प्राचीन इतिहास, भव्य प्रासाद, दे ग्रेट वॉलसारखं जगातलं मानवनिर्मित आश्चर्य, चवीढवीच्या खाद्यपदार्थाची रेलचेल आणि चिनी संस्कृतीबद्दल जगात सगळीकडे असलेले गूढ आकर्षण.. चीनला जायला आणखी काय हवे?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चीन म्हटले की चायनीज फूड, चिली चिकन, मांचुरिअन चिकन, पेकिंग डक, नूडल्स असे कँटनीज्, सिचुआन, मंचुरिआ असे पदार्थ डोळ्यांसमोर यायला लागतात. याशिवाय अवकाशातून दुर्बिणीशिवाय दिसणारी मानवनिर्मित एकमेव गोष्ट म्हणजे ‘ग्रेट वॉल ऑफ चायना’, ह्य़ु एन संग यांची भारत भेट, १९६२ मधील भारत-चीन युद्ध या गोष्टीही आपण विसरू शकत नाही. शिवाय हल्ली खेळणी, विजेचे सामान, आकाशदिवे, अगदी गणपतीसुद्धा अशी आपली बाजारपेठ बऱ्याच अंशी व्यापून टाकलेल्या देशाबद्दल कुतूहल असणे साहजिकच आहे.
पीपल्स रिपब्लिक ऑफ चीन हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश. रशिया, कझाकिस्तान, मंगोलिया, भारत, नेपाळ, पाकिस्तान, नेपाळ, थायलंड, म्यानमार अशा १४ देशांशी संलग्न सीमा असल्याने २२ हजार किमी सरहद्द असलेला, रशिया, कॅनडा यांच्या खालोखाल प्रचंड भूभागाचा देश म्हणजे चीन. त्यामुळे काही अंशी ताकलामाकन्, गोबीसारखा वाळवंटी, यांगसे, यलो नद्या, तर ब्रह्मपुत्रा, मेकाँगसारखे नद, त्यामुळे सुपीक भाग, उंच पठारे अशी भौगोलिक विविधता इथे आहे.
बीजिंग, पूर्वीचे पेकिंग ही चीनची राजधानी. इथली खासियत म्हणजे आठ हजार किमी लांबीची चीनची भिंत, तसंच तिआनमेन स्क्वेअर. शहराच्या मध्यभागी असलेल्या मिंग राजवटीतील राजवाडा, फॉरबिडन सिटी, त्याभोवती असलेल्या तटबंदीच्या काही प्रवेशद्वारांपैकी एक म्हणजेच तिआनमेन स्क्वेअर. पण चौकाच्या विस्तारासाठी ते द्वार तोडून त्या भागाला तिआनमेन स्क्वेअर असे नाव दिले. या प्रचंड चौकात १९८९ मध्ये विद्यार्थ्यांनी सरकारविरुद्ध बंड केले होते. तेव्हा सैन्याने जमावावर बेधुंद गोळीबार करून १० हजारांवर कार्यकर्त्यांना मारले होते. ती आठवण म्हणून तिथे मोन्युमेंट ऑफ पीपल्स हीरो, गेट टु पीस ऑफ हेवन, नॅशनल म्युझियम आहेत. पण त्याबाबत विचारणा केली तर इथे काहीच झाले नाही असे सांगण्यात येते. या चौकात भरपूर सिक्युरिटी कॅमेरे आहेत तसेच पोलीस व गुप्तचर खात्याचे लोकही फिरत असतात. त्यामुळे वावरताना सावधगिरी बाळगावी लागते. आवारात ह्य़ु एन संग व माओ त्से तुंग यांचे म्युझियम आहे. माओ त्से तुंग यांच्या देहाची ममी करून म्युझियममध्ये ठेवलेली आहे.
