भारतासारख्या लोकशाही असलेल्या देशात भाषण, आचारविचार, धर्म, भाषा, विहार अशा अनेक बाबतीत आपल्याला भारताचे नागरिक म्हणून स्वातंत्र्य आहे; पण आजच्या काळात आपले विचार, कृती लोकांपर्यंत मांडायला महत्त्वाचे आहे ते इंटरनेटवरील स्वातंत्र्य! फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल नेटवर्किंग साइटवर विविध गोष्टींवर व्यक्त होण्याचं, इतरांच्या पोस्टवर कमेंट करण्याचं स्वातंत्र्य आजच्या पिढीसाठी सर्वाधिक महत्त्वाचं आहे; पण प्रत्येक गोष्टीवर व्यक्त होण्याचा अतिरेक आजकाल या साइट्सवर दिसू लागला आहे आणि अशाच कमेंट्स समाजात खळबळ निर्माण करताना दिसत आहेत.
नोव्हेंबर २०१२ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर मुंबईमध्ये पुकारलेल्या बंदचा दोन तरुणींनी फेसबुकद्वारे विरोध केला. अशी पोस्ट केल्यामुळे आणि त्याला ‘लाइक’ कमेंट केल्यामुळे त्या तरुणींना अटक झाली होती. यानिमित्ताने सर्व थरांवर नागरिकांच्या इंटरनेटवरील ‘भाषण-स्वातंत्र्यावर’ प्रश्न उपस्थित केले गेले, टीका झाली आणि नवीन वादाला तोंड फुटले. ‘बाळासाहेबांसारखे लोक रोज जन्म घेतात व मृत्यू पावतात, त्यासाठी मुंबई बंद ठेवण्याची गरज नाही’ अशा पोस्टमुळे या तरुणींना अटक झाली होती. कलम ५०५ (२) प्रमाणे ‘शत्रुत्व किंवा समाजातील दोन वर्गामध्ये वाद निर्माण करणारे वाक्य’ उद्गारल्यास कायद्याने शिक्षा होऊ शकते. याच कायद्यांतर्गत त्यांना अटक झाली. मात्र या पोस्टने प्रक्षोभ झाल्याने शिवसेना कार्यकर्त्यांनी यापैकी एका मुलीच्या काकांच्या दवाखान्यावर हल्ला केला. मात्र त्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नाही. भारतातील संविधानातील कलम १९ (१) (अ) नागरिकांना भाषण-स्वातंत्र्य मूलभूत हक्काप्रमाणे प्राप्त होते. तसेच त्या तरुणींनीची कमेंट धर्माविरोधात किंवा समाजातील वर्गाविरोधात नव्हती, असा दावा त्यांच्या वकिलांनी केला. मात्र या घटनेनंतर ‘इंटरनेटवरील स्वातंत्र्य’ या विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला लागला. या सगळ्या घटनांच्या पलीकडे जाऊन यामध्ये मूळ मुद्दा विचार करण्यासारखा आहे. तो म्हणजे, त्या मुलीने अशी पोस्ट टाकण्याआधी त्याचे समाजात काय पडसाद उमटतील याचा विचार केला होता का? बहुतांश लोक ज्या व्यक्तीला आदर्श मानतात, त्यांच्या निधनानंतर अशा प्रकारची कमेंट करणे योग्य होते का? आणि खरंच आपल्याला हवे ते, हवे तेव्हा, हवे तसे, हवे तिथे व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य समाजात मिळते का?
सध्या इंटरनेट हे ज्या-त्या गोष्टींवर व्यक्त होण्याचं सर्वात सोपं आणि प्रभावी माध्यम झाले आहे. अगदी छोटय़ातल्या छोटय़ा क्षुल्लक गोष्टींपासून ते जागतिक पातळीवरच्या घडामोडीपर्यंत सर्व विषयांवर मते, विचार सोशल मीडियावर व्यक्त केली जातात आणि सर्वात आधी व्यक्त होण्याच्या, सर्वाधिक आणि कमेंट्सही इतर कमेंट्स, शेअर्स मिळविण्याच्या नाहक चढाओढीमध्ये आपण सारासार विचार करून आपले मत मांडत आहोत का, याकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे. याचाच परिणाम म्हणून अशा अर्धवट विचार करून लिहिलेल्या कमेंट इतर लोकांच्या कमेंट्ससाठी खाद्य ठरत आहेत; परंतु यातून नक्की साध्य काय होत आहे? हा मात्र चिंतेचा प्रश्न ठरत आहे. अशा उत्तरांना प्रतिउत्तर करण्यात सगळेच गुंतलेले दिसत आहेत; पण या वादातून ज्ञानात आणि सामाजिक परिस्थितीत मात्र सुधारणा होताना दिसत नाहीये.
आपण नेहमीच म्हणत असतो ‘जबाबदारी किंवा कर्तव्य’ ही स्वातंत्र्याच्या नाण्याची दुसरी बाजू असते. हीच गोष्ट बाकीच्या स्वातंत्र्याप्रमाणे ई-स्वातंत्र्याबाबतीतही लागू होते. जसं एक ‘जबाबदार नागरिक’ म्हणून समाजात काही कर्तव्यं पार पाडणं आवश्यक असतं, तसंच एक ‘जबाबदार नेटिझन’चीसुद्धा काही कर्तव्यं असतात. ज्यामुळे इंटरनेटच्या ‘व्हच्र्युअल जगात’ एकोपा, शांतता निर्माण होऊ शकते. नेटिझनची महत्त्वाची जबाबदारी आहे ती म्हणजे घडणाऱ्या घटनांचा आढावा घेऊन, त्यांचा अभ्यास करून आपले मत लोकांपुढे व्यक्त करावे. तसं केल्याने आपण फक्त गर्दीचा एक भाग म्हणून न वावरता, आपल्याला जे विचार करण्याचे स्वातंत्र्य आहे, त्याचा योग्य वापर करणे शक्य होते. तसेच विषय समजून घेऊन मत व्यक्त केल्याने वादाच्या घटनाही घडण्याची शक्यताही कमी होते. स्वातंत्र्य आणि स्वैराचाराचा मुद्दा ई-स्वातंत्र्यामध्येही महत्त्वाचा ठरतो. स्वातंत्र्य चांगल्या कामासाठी, चांगलं ध्येय गाठण्यासाठी आवश्यक असतं. मात्र दिलेल्या स्वातंत्र्याची सीमा ओलांडून समाजात इतरांना त्रास होईल असे वर्तन केल्यास स्वैराचाराकडे ते वर्तन झुकलेले दिसते.
माणूस समाजशील प्राणी आहे, त्यामुळे केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी समाजघातक विचार, कृती करणं चुकीचं आहे. समाजात आपल्याला दिलेल्या स्वातंत्र्याबरोबर जबाबदार समाजशील व्यक्ती म्हणून काही कर्तव्य पार पाडणेही गरजेचे असते. आपल्या कृतीचे समाजात काय पडसाद उमटतील, आपल्या बोलण्यामुळे, कृतीमुळे इतरांना त्रास होऊ शकतो का, असा साधा विचार करून कृती करणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून समाजात सुसूत्रता येण्यास मदत होऊ शकते. हाच विचार सोशल मीडियावर व्यक्त होताना करायला हवा. कुणाचे विचार पटले नाहीत तर त्याच्या वॉलवर शिव्या, अश्लील भाषा वापरून कमेंट करणं, अध्र्या माहितीवर तर्कवितर्क लावून त्याचा प्रसार करणं, दुसऱ्यांच्या खासगी, वैयक्तिक गोष्टी फेसबुकवर लिहिणं, इतरांची चारचौघांत निंदानालस्ती करणं या सर्वच गोष्टी जबाबदार नेटिझनच्या नात्याने चुकीच्या ठरतात, कारण या गोष्टींमुळे लोकांमध्ये वाद होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे आपल्या हातून चुकीच्या गोष्टी होणार नाहीत याची खबरदारी घेणे गरजेचे आहे.
काही महिन्यांपूर्वी दीपिका पदुकोणच्या ‘माय चॉइस’ या व्हिडीओवरून बरेच वादविवाद, विचारमंथन झालं. तोच विषय स्वातंत्र्याबद्दल विचार करताना महत्त्वाचा आहे. चॉइस आणि स्वातंत्र्य या बऱ्याच जवळ जाणाऱ्या संकल्पना आहेतच; परंतु त्यामध्ये एक सूक्ष्म रेषा आहे. माय चॉइसमध्येसुद्धा ‘निवड-स्वातंत्र्या’वर भर दिला गेला होता. हे निवड-स्वातंत्र्य प्रत्येक गोष्टीत महत्त्वाची भूमिका बजावतं. ‘विविध गोष्टी निवडण्याचं स्वातंत्र्य नक्कीच आपल्याला असतं, मात्र या गोष्टी निवडताना आपण सदसद्विवेकबुद्धीचा वापर करून जबाबदारीने निवड करतो का हे महत्त्वाचं आहे.’ कारण स्वातंत्र्यसुद्धा जबाबदारीने आणि काळजीपूर्वक वापरण्याची गोष्ट आहे. त्यामुळे विविध गोष्टींमधून निवड करताना, हे निवडीचे स्वातंत्र्य जबाबदारीने वापरणं गरजेचं आहे. इंटरनेटवरील कुठल्याही गोष्टीवर व्यक्त होण्याचे बरेच मार्ग आहेत, पण त्यातून आपण कोणता मार्ग निवडतो, त्याचा काय परिणाम होऊ शकतो, याचा विचार करणं आपली जबाबदारी आहे. आपल्या प्रतिक्रियेवर लोकांची काय प्रतिक्रिया असू शकेल याचा विचार व्यक्त होताना केला तर बराच गोंधळ कमी होऊ शकेल. लोकांच्या संवेदना, भावना न दुखावताही बऱ्याच गोष्टी मांडता येतात, साध्य करता येतात. प्रत्येकाला इंटरनेटवर व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य असलं तरी प्रत्येकाने प्रत्येक गोष्टीवर व्यक्त होण्याची सक्ती नाही, हेसुद्धा आपण जाणून घेतले पाहिजे. त्यामुळे पोस्ट, कमेंट आणि लाइक्सच्या गोंधळात आपल्या मतांचे, विचारांचे स्थान निर्माण करणे ही आपलीच जबाबदारी आहे. त्यामुळे कुठल्या गोष्टीवर कसे व्यक्त व्हावे याची योग्य निवड करणे गरजेचे आहे.
तेजाली कुंटे – response.lokprabha@expressindia.com
संग्रहित लेख, दिनांक 14th Aug 2015 रोजी प्रकाशित
ई-स्वातंत्र्याची जबाबदारी
सध्या इंटरनेटच्या माध्यमातून फेसबुक, ट्वीटर, व्हॉट्सअॅप हे तरुणाईसाठी व्यक्त होण्याचे सोपे आणि प्रभावी माध्यम झाले आहे.

First published on: 14-08-2015 at 01:23 IST
मराठीतील सर्व कव्हर स्टोरी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Independence day special