विनायक परब –  @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com
पाकिस्तान, श्रीलंका या दोन महत्त्वाच्या शेजारी देशांमध्ये दुर्दैवाचे दशावतार सुरू आहेत. चीनकडून घेतलेली वारेमाप कर्जे  हे त्याचे एक महत्त्वाचे कारण. दोन्ही देशांना स्वत:च्या अर्थव्यवस्थेचा डोलारा सांभाळण्यात पुरते अपयश आले आहे. अगतिकतेमुळे का असेना, गेल्या सुमारे वर्षभरात पाकिस्तानची भारतविरोधातील भूमिका मवाळ तर झालीच, मात्र त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे कधी नव्हे तो त्याचा उल्लेख त्यांच्या थेट राष्ट्रीय धोरणातही झाला. त्यामुळे भारत-पाक सीमेवर शांतता असेल अशी शक्यता निर्माण झाली. मात्र पाकिस्तानात राजकीय नाटय़ रंगले आणि देश अशांततेच्या उंबरठय़ावर येऊन ठेपला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इस्लामाबादमध्ये काय होणार हे रावळिपडीमध्ये ठरते, हे पाकिस्तानातील सत्य आहे. तिथे लष्कराच्या मदतीशिवाय कोणतेही पान हलत नाही. २०१८ साली लष्कराच्या इच्छेनुसारच इम्रान खान यांना पुढे केले गेले आणि ते पंतप्रधान झाले. मात्र गेल्या दोन वर्षांपासून लष्कर आणि इम्रान खान यांच्यामध्ये मतभेदांची दरी वाढते आहे. आजवर सर्व पंतप्रधान हे लष्कराच्या अंकित राहिले आहेत आणि पाक लष्कराची भूमिका भारतविरोधी असे चित्र होते. तर आता प्रथमच पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल उमेद बाज्वा यांना भारत-अमेरिके सोबत मैत्री हवी े, तर इम्रान यांचे लक्ष आहे अमेरिकाविरोधावर. 

इम्रान यांनी मध्यंतरी तुर्कस्थानच्या सोबत जाऊन वेगळा इस्लामी गट स्थापन करण्याचा प्रयत्न करून सौदी आणि यूएई या पाकिस्तानच्या पारंपरिक मित्रांची नाराजीही ओढवून घेतली. २०२१ सालच्या फेब्रुवारी महिन्यात पाक लष्कराने भारतासोबतच्या मैत्रीधोरणास पािठबा दिला, त्याही वेळेस इम्रान यांनी पु्न्हा काश्मीर मुद्दय़ावरून खो घालण्याचा प्रयत्न केला. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यातही लेफ्टनंट जनरल फैझ हमीद यांच्या बदलीलाही इम्रान यांनी विरोध केला. अर्थात या सर्व प्रसंगात त्यांना माघारच घ्यावी लागली. तरीही लष्करालाही न जुमानणारा पाकिस्तानी पंतप्रधान अशी प्रतिमा तयार करण्यात ते यशस्वी ठरले. मात्र त्यांच्या निर्णयांनी देशाची अडचणच अधिक झाली. त्यामुळे इम्रान यांच्याच पक्षातील फुटीरांनी विरोधकांशी हातमिळवणी करत संसदेत त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला, तो पारित होणार हे वास्तव होते. मात्र त्याआधीच त्यांनी संसद बरखास्तीचा मार्ग स्वीकारला. अर्थात आता त्यास पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात आव्हान मिळाले आहे.

पाकिस्तानात खदखदणारा असंतोष, आंतरराष्ट्रीय संबंध, अर्थव्यवस्था या सर्वच पातळय़ांवर सपशेल अपयशी ठरल्याचे भांडवल विरोधकांनी करू नये म्हणून इम्रान यांनी अमेरिकेच्या हस्तक्षेपाचे कथानक रचले आहे. येणाऱ्या काळात इस्लामी ध्रुवीकरणाच्या मार्गाने जात पुन्हा सत्ता काबीज करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. या साऱ्याचा भारताशी तसा थेट संबंध नाही. मात्र पाकिस्तानी लष्कराने सौहार्दाचे धोरण स्वीकारलेले असताना घडणारा हा घटनाक्रम भारताच्या हिताचा नाही. १९९२ चा क्रिकेट विश्वचषक जिंकून देणारे नेतृत्व म्हणून इम्रान यांच्याकडे पाहिले जाते. तेही क्रिकेटच्याच उपमा सर्वत्र वापरतात, त्यामुळेच अखेरच्या चेंडूपर्यंत खेळेन, असे त्यांनी संसद बरखास्त करताना सांगितले खरे; पण त्यांचे अर्धे सहकारी संघ सोडून निघून गेले. शिवाय सत्तेचा चषक तर दूरच; यादवीच्या उंबरठय़ावर असलेल्या घरच्या पाकिस्तानी खेळपट्टीवरही खेळताना इम्रान यांचाच त्रिफळा उडण्याचीच शक्यता आता अधिक आहे. सर्वोच्च न्यायालय, विरोधक, लष्कर की पाकिस्तानी जनता यापैकी त्यांची विकेट कोण घेणार तेच पाहायचे आता शिल्लक आहे.

मराठीतील सर्व मथितार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan sri lanka current economic crisis and their relations with india mathitartha dd