वीणा रारावीकर
नागपूरमधील नारखेड तालुक्यातील मोवाड हे एक गाव. वर्धा नदीच्या तीरावर वसलेले. पहिली नगरपालिका म्हणून प्रसिद्ध असलेले. तिथले लोक खाऊन पिऊन सुखी होते, पण २९ जुलै १९९१, आषाढी पौर्णिमेनंतर आलेली ती रात्र. पहाटेच्या अंधारात आलेला महापूर. हा महापूर सर्व गाव उद्ध्वस्त करून जातो. घरं- माणसं-शेती-गुरं-जनावरं सर्व काही वाहून गेलं होतं. एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं होतं… ‘त्या मध्यरात्रीनंतर’ या कादंबरीत लेखिका लक्ष्मीकमल गेडाम यांनी मोवाडच्या या महापुराचं चित्र रेखाटलं आहे. त्या मध्यरात्रीनंतर, मोवाडमध्ये पुढच्या चार-पाच वर्षांत काय काय घडलं, ते लेखिकेने या कादंबरीत मांडलं आहे.

या गावातील एक सामान्य कास्तकार कुटुंब, रमा-मुकुंद आणि त्यांचा मुलगा मुरली. ही पात्रे कादंबरीच्या केंद्रस्थानी आहेत ती एका प्रातिनिधिक स्वरूपात. हे सर्व जण बाळंतपणासाठी घरी आलेल्या आपल्या मुलीला नागपूरला सोडायला गेले होते. त्यामुळे त्यांचा जीव वाचतो. रमा-मुकुंद हे एक समंजस जोडपं. महापुरात सर्वस्व वाहून गेल्यानंतर परत सर्व उभं करण्यासाठी कंबर कसू लागतात. मजुरी करून पैसे मिळविण्यासाठी ते काही दिवस नारखेडला जाऊन राहतात. त्यांच्या या संघर्षाबरोबर गावातील कुसुमचा संसार, पंचीच्या आयुष्यातील दु:ख, सदोदित पंचांग पाहणारा सम्राट, इसिनाथची सून अशी इतर लोकांची उपकथानके सहजपणे समाविष्ट होऊन जातात.

या महाआपत्तीनंतर पुनर्वसनाचे काम सुरू होते. त्यात प्रशासन, पोलीस, शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि गावातील लोक सर्वांचा समावेश आहे. पुनर्वसनाच्या कामातील तपशील लेखिकेने अतिशय बारकाईने मांडला आहे. त्यात केंद्रीय मंत्र्यांच्या पाहणीपासून, ते खावटीसाठी (अनुदान योजना) रांगेत घडणारे प्रसंग आहेत. अशा आपत्तीमध्येदेखील काही लोक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात. तर काही कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांमुळे गावाचं पुनर्वसन लवकर होतं. या घटना अगदी स्वाभाविकपणे मांडल्या आहेत.

कादंबरीच्या संरचनेप्रमाणे यात नोकरशाहीपासून व्यावसायिक, सामान्य माणसापासून गर्भश्रीमंत अनेक पात्रे आहेत. या पात्रांच्या वेगवेगळ्या मानवी स्वभावांचे सूक्ष्म निरीक्षण कादंबरीत आढळून येते. लेखिकेने वेगवेगळे नातेसंबंध अतिशय तरलपणे मांडले आहेत. मग ते पती-पत्नीमधील असोत की आई आणि मुलाचे. साहित्यकृतीमध्ये साहित्यिकाचे अनुभवविश्व आविष्कृत होत असते. लक्ष्मीकमल यांच्या बालपणातील काही खास आठवणी, उदापूर-इसापूर-मोवाड या गावांशी निगडित आहेत. ती आत्मियता या कादंबरीत उतरली आहे.

‘बाप्पा-बाप्पा’, ‘थंड्या- थंड्या’, ‘निर्रेऽऽऽ’ असे शब्द तसेच गावच्या लोकांचे संवाद लेखिकेने वऱ्हाडी बोलीभाषेत उतरवले आहेत. तर निवेदन प्रमाण भाषेत केले आहे. या दोन्हींचा समतोल साधण्यात या ज्येष्ठ लेखिका यशस्वी झाल्या आहेत. अनेक संवादात ‘जाई मोंगऱ्याले दु:ख मोठ्ठं नं कडू भोपाळयाले पीक मोठ्ठं’ या सारख्या बोलीभाषेतील म्हणींचा वापर लेखिकेने अतिशय चपखलपणे केला आहे. यातून कादंबरीला एक वेगळा साज चढला आहे. मातामाय-मरामाय देवीची पूजा, पंचमढीची महादेवाची यात्रा, पेरणीची गाणी, अंबिया बहार आणि मृग बहार अशा विदर्भातील गावाकडल्या संस्कृतीची ओळख सर्वांना होऊन जाते.

रमा-मुकुंद आणि गावातील लोकांचा संघर्ष वाचकांच्या मनाचा ठाव घेतो. या संघर्षासोबत त्यांच्यामधील आशावाद लेखिकेने जिवंत ठेवला आहे. एक सत्यघटना आणि अनुभवसंपन्नता यांची समृद्धता या कादंबरीतून प्रतीत होते. सर्वसामान्य माणसाची जगण्याची धडपड, आशावाद या कादंबरीतून व्यक्त होतो. आणि म्हणून ही कादंबरी वाचकांच्या मनाचा ठाव घेते.

‘त्या मध्यरात्रीनंतर’, – लक्ष्मीकमल गेडाम, पद्मागंधा प्रकाशन, पाने-३३६, किंमत-६०० रुपये.

var1303@gmail.com