चौकात प्रवेश केल्यावर आपण ‘गेट ऑफ चायना’मधून फॉरबिड्न सिटीमध्ये प्रवेश करतो. ५०० वर्षे राज्य करणाऱ्या किंग, मिंग राजवटीत देशात बरेचसे राजवाडे बांधले गेले. पण यासम हाच. ८० हेक्टरच्या वर क्षेत्रफळ असलेल्या या राजवाडय़ाभोवती पाण्याचा खंदक आहे. चारही कोपऱ्यांवर टॉवर्स आहेत. गेटमधून आत आल्यावर वाहणाऱ्या गोल्डन रिव्हरच्या प्रवाहावर संगमरवरी पूल आहेत. त्यानंतर तीन प्रशस्त हॉल आहेत.

पाहा फोटो गॅलरी : अवाढव्य व भव्य चीन

प्रथम लागतो तो सुप्रीम हार्मोनी हॉल. या ठिकाणी राजकीय समारंभ होत. छतावर पीळदार चायनीज ड्रॅगन आहे. त्याच्या तोंडातून लटकत असलेल्या धातूच्या गोळ्यांमुळे ते झुंबर असल्यासारखे वाटते. त्या हॉलमध्ये ड्रॅगनसारखे लाकडी सिंहासन आहे. त्यावरील चिनी नक्षीकाम अतिशय सुंदर आहे. दुसरा हॉल कार्यप्रसंगी राजाने विश्रांती घेण्याचे, पुढल्या समारंभासाठी तयारी करण्याचे स्थान. तिसरा, हॉल ऑफ हार्मोनीमध्ये मिंग राजाचा संगमरवरी रथ ठेवलेला आहे. बरोबर राजाने भोयांतर्फे खुर्चीत बसून वाडय़ाचा फेरफटका करण्यासाठीची खुर्ची आहे.
टेम्पल ऑफ हेवन हे देवाची करुणा भाकण्यासाठी बांधलेले मिंग राजघराण्याचे देऊळ, ब्रिटिश व फ्रेंच सैन्याबरोबर झालेल्या लढाईत त्यांच्या सैन्याने हत्यारे, दारूगोळा, घोडे ठेवण्यास वापरले होते. त्या वेळी इथल्या मौल्यवान चीजा चोरीला गेल्या, बरीच नासधूस, जाळपोळ झाली. स्वतंत्र चीनमध्ये पुनर्बाधणीनंतर रीतसर मिंग पद्धतीने प्रार्थना झाल्यानंतरच सर्वासाठी खुले करण्यात आले.
या सर्वापासून अलग असा परिवारासाठीचा असलेला भाग हा वेगवेगळ्या फुलझाडे, फळझाडांच्या बागांनी सजलेला. लहान लहान कारंजांभोवती दगडी शिल्पे कोरून जागेचे सौंदर्य वाढवले आहे. राजवाडा व आतील सर्व सामान लाकडी असून त्यावर सुंदर चिनी कलाकुसर आहे. तिआनमेन स्क्वेअरच्या शेवटच्या द्वारावर दोन ब्राँझचे हत्तींचे पुतळे वाकून राजाला कुर्निसात करत आहेत असे दर्शविले आहे. कारण त्या वेळी राजवाडय़ात येणाऱ्यांनी नऊ वेळा डोके टेकून राजाला अभिवादनाची रीत होती.
पूर्वी परकीयांच्या आक्रमणापासून रक्षण म्हणून गावाभोवती वेस बांधली जात असे. चीनच्या काही भागांत पर्वत, नद्या असल्याने नैसर्गिक वेस झाली होतीच, पण काही ठिकाणी दगड-धोंड-माती, लाकडांनी तर कुठे खंदक करून अशी उत्तर भागात पूर्वेपासून ते पश्चिमेपर्यंत आठ हजार ८५० किमी लांबीची वेस बांधली गेली. आता आपण पाहतो तो बीजिंग वॉलचा भाग हे जगातील मानवनिर्मित आश्चर्य मानले गेले आहे.
त्या वेळीही त्यावर ठिकठिकाणी टेहळणी बुरूज, चौक्या होत्या. नंतरच्या काळात ती पक्की बांधली गेली. काही ठिकाणी त्यात बोगदे, कुठे पूल आले, त्यातील दगड घरे, पार्क बांधण्यासाठी वापरले गेले. त्यामुळे ती कुठेकुठे ढासळली आहे, पण बीजिंगच्या भागात ती चांगली आहे. आपण ठरावीक उंचीपर्यंत लिफ्टने जाऊ शकतो, पण नंतर आपल्याला चढावे लागते. हा भाग उंच डोंगरावर असल्याने वर जोरदार थंड वारा असतो.
