प्रामुख्याने पुणे शहराच्या शेजारील शहरातून पुण्यात येणारे रस्ते, टेकडय़ांचे परिसर त्याचप्रमाणे धरण क्षेत्राजवळच्या जागांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्याबाबतच्या जाहिरातीही अलीकडच्या काळामध्ये विविध माध्यमांतून केल्या जात आहेत. फार्म हाऊस किंवा बंगला बांधण्यासाठी मोकळी जागा खरेदी करण्यासाठी काही वेळा हप्त्याचीही सोय करण्यात येत असल्याने या गुंतवणुकीकडे अनेक जण वळले असल्याचे दिसून येते. सेकंड होम किंवा निसर्गरम्य ठिकाणी बंगला बांधण्यासाठी पूर्वी केवळ तळेगावच्या परिसराचा विचार केला जात होता. त्यामुळे मागील काही काळात तळेगावच्या परिसरात मोठय़ा प्रमाणावर बांधकामे झाली. एखाद्याची ऐपत असल्यास थेट लोणावळ्याच्या निसर्गरम्य परिसरातही बंगला उभारण्याचा विचार केला जायचा. मात्र सद्य:स्थिती लक्षात घेता आता सेकंड होम, फार्म हाऊस किंवा बंगला उभारण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायी जागा उपलब्ध झाल्या आहेत. भोर परिसर, वेल्हा परिसर, खानापूर परिसर, सातारा रस्ता परिसर, लोणी-हडपसर परिसर, मुळशी, वेल्हा परिसर, पानशेत परिसर, शिरवळ परिसर अशा सर्व भागांमध्ये छोटे प्लॉट उपलब्ध झाले आहेत. हे प्लॉट खरेदी करण्याचे प्रमाण वाढले आहे. शहराकडे येण्यासाठी रस्त्याची चांगली व्यवस्था असणाऱ्या भागांमध्ये एकत्र मोठी जमीन घेऊन त्याचे छोटे प्लॉट पाडले जातात आणि त्या प्लॉटना सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. तारेचे कुंपण वा सीमाभिंत, विजेचा मीटर, नळजोड, सुरक्षेसाठी छोटी केबिन अशा सर्व सोयी-सुविधा असल्यामुळे अशा योजनांना चांगली मागणी आहे.
शहरातील कोलाहालातून काही दिवस मोकळ्या वातावरणात व आपल्या हक्काच्या घरात जाऊन राहण्यासाठी अशा सर्व सुविधायुक्त प्लॉटवर छोटा बंगला किंवा छोटे घर बांधले जाते. शेतीची आवड असणाऱ्यांकडून घराच्या बाजूला हौस म्हणून काही तरी पिकविण्याचाही प्रयत्न केला जातो. शनिवार-रविवार वा सुट्टीत या ठिकाणी राहायला जाता येते. त्यामुळे नव्या कुठल्या पर्यटनस्थळी जाण्यापेक्षा स्वत:च्याच जागेत किंवा छोटय़ा शेतात राहण्याचा आनंद मिळतो. त्याहीपुढे जाऊन थोडी मोठी जागा किंवा शेत खरेदी करून ती पर्यटकांसाठी विकसित करण्याचेही प्रमाण पुणे परिसरात वाढत आहे. पानशेत परिसराबरोबरच पवना धरण क्षेत्रामध्ये सध्या वेगवेगळे प्रकल्प उभे राहताना दिसत आहेत. घरातून बाहेर पडल्यानंतर डोळ्यासमोर दिसणारा जलाशय व हिरवाई कोणालाही सुखावून टाकेल. त्यामुळे प्रामुख्याने अशा ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टीने प्रकल्प उभे करण्यात येत आहेत. आठ-दहा कुटुंबांची राहण्याची चांगली व्यवस्था आणि अन्य सर्व त्या सोयीसुविधा अशा ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातात. असे अनेक नवे ‘पिकनिक स्पॉट’ पुण्याजवळ विकसित झाले आहेत. ही ठिकाणे कमी गर्दीची असल्याने त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
मोठय़ा प्रमाणावर प्रकल्प उभा करण्याबरोबरच स्वतंत्रपणे स्वत:च्याच जागेत अशा प्रकारे चांगला व्यवसाय चालवणाऱ्यांची मोठी संख्या आहे. शहरापासून जवळ असणाऱ्या व निसर्गाच्या सान्निध्यात असणाऱ्या भागामध्ये बंगला किंवा रो हाऊस बांधून सुट्टीत तेथे राहायला जायचे, इतकी एकच कल्पना नव्हे, तर त्यातून व्यवसायाचे गणितही अनेकांकडून साधले जात आहे. आपण राहत नसताना बंगला किंवा रो हाऊस एखाद्या पर्यटकाला भाडय़ाने देण्याचा उपक्रमही राबविला जातो. वर्षभर त्या ठिकाणी सुरक्षारक्षक ठेवला जातो. त्याचप्रमाणे वीज किंवा इतर गोष्टींचे भाडेही वर्षभर भरावे लागते. त्यामुळे हा सर्व खर्च या भाडय़ामधून काढला जातो. शहरापासून दूर निसर्गाच्या सान्निध्यात काही दिवस घालविण्याची संधी त्या निमित्ताने इतरांनाही मिळू शकते.
पावलस मुकुटमल
संग्रहित लेख, दिनांक 13th Mar 2015 रोजी प्रकाशित
रिअल इस्टेट विशेष : स्वप्नातले घर…
पुणे शहरात आणि उपनगरांतील गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये ज्या पद्धतीने गुंतवणूक केली जाते तशाच पद्धतीने पुणे परिसराच्या लगत असलेल्या भागांमध्ये आता छोटी जागा, एखादे छोटे शेत, फार्म हाऊस किंवा बंगलो...

First published on: 13-03-2015 at 01:29 IST
मराठीतील सर्व कव्हर स्टोरी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Real estate special