ढगांच्या गडगडाटाला वाऱ्याची साथ लाभते, पाहता पाहता कृष्णमेघांची दाटी होते आणि क्षणार्धात विजांच्या कडकडाटात पावसाचे आगमन होते. शहर असो की गाव पावसाच्या आगमनात तसा फरक नसतो. फरक असतो तो त्या पहिल्या मृद्गंधाचा. गावात माळरानावर, नदीकिनारी त्याची मजा काही औरच असते. अफाट मोकळ्या रानावर, काळ्याशार शेताडांवर पावसाच्या थेंबाची जादूच पसरते. नदीच्या संथ वाहत्या पाण्यावर वाऱ्याने उठवलेली असंख्य वलये एका क्षणात पावसाच्या टपोऱ्या थेंबांनी विरून जातात. नदीपात्रावर, शेताडांवर त्याचेच राज्य असते. एक वेगळाच रोमँटिक फिल वातावरणाचा ताबा घेतो.
पण हा नदीकाठचा रोमँटिझम सगळीकडे सारखाच नसतं. डोंगराशेजारी वसलेलं गाव असेल तर त्याच पावसाचे हे मनमोहक रूप थोडय़ाच वेळात रौद्र रूप धारण करते. डोंगरातून झुळुझुळु वाहणारे शुभ्र ओढे मातीचा रंग लेवून वेगाने उसळू लागतात. पाहता पाहता त्या छोटय़ाशा नदीपात्राला उधळून लावतात. त्या पाण्याचा वेग पुसायची सोय नाही. पावसाचा रोमँटिझम निघून जातो आणि काळजी लागते ती नदीपल्याडच्या रानात, डोंगरात चरायला गेलेल्या जनावरांना परत आणायची. नदीच्या वाढत्या पाण्याचा लोंढा गावच्या त्या एकुलत्या एका छोटय़ा पुलाला जणू काही उखडूनच टाकायच्या आवेशाने आदळू लागतो. पाहता पाहता नदीचे पाणी पूल ओलांडते. तरीदेखील एखादा धाडसी गुराखी आपली जनावरं त्यातूनच पल्याड गावाला आणायचा अट्टहास करतोच. नशीब चांगलं असेल तर ठीक नाहीतर पुढचा भोवरा टपलेलाच असतो.
कधी कधी एखादं तास खेळ करून पाऊस शांत होतो, तर कधी त्याला खळच पडत नाही. मग नदीकाठची गुरंढोरं, शेतीची औजार सुरक्षित उंचावर हलविण्याची लगबग वाढते. शेतीची कामं अडून बसतात. गावच्या चावडीवर एकच विषय असतो, आज पाणी कुठवर आलं, कोणाच्या शेताला लागलं. कोणाचं काय नुकसान झालं, सगळीकडे पाण्याचाच विषय. मग रात्र रात्र जागून पाण्यावर नजर ठेवावी लागते. अर्थात गावाकडची माणसं नदीला देवताच मानत असतात. नदीशेजारच्या घाटावर ग्रामदेवता असते. पाणी वाढू लागलं की मग नदीची ओटी भरायची, ग्रामदेवतेला पूजा घालायची आणि मान राखायचा. नदीबद्दल असणारी कृतज्ञतेची भावना मांडणाऱ्या वर्षांनुवर्षे चालत आलेल्या या परंपरा आजही जोपसल्या जातात.
जरा दूर गेल्यावर धरणाखालच्या आणि धरणाजवळच्या गावात हीच परिस्थिती असते. तेथील नदीची पातळी वाढते ती धरणाची तहान भागल्यावर. धरणं भरू लागली आणि दारं उघडायला लागली की हळूहळू नदीचं पात्र फुगू लागत आणि नदीकाठची गावं सतर्क होतात. पाण्यापासून जपायची धडपड आणि नदीबद्दलची भावना सारखीच. धावपळ तीच, येथे शेतीबरोबर नोकरदारांची धाकधूक वाढलेली असते.