शांघाय शहर यांगस्ते, व्हांगपू नदी यांच्या बेचक्यातला भाग. पूर्वीपासूनच हे सर्वात मोठे व्यापारी केंद्र गणले गेले आहे. पूर्वीपासून देश-विदेशाशी या शहराचा व्यापार चालत असे. युरोपीय देशांनी तेथले भौगोलिक महत्त्व जाणून नदीतील गाळ व मॅन्ग्रोव्हसारख्या वनस्पती बाजूला करून तिथे भरणी घालून केलेला भाग म्हणजे शांघाय बंड. तिथे त्यांच्या बँका, स्टोअर्स होते. १९ व्या शतकात तिथल्या व्यापारात वाढ होऊन तिथे भव्य, कलात्मक इमारती उभ्या राहिल्या.
११ लहानमोठय़ा धातूच्या गोळ्यांनी बनलेला ४५० मी. उंच ओरिएंटल पर्ल टीव्ही टॉवर तीन प्रचंड खांबांच्या आधारावर उभा आहे. वेगवेगळ्या उंचीवरून नजारा पाहण्याची सोय आहे. जवळच रोमन देवतेचा मुकुट असल्यासारखी बंड सेंटरची इमारत हे तेथील पंचतारांकित हॉटेल आहे. तायपिंगबरोबर झालेल्या लढाईत वीरगती मिळालेल्यांचे मेमोरिअल आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. रात्रीच्या वेळी पलीकडच्या तीरावरून रोषणाईतल्या इमारती फारच सुंदर दिसतात.
यांच्याबरोबरीने इथले आणखीन आकर्षण म्हणजे इथली ट्रान्स रॅपिड, ताशी ४५० किमी. वेगाने धावणारी जगातील सर्वात फास्ट मेग्लेव्ह ट्रेन. या ट्रेनला चाके, रूळ नाहीत. ती चुंबकीय तत्वावर जमिनीला स्पर्श न करता धावते. शांघाय विमानतळापासून सिटी सेंटरला आपण फक्त आठ मिनिटांत पोहोचतो. गाडी सुरू झाल्यापासून ४३० किमी पर्यंत पोहोचलेला वेग आपण डब्यातल्या इंडिकेटरवर पाहू शकतो.
पाचू बुद्ध मंदिर हे टिपिकल स्टाइलचे चिनी देऊळ. म्यानमार येथून एक बसलेला व दुसरा महानिर्वाणाच्या वेळेस झोपलेला असे बुद्धाचे पाचूचे दोन पुतळे आहेत. ग्रँड हॉलमध्ये मोक्ष पावलेल्या त्याच्या भिख्खूंचे सोन्याचे पुतळे आहेत. देवळाच्या आवारात असंख्य चायनीज लँटर्नस् लटकलेले असतात, सुवासिक अगरबत्ती सतत जळत असल्याने परिसर प्रसन्न वाटतो. झुजिज्याव (उच्चारण्यास कठीण) नदीच्या कालव्यात फ्लोटिंग व्हिलेजला व्हेनिस ऑफ शांघाय म्हणतात. शिकाऱ्यातून फिरताना दल लेकमध्ये फेरी मारल्यासारखे वाटत खरे, पण पाणी स्वच्छ नाही.
येथील यू गार्डन हे देशातले किंग, मीन काळातील सर्वात मोठे गार्डन. या गार्डनमध्ये लहान-मोठे हॉल, दगडी शिल्पे, लाकडावरील नक्षीकाम, लहान लहान तळी आहेत. परिसरातील फुले तळ्यातील सोनेरी माशांची पळापळ त्या जागेला अधिक शोभिवंत करतात.
