‘लोकप्रभा’चा नवरात्र विशेषांक पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचनीय, सर्वागसुंदर होता. आशुतोष बापच यांनी मांडलेली दहा शक्तिस्थाने अथांग भक्तिभाव अंतर्यामी उसळत ठेवणारी वाटली. छोटय़ा छोटय़ा गावांतील देवींच्या मूर्तीची, देवालयांची अप्रतिम छायाचित्रे, वैशिष्टय़े, भौगोलिक स्थान, इतिहास, सेवांची विभागणी, सश्रद्धतेने, पिढय़ान्पिढय़ा पद्धतशीरपणे परंपरा सांभाळत कष्टणारे विविध धर्म, जातीजमातींचे सेवेकरी ही सारी विश्लेषणात्मक माहिती आपण या अंकात दिली आहे. देशविदेशातील देवीपुराण थक्क करणारे आहे. ‘लोकप्रभा’च्या माध्यमातून आपण लेखातून जागरण, उत्तम व्यवहार्य व आदर्श विचारांची सांगड घालून हीच खरी दुर्गापूजा केली आहे
– प्रा. अनुराधा गुरव, कोल्हापूर.
निसर्गाच्या शक्तीची पूजा
‘लोकप्रभा’चा नवरात्र विशेषांक सुंदर आणि संग्राह्य़ होता. ‘भुलाबाई उत्सव, वैदर्भीय लोकसंस्कृतीचा ठेवा’ हा संतोष विणके यांचा लेख माहितीपूर्ण होता. महाराष्ट्रात उर्वरित ठिकाणी प्रसिद्ध असलेला भोंडला विदर्भात भुलाबाईच्या उत्सवाच्या स्वरूपात साजरा केला जातो. पश्चिम महाराष्ट्रात भोंडला किंवा हादगा (हातगा) हा धार्मिक स्वरूपाचा खेळ म्हणून खेळला जातो, तर विदर्भात भुलाबाई ही मुलींनी करावयाची पूजा आहे. खानदेशात या पूजेला गुलाबाई असे म्हणतात. भुलाबाई आणि गुलाबाई हे शब्द येतात, तर खानदेशात गुलोबा व गुलाबाई असे शब्द येतात. काही बोलीभाषांमध्ये भुलाबाईला भुलाई म्हणतात. भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी गुलाबाईची चित्रे व मातीच्या मूर्ती बाजारातून आणल्या जातात, त्याचबरोबर भोपळा, वांगी, काकडी, मक्याचे कणीस, मुळा, गाजर, कारले, मिरची, घेवडा, दोडके, पडवळ, सीताफळ अशा प्रकारची फळे, भाज्या एकत्र करून गुलाबाईची पूजा करण्याची पद्धत आहे. कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी या उत्सवाची सांगता होते. अशा प्रकारची देवीची पूजा आणि उत्सव हा महाराष्ट्राचा एक मोठा सांस्कृतिक वारसा आहे आणि आजही तो ग्रामीण भागात पूजा आणि लोकगीतांच्या माध्यमातून जपला जात आहे, ही एक चांगली बाब आहे. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे आणि डॉ. सरोजिनी बाबर यांनी भोंडला आणि हादग्याची गाणी याविषयी आपल्या साहित्यात लेखन केले आहे. हादगा म्हणजे निसर्गाच्या शक्तीची उपासना असल्याचे मत डॉ. सरोजिनी बाबर यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी हादग्याची अनेक सुंदर गाणी जमा केली आणि ती प्रकाशित करून लोकसाहित्यात मोलाची भर घातली आहे. त्यातील एका भोंडला वाचकांसाठी.
आड बाई आडवनी
आड बाई आडवनी
आडाच पाणी खारवणी
आडात होता गणोबा
गणोबा देव चांगला
गणोबा आमचा सत्याचा
पाऊस पडला मोत्याचा
आड बाई आडवनी
आडाचं पाणी खारवणी
आडात पडला शिंपला
आमचा भोंडला संपला
– सुहास बसणकर, दादर, मुंबई.