नरसोबाच्या वाडीसारखं नदीकिनाऱ्याचं तीर्थक्षेत्र असेल तर मग वाढत्या पाण्यात देवाच्या पूजेची लगबग. नरसोबाच्या वाडीत तर देवाच्या पादुकांवरून पाणी वाहू लागलं की उत्तरेकडून येणारं पाणी दक्षिणेच्या द्वारातून बाहेर पडताना त्यात स्नान करायची भाविकांची झुंबड उडते. दक्षिणद्वाराचे हे स्नान हा या पुरातदेखील एक सोहळा असतो. मग देव वरच्या मंदिरात हलविले जातात. तेथेदेखील पाणी आलं तर मग आणखीन पुढे टेंबेस्वामीच्या मठात आणि तेथे पाणी आलं तर मात्र थेट ज्यांच्या घरी पूजा सुरू आहे त्यांच्याच घरात देवाची रवानगी होते.
देवस्थान काय आणि गाव काय हे सारं गणित ठरलेलं. पाऊस पडतो, पूर येतो आणि वार्षिक सोपस्कार होत राहतात. डोंगरात आणि नदीकाठच्या गावात दोन्हीकडे पाऊस वाढला की मात्र छोटय़ा शहरांना जोडणारे छोटय़ा गावांचे छोटे पूल पाण्याखाली जाऊ लागतात. मग वर्षभर केवळ नौकाविहार करविणार हा नावाडी भर पुरात लोकांच्या गरजेला धावतो. भर पुरात खच्चून भरलेली आणि पाण्याच्या धारेबरोबर तिरकी तिरकी जाणाऱ्या नावेतून दिवसभर त्याच्या खेपा सुरू असतात. साऱ्यांची भिस्त केवळ त्या एका नावेवरच.
एखाद्या गावचा पूल मोठा असेल तर मात्र पुराचे पाणी पाहायला पोराटोरांची टोळकी पुलावरून भटकू लागतात. काही महाभाग पुराच्या पाण्यात उडय़ा मारून पोहण्याचे उद्योग करतात आणि त्यांचं हे अचाट धाडस पाहणारेदेखील मोठय़ा उत्साहात पुलावरून त्यांना चेतवत असतात. कधी कधी हेच पाणी गावांची वेस ओलांडून पलीकडे जाऊ लागते. मग काय गावातल्या सर्वानाच चेव येतो. आजूबाजूच्या गावांशी संपर्क तुटलेलाच असतो, पुराच्या पाण्यात हुंदडणं हाच काय तो एकमेव उद्योग उरतो. सकाळ-संध्याकाळ पाण्याची पातळी जोखायची, आज काय होणार उद्या काय होणार म्हणत पाण्यात भटकत राहायचं हाच उद्योग उरतो. आयाबाया पोरांना ओरडून दमून जातात, पण पोरांचा उत्साह काही कमी होत नाही. दिवसातून दोन-तीन वेळा तरी कपडे भिजविल्याशिवाय चैन पडत नाही.
फार काळ हा खेळ झेपत नाही. शेतं पाण्याखाली गेलेली असतात. गाळाने जमीन सुपीक होत असली तरी पेरण्या खोळंबतात. पेरण्या झाल्या असल्या तर पिकावर परिणाम होतो. कामं खोळंबतात. पाण्यात सारखं हुंदडून पोरंदेखील दमतात. डोंगरातला पाऊस ओसरतो, धरणाची दारं बंद होतात आणि मग पाणी ओसरू लागतं. छोटय़ा पुलांवर गुडघाभरच पाणी उरतं. घाटावर गाळाचं साम्राज्य असते. अगदीच गरज असेल तर काढला जातो नाहीतर तसाच ठेवायचा, पुन्हा येणाऱ्या पुरासाठी. काय काय नुकसान झालं याचा अंदाज घ्यायचा आणि पुन्हा रोजच्या रहाटगाडग्यात सामील व्हायचे.
संग्रहित लेख, दिनांक 1st Aug 2014 रोजी प्रकाशित
पावसाळा विशेष : पाऊस नदीकाठचा..
धरणं भरू लागली आणि दारं उघडायला लागली की हळूहळू नदीचं पात्र फुगू लागत आणि नदीकाठची गावं सतर्क होतात. पाण्यापासून जपायची धडपड आणि नदीबद्दलची भावना सारखीच.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 01-08-2014 at 01:13 IST
मराठीतील सर्व कव्हर स्टोरी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Monsoon special