सर्कसमध्ये प्राण्यांच्या करामतीसाठी जगभरात बंदी आल्यामुळे आता सर्कसमध्ये फक्त मानवी करामतीच पाहायला मिळतात. शांघायमधील चायनीज सर्कस म्हणजे मानवी देह किती लवचीक असतो याचे प्रात्यक्षिक. ते प्रयोग पाहताना आपण अक्षरश: खुर्चीला खिळून बसतोच.
शेकडो वर्षांपूर्वी इथले व्यापारी शिअ‍ॅन येथून डोंगर-दऱ्या, नदी-नाले पार करून नेपाळ, तिबेट, भारत, अरबस्तान, तसंच युरोपच्या काही भागात जात असत. हा व्यापार खासकरून सिल्कचा असल्याने त्या वाटेला सिल्क रूट हे नाव पडले. आणि त्याचे वैशिष्टय़ म्हणजे हा सिल्क रूट अजूनही चालू आहे. भारतात तो सिक्किममधील नथूला पास येथून पुढे तो तिबेटच्या शिगात्से गावातून येतो.
शिअ‍ॅन येथूनच १७ वर्षे या रूटवर चालत ह्य़ु एन् संग हा चीनी प्रवासी भारतात कपिलवस्तू, सारनाथ, बोधगया अशा बुद्ध धर्माच्या पवित्र ठिकाणी त्या धर्माविषयी जाणून घेण्यास आला होता. भारतात विविध ठिकाणी फिरताना त्याने आपल्या सामाजिक, राजकीय, धार्मिक रीतींविषयी जाणून घेतले. परतताना बुद्धाचे पुतळे व धर्मसूत्रे घेऊन गेला. चीनमध्ये गेल्यावर त्याने त्यांचे भाषांतर करून ठेवले. कार्य सिद्ध होण्यास त्याने घेतलेले कठोर परिश्रम, एकाग्रतेचे मूर्तिमंत उदाहरण आहे असे मानायला पाहिजे.

पाहा फोटो गॅलरी : अवाढव्य व भव्य चीन

जमिनीखालील टेराकोटा म्यूझियम हे शिअ‍ॅन येथले मुख्य आकर्षण. या ठिकाणाला भूगर्भातील कोठारच म्हटले पाहिजे. अलीकडेच म्हणजे १९७३ साली कुणा कामगाराला जमीन खोदताना टेराकोटाचे काही दगड नजरेस पडले. त्यांचा वेगवेगळ्या कामाकरिता वापर केला गेला, पण पुढे प्रमाण बरेच वाढल्याने सरकारने केलेल्या संशोधनात कीन् राजवटीतील सैेनिक, त्यांची रसद, रथ घोडे असल्याचे पाहिले. तीन वेगळ्या खंदकात हा खजिना होता. पहिल्या भागात सैेनिक त्यांच्या पदाप्रमाणे वेषभूषा, केशभूषा, कपडय़ांवर पदके असे आहेत. दुसरा विभाग तोफा, घोडदळ, पायदळ, बाण, ढाली, तलवारी रथ यांचा. तिसऱ्यात उच्च पदाधिकारी त्यांच्या रथात स्वार आहेत असा. त्या वेळी तलवारी, भाल्यांवर काही रसायनांचा लेप लावल्याने आज दोन-अडीच हजार वर्षांनंतरही त्यावर गंज चढलेला नाही.
लांबरुंद पायथ्यावर ४० मी. उंचीचा मिंग काळातील बेल टॉवर असून त्यावर एक टन वजनाची तांब्याची घंटा आहे. चिनी भाषेत सुशोभित केलेल्या बऱ्याचशा डफनी पहिला मजला सजला आहे असे म्हटले पाहिजे. पण आपण त्यांना हात लावू शकत नाही, शिवाय आतमध्येही फार जुने डफ आहेत. शिअ‍ॅन बिग गुझ पॅगोडा हा नेहमीप्रमाणे गोल नसून लाकडी, चौकोनी आहे. ु एन संगने भारतातून नेलेली बौद्ध धर्माची सूत्रे त्यात आहेत.