उत्सव कसा नसावा याचे प्रात्यक्षिक
‘र्निबध वाढूनही आवाज मोठ्ठाच!’ (१९ सप्टेंबर) हा लेख वाचला. आपल्याकडे एक प्रथाच पडली आहे, की एखादी त्रासदायक गोष्ट करू नका अथवा तिच्यावर र्निबध टाकले तरी ती पूर्वीपेक्षाही जोरदारपणे करण्याचा हट्टीपणा केला जातो. यातून चांगले असे काहीच साध्य न होता तापदायक गोष्टींतच वाढ होते. अशी ही विचित्र मानसिकता नक्कीच घातकी आहे. गणेशोत्सवात, विसर्जनप्रसंगी होणारे ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी पोलिसांनी आपले अधिकार वापरणे अत्यावश्यक होते. दरवर्षी ध्वनिप्रदूषणाची पातळी झपाटय़ाने वाढत आहे. डेसिबलचे आकडे फुगत चालले आहेत. डीजे, बेंजो आदींचा मुक्तपणे वापर करून गोंगाट निर्माण करण्यात भर घालणाऱ्या अतिउत्साहींना कोणाला त्रास होईल याची फिकीर नाही आणि सर्वावर कडी म्हणजे पोलिसांनाही न्यायालयाचे आदेश पायदळी तुडवले जात असल्याची कदर नाही. परिणामी रुग्ण मंडळींना दोनच पर्याय उरतात. ते म्हणजे एक तर काही दिवस शांत ठिकाणी वास्तव्यास जा व दुसरा म्हणजे जे कानावर आदळत राहील ते मुकाटय़ाने सहन करत बसा.
आपण वैयक्तिक चंगळवादात इतके गुरफटलो आहोत, की इतरांचा विचार करणे हा भागच आपल्या ध्यानीमनी नाही. हे सूत्रच दिवसेंदिवस लोप पावत चालले आहे. इतके आपण संवेदनशून्य होत उत्सव साजरे करत असल्याने नको तो उत्सव असे वाटू लागल्यास गैर ते काय?
उत्सवात सहभागी व्हा अथवा होऊ नका, आपल्याला घरबसल्या दणदणाटाची ‘फ्री होम डिलिव्हरी’ मिळते. आपण शिक्षणाने, भौतिक सुखसाधनांनी पुढारलो; पण काय योग्य, अयोग्य याचे वर्गीकरण करून योग्य गोष्टींचा वापर अग्रक्रमाने झालाच पाहिजे याबाबत मात्र अडाणीच राहिलो. माणसाने उत्सवांची हेळसांड सुरू करून त्याचे खेळणे करत त्यास आपले हक्काचे करमणुकीचे साधन केले आहे. यातून आपल्याला काय साध्य करायचे आहे आणि आजपर्यंत काय साध्य केले आहे. याचा काही ताळमेळच नाही. पण एकंदरीत सुधारण्याकडे वाटचाल न होता बिघडण्याकडे अभिमानाने पडत असलेली पावले सण-उत्सवांचा विचका करत आहेत.
उत्सवांचे बदलते स्वरूप ते उत्सव अधिकाधिक गडबड, गोंगाट होईल अशा प्रकारे होणे अयोग्यच आहे. स्पर्धा करण्यासाठी लाऊडस्पीकर लावून दणदणाट केलाच पाहिजे, विजेची रोषणाई झालीच पाहिजे, फटाक्यांवर पैसे उधळलेच पाहिजेत आदी गोष्टी केल्या नाहीत, तर उत्सव पार पडल्याप्रमाणे वाटत नाही का? उत्सव कसा असावा यापेक्षा तो कसा नसावा याचेच प्रात्यक्षिक यशस्वी करून दाखवण्यात धन्यता मानणारे आजमितीस वेगाने वाढत आहेत.
