिका साकारणार असलेला ‘एक व्हिलन’ २७ जून रोजी प्रदर्शित होतोय. यातील ‘व्हिलन’ तो आहे का हे मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच प्रेक्षकांना समजणार आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 13-06-2014 at 01:12 IST
मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ek villain