ली नदीकाठचे गुईलीन हे शहर निसर्गत:च सुंदर आहे. इथे फिरायचे म्हणजे ली नदीवरील क्रूझनेच. क्रूझवर आमचे स्वागत झाले ते चायनीज ताई-ची खेळाची प्रात्यक्षिके पाहातच. सहज लीलया फिरणारे त्या युवतीचे हात, अंगाची वळणदार हालचाल छानच वाटत होती. हे पाहताना बोट सुरू झालेली कळलेच नाही पारदर्शी, निळ्याशार पाण्यातून विहरण्याची मजा मस्तच होती. भोवताली लाइम स्टोनचे डोंगर, हिरवीगार कुरणे, बांबूची बने, मासेमारी करणारे कोळी, हा देखावा म्हणजे एखाद्या दृश्याचा पॅनोरॅमा.
इथे फिशिंगचा नवीनच प्रकार पाहायला मिळाला. दिवेलागणीच्या वेळी आम्ही बोटीने नदीवर एके ठिकाणी गेलो. तिथे एक कोळी तराफ्यावर दोन-तीन पाणकावळा पक्षी घेऊन बसला होता. पाणकावळा हे पक्षी नदीवरच राहणारे असल्याने मासे पकडण्यात हुशार. कोळ्याने एका पक्षाच्या गळ्याला दोरी बांधून त्याला पाण्यात सोडले. लगेचच पाणकावळ्याने डुबकी मारून मासा आणल्यावर दोरी काढण्यात आली. आता दुसऱ्याची पाळी होती. प्रत्येकाने ठरावीक मासे आणल्यावर त्यांना एकेक मासा बक्षीस देण्यात येई.
क्रूझने फिरताना आपण नदीतल्या एका गुहेच्या तोंडाशी येतो. आसपास वाढणाऱ्या बांबूसारख्या रिड नावाच्या पाणवनस्पतींपासून बासरी बनवली जाते. म्हणून गुहेला रिड फ्लूट केव्ह नाव दिले आहे. आतमध्ये डोंगरातून झिरपणाऱ्या क्षारांनी खांब, फळे, फुले, हिरा मुकुट अशा आकारांचे दगड तयार झाले आहेत. क्राऊन पॅलेस फ्लावर अँड फ्रुट माउंटन अशी नावे व त्यावर विविधरंगी प्रकाशयोजना ही सजावट अजून उठावदार करते.
चेंगडू हे चीनच्या सिचुआन प्रांतातले शहर. आपल्याकडे चायनीज सेजवान डिशेस फार आवडीच्या असतात. पण तिथल्या पदार्थाच्या चवीमधे फरक आहे. कारण तिथे पिकणाऱ्या मसाल्यातील त्रिफळांचा वापर. इथले खास आकर्षण म्हणजे जायंट पांडांसाठी असलेले पार्क. पूर्वी ह्य भागातल्या मीन् डोंगरांवर पांडांची वस्ती होती. पण जशी लोकसंख्या वाढू लागली, नवनवे उद्योग, सुधारणा झाली तसे पांडांची वस्ती मागे हटू लागली. आता काही ठरावीक भागांतच पांडांचे वास्तव्य आहे. ही अस्वलांची एक जात नष्ट होण्यापूर्वी जतन व्हावी ह्य उद्देशाने सरकारने त्यांच्या उत्पत्तीसाठी पार्क व नर्सरीची सोय केली आहे.
सहाशे किलो वजनाचा पांडा पांढरा शुभ्र असून त्याचे डोळे, कान, नाक व हातापायांचे पंजे काळे असतात. हा फार आळशी प्राणी, खादाड आहे आणि शाकाहारी आहे. तो दिवसभर कोवळ्या बांबूचे कोंब, फांद्या, पाने खात असतो. तो क्रूर किंवा हल्ला करणारा नसला तरी आपल्या जातभाईंप्रमाणे स्वसंरक्षणार्थ झाडावर चढण्यात पटाईत आहे. त्याची नजर फार तीक्ष्ण असते असे म्हणतात. त्याच्या पिलांसाठी इथे खास नर्सरीची सोय आहे. त्याच्या बरोबरीने रेड पांडा, इतर काही प्राणी ह्य पार्कमध्ये आहेत.