– जयेश राणे, भांडुप, मुंबई, ई-मेलवरून.
दर्जेदार विशेषांकांची हॅट्ट्रिक
गणपती, नवरात्र व आता रुचकर असे एकापेक्षा एक सरस विशेषांक काढून ‘लोकप्रभा’ने हॅट्ट्रिक केली आहे. अभिनंदन! वैशाली चिटणीस यांच्या ‘फराळाची दिवाळी’ने जुन्या आठवणी जाग्या केल्या. लेख छानच आहे. मात्र करंजीसाठी आम्ही जुन्या पिढीतील (विशेषत: सीकेपी समाजातील) बायका मैद्याऐवजी रवा वापरून प्रत्येक पारीला कॉर्नफ्लोअर व तुपाच्या मिश्रणाचे सारण लावून लाटय़ा लाटतो. त्यामुळे करंजीला सुंदर पदर सुटतात.
– उज्ज्वल चित्रे, ठाणे (पूर्व), ई-मेलवरून.
त्याचे नाव काय?
‘लोकप्रभा’च्या २९ ऑगस्टच्या अंकात ‘वाचकांचा सहभाग’ सदरातील ग. द. लागू यांनी पस्तीस वर्षांपूर्वी घडलेला रेल्वेमधील प्रसंगाचे वर्णन करून त्यांच्या बरोबर आपल्यालाही पुन:प्रत्ययाचा आनंद दिला. त्यात स्वत:ची होणारी गैरसोय, नुकसान टळल्याचा आनंद तर होताच, शिवाय एका प्रामाणिक, नि:स्पृह वृत्तीच्या गँगमनच्या (रेल्वे कर्मचारी) अलौकिक वर्तणुकीचा यथार्थ गौरवही!
बस कंडक्टर, रिक्षावाले, क्वचित एखाद्या ऑफिसमधील कर्मचारी यांचे बाबतीत घडलेले असे प्रसंग ‘प्रामाणिक’पणाचे कौतुक म्हणून आपण बरेच वेळा ऐकलेले, वाचलेले असतात. अशी जगावेगळी वागणारी माणसे आहेत, त्यांचे कौतुक, कदर करणारी माणसे आहेत म्हणूनच जगात चांगुलपणा टिकून आहे, हेही निर्विवाद. असे प्रसंग भावुकतेने सांगत असताना बहुतेक वेळा अशी उपकृत झालेली व्यक्ती त्या प्रामाणिक व्यक्तीला देवाचा प्रतिनिधी बनवून टाकते.
वर उल्लेखिलेल्या प्रसंगात लागूंनी संबंधित रेल्वे कर्मचाऱ्याचे (गँगमन) नाव विचारून घेतले असते, आणि आज पस्तीस वर्षांनी सदर प्रेरणादायक प्रसंगाची आठवण सांगताना त्याचाही उल्लेख केला असता तर ते वाचून कदाचित लागूंपेक्षाही जास्त आनंद त्या गँगमनला झाला असता. ‘लोकप्रभा’चा हा अंक आपल्या नातवंड, पतवंड, स्नेह्य़ांना दाखवून त्यांच्याही मनातील प्रामाणिकपणाचे स्फुल्लिंग आणि स्वत:बद्दलचा अभिमान जागृत ठेवतानाच कृतकृत्य, धन्य झाल्याच्या आनंदात ते (गँगमन) बुडून गेले असते.
– अनिल ओढेकर, नाशिक.
