‘‘दिवाळीची सुट्टी म्हणजे नुसती धम्माल असते. पणत्या रंगवायच्या, लहान-मोठे आकाशकंदील बनवायचे, दिव्यांच्या माळा, गेरू-रांगोळ्या-रंग, किल्ला, बिनआवाजी शोभेचे फटाके- जसे भुईनळे, भुईचक्र, फुलबाजा…’’ काव्याताई उत्साहाने म्हणत होती.
‘‘आणि ती सुरू होण्याआधीही आपली किती तरी दिवस जय्यत तयारी सुरू असते. साफसफाई, फराळ बनवणं, खरेदी, गिफ्ट्स…’’ काव्याताईची मैत्रीण मीराताई त्यांना जॉइन होत म्हणाली.
‘‘हो नं! गाय-वासराला पुजणारा वसुबारस, धन्वंतरीची पूजा करणारी धनत्रयोदशी, पाडवा, भाऊबीज! प्राण्यांपासून अगदी सगळ्या नात्यांना सामावून घेणारी दिवाळी!’’ काव्याताईने दुजोरा दिला.
‘‘तुझे काय प्लॅन्स भाऊबिजेचे, मीराताई?’’ कबीरने विचारलं.
‘‘दरवर्षी आम्ही घरी जातो नागपूरला. तिथं दोन काका असतात माझे आणि चुलत भावंडं! मामाही असतो. पण या वर्षी आई-बाबाला लक्ष्मीपूजनाची एकच दिवस सुट्टी आहे. सो… या वर्षी इथंच. मी दादाला ओवाळणार आणि तो मला गिफ्ट देणार, जे मला आधीच ठाऊक आहे! एरवी सगळे जण भेटले की जास्त मज्जा येते. पण तुमचं काय?’’
‘‘कबीर- काव्याताईकडे तर तीन पिढ्यांची भाऊबीज असते दरवर्षी. अगदी ठरलेला कार्यक्रम!’’ कबीरचा मित्र अनयही एव्हाना जॉइन झाला होता.
‘‘म्हणजे?’’ मीराताई सोसायटीमध्ये नवीनच भाड्याने राहायला आल्यामुळे इतर मित्र-मैत्रिणींना एकमेकांबद्दल जसं सगळं ठाऊक होतं तसं तिला फारसं माहीत नव्हतं.
‘‘पाडवा कसा घरच्या घरी साजरा होतो, पण भाऊबिजेला आमच्याकडे धम्माल असते. सकाळी फराळाला आजीचे दोन भाऊ येतात आणि दुपारच्या जेवणाला आजोबांच्या चार बहिणी. बाबा त्यांना गमतीने ‘आत्या-चार’ म्हणतो. खरं तर भाऊबिजेला बहीण बोलावते भावाला, पण आमच्याकडे आजी आवर्जून सगळ्या आत्या-आजींना बोलावते. आणि त्यांची वर्षानुवर्षं ठरलेली ओवाळणी असते – अकरा रुपये आणि घरी केलेल्या फराळाचं ‘गिफ्ट-पॅकेट’. म्हणजे, आजोबा प्रत्येकीला ओवाळणी देतात आणि आज्या घरी बनवलेला फराळ! मग तो फराळ कसाही असो – मऊ चकल्या, कडक अनारसे… मज्जा येते एक-एक पदार्थाची चव घ्यायला!’’ कबीर हसत म्हणाला.
‘‘त्यात आमची आजी हुशार! ती बेसनाचे लाडू बनवते – चुकायला फारसा ‘स्कोप’च नाही. त्या सगळ्यांचा एकच फंडा आहