या अनुभवांमध्ये जातीय दंगलींच्या वेळचे दोन महत्त्वाचे अनुभव आहेत, अंगावर काटा आणणारे; अखेरीस चांगुलपणाचाच धर्म हा जगातील सर्वश्रेष्ठ धर्म आहे, हे अधोरेखित करणारे. या दोन्ही प्रसंगांमध्ये शालेय क्रमिक पुस्तकामध्ये दिलेल्या देशाच्या प्रतिज्ञेतील ओळी ‘‘सारे देशवासीय माझे बांधव आहेत’’ मुस्लीम बांधव प्रत्यक्षात जगले, त्यांना सलाम!
आधुनिक युगातही दिलेला शब्द पाळणारी आणि ३४ वर्षांनंतरही दागिने परत नेऊन देणारी आजी आपला या चांगुलपणावरचा विश्वास दृढ करते; एवढेच नाही तर आपल्याला चांगुलपणाचे बळही देऊन जाते. सायकलवरून विश्वप्रदक्षिणा करणाऱ्या वेदांगी कुलकर्णीला तिचा निर्धार पाहून मदत करणारा दरोडेखोरही याच समाजाची दुसरी बाजू दाखवून जातो.
चांगुलपणा म्हणजे काय? तर माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे! पण आता तोच दुर्मीळ होत चालला आहे. म्हणून तर माणूस माणसासारखे वागला तरी त्याचे कौतुक करण्याची वेळ आपल्या पिढीवर आली आहे. गरज आहे हा चांगुलपणा वाढण्याची, विस्तारण्याची!
तर चला चांगुलपणाची शेती करू या!
गुढीपाडवा आणि ‘लोकप्रभा वर्धापन दिना’च्या अनेकानेक शुभेच्छा!
विनायक परब – vinayak.parab@expressindia.com / @vinayakparab