एकटय़ा बाईचं बाळ…
‘एकटय़ा बाईचं बाळ’ हा माधव गवाणकर यांचा १० ऑक्टोबरच्या अंकातील हृद्यस्पर्शी लेख वाचनात आला. आताच्या काळात विवाहसंस्था टिकणे अवघड झाले आहे. पूर्वीच्या काळातील पुरुषांच्या दादागिरीखाली राहणारी स्त्री आज पूर्णपणे बदलली आहे. पुरुषांची दादागिरी आजची स्त्री हाणून पाडते. विवाह न करता बाळ दत्तक घेण्याकडे महिलांचा कल वाढू लागला आहे. आजची स्त्री उच्चशिक्षित आहे. आर्थिकदृष्टय़ा सक्षम आहे. ती एक वेळ पुरुषसुखाला तिलांजली देऊ शकेल; पण ती नवऱ्याची अरेरावी पसंत करणार नाही. आपल्या जीवनात पुरुष नसला तरी चालेल; पण एक मूल हवं, असं तिला सतत वाटत असतं, कारण वात्सल्याची तहान तिला ती असल्यापासून बाळगलेली असते. लग्न करून मातृसुख मिळवण्यापेक्षा अविवाहित राहून बाळ दत्तक घ्यायला काय हरकत आहे, एखाद्या अनाथाला आईचे प्रेम मिळेल, स्वत:ची मुलं पुढेमागे आपल्याला वृद्धाश्रम दाखविणारी असतील, तर हे अनाथ मूल नक्कीच आपल्याप्रति कृतज्ञ राहील. नवरा नाही, पण मूल सांभाळेल म्हणून त्या स्त्रीवर टीका करण्याचा कोणालाही हक्क नाही. खरे तर तिचा सन्मानच व्हायला हवा.
– रश्मी आगास्कर, बोरिवली (प.), मुंबई.
अंक आवडला
‘लोकप्रभा’ची संपूर्ण टीम अगदी मनापासून, जीव ओतून उत्कृष्ट ते वाचकांना देण्याचा प्रयत्न करतेय म्हणून लोकप्रभा दिवसेंदिवस अधिकाधिक लोकप्रिय होत आहे. पूर्ण टीमला त्रिवार नमस्कार. लोकप्रभाने वाचक-प्रतिसाद, वाचक प्रतिक्रिया, वाचक सहभाग व वाचक लेखक अशा विविध सदरांत वाचकांना ‘लेखक’ बनवून, लिहिते करून त्यांना सजग, सतर्क अन् कार्यशील सहभागी बनवण्याचा उपक्रम सुरू केला आहे. लोकप्रभा लोकप्रिय होण्याचे हेही एक कारण आहे.
१८ जुलैचा अंक सर्वतोपरी अप्रतिम तर आहेच. ‘युद्ध’च्या निमित्ताने अत्याधिक यशस्वी अधिनायक अमिताभ बच्चनची घेतलेली मुलाखत खूप म्हणजे खूपच भावली, पण टी.व्ही.संदर्भातले त्याचे विचार पटणारे नाहीत. बाजारवादाने टी.व्ही.वर अनेक फालतू वाहिन्या कार्यरत आहेत, शिवाय तथाकथित वार्तावाहिन्यांची व्यापारीवृत्तीने सनसनाटी पसरवणाऱ्या बातम्या देणे खचितच उचित म्हणता येणार नाही. आदित्य डोंगरेंचा अर्जुनासंदर्भातला लेखही उत्साह वाढवणारा वाटला.
– महादेव मारुती बासुतकर, सिकंदराबाद, ई-मेलवरून.
आंबा बागायत उपयुक्त माहिती
डॉ. विकास श्रीधर सांडू यांचा १८ जुलच्या ‘लोकप्रभा’मधील ‘आंबा बागायत – एक शास्त्रीय दृष्टिकोन’ हा लेख वाचला. अगदी सूक्ष्मतेने अभ्यास केल्याने प्रत्येक अडचणीवर / रोगावर उपाय सुचवले आहेत. आंबा बागायतदारांसाठी अत्यंत उपयुक्त माहिती त्यात आली आहे. लहानात लहान शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचणे आवश्यक वाटते. यामुळे बागायतदारास, माहिती देणाऱ्यास, खते बनवणाऱ्यास आणि महत्त्वाचे म्हणजे आंबे खाणाऱ्यास फायदा होईल.
– विजय कुलकर्णी, ठाणे (ई-मेलवरून)