पाचव्या शतकातली जगातील सर्वात जुनी व पहिली वॉटर इरिगेशनची व्यवस्था, दुईग्यांग, पाहायला गेलो. त्याबद्दल गाइडने माहिती दिली. मिंजियांग नदीच्या पुराने काठावरची गावे सतत पाण्याने वेढली जात असत. तर थोडे खाली चेंगडूच्या पठारावर पाण्याचे दुर्भिक्ष. त्यामुळे तिसऱ्या शतकात किन् राजाने ली बिन् ह्य कार्यक्षम अधिकाऱ्याकडून सैन्यासाठी पाणी कमी पडता कामा नये, या अटीवर येथे बंधारा घालून घेतला.
ली बिन्ने डोके लढवून पोकळ बांबूंमधे दगड घालून त्यांचे जाळे केले. नदीच्या पात्रात दगड धोंडय़ांमध्ये आधारासाठी बांबूच्या तिपाई ठेवून पाण्याचा प्रवाह वळवण्यासाठी जाळे घातले गेले. वाटेतील ह्य बंधाऱ्यामुळे पाण्याचा जोर कमी झाला, पण थांबला नाही. दगडांमधील फटीतून पाणी येत असल्याने सैनिकांसाठी असलेल्या साठय़ात कमी झाली नाही व राजाच्या अटीचेही पालन झाले. शिवाय वळवलेला प्रवाह डोंगरात बोगदा करून पठाराकडे पाण्याची सोय केली. त्या काळी सुरुंग वगैरेंची सोय नसल्याने डोंगर दगड फोडणे महाकठीण. ली बिन्ने त्यावर आग, पाण्याच्या माऱ्याने उष्ण, थंड तापमानाने चिरा पाडून बोगदा केला. या प्रयोगाला साताठ वर्षे लागली असे नमूद केले आहे. ही व्यवस्था अजूनही सुरळीत चालू आहे. युनेस्कोने २००० साली तिला वल्र्ड हेरिटेजचा दर्जा दिला आहे.

पाहा फोटो गॅलरी : अवाढव्य व भव्य चीन

चीनमध्ये लोकसंख्या काबूत आणण्यासाठी एक जोडपे, एक मूल असा कायदा केला गेला आहे. तो कसोशीने पाळला जातो. कायदा मोडणाऱ्यास जन्मभर जबर दंड भरण्याची शिक्षा आहे. परंतु त्यामुळे मुलामुलींच्या प्रमाणावर परिणाम झाला. त्यामुळे या कायद्याबद्दल आता फेरविचार सुरू आहे असे म्हणतात. इथे बहुतांश जनता चिनी भाषेशिवाय दुसऱ्या भाषा जाणत नाही. पण देश पर्यटनासाठी खुला असल्याने विदेशी पर्यटकांचा, पाश्चिमात्य संस्कृतीचा जोरदार प्रभाव पडायला लागला आहे. मुले इंग्लिश शाळेत जातात, पण ती इंग्रजी भाषा बोलत नाहीत. त्यामुळे आपली पंचाईत होते. आणखीन विशेष, म्हणजे सर्व धर्मियांना एकच कायदा आहे. मृत्यू पावलेली व्यक्ती कोणत्याही धर्माची असली तरीही तिचे दहनच केले जाते.
शतकानुशतकांचा इतिहास, भव्य प्रासाद, वेगवेगळ्या भागांत चवीढवीचे भरपूर पदार्थ, टी गार्डन्स, सुप्रसिद्ध चायनीज सिल्कच्या साडय़ा आणि वेगळीच ठिकाणं आपण तिथे गेल्याशिवाय कशी कळणार? मुंबईहून साउथ चायना एअर, थाय, सिंगापूर व कॅथे एअरने आपण जाऊ शकतो. जाण्यासाठी मार्च, एप्रिल व सप्टेंबर, ऑक्टोबर हे चांगले महिने आहेत.
गौरी बोरकर – response.lokprabha@expressindia.com

मराठीतील सर्व कव्हर स्टोरी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Travel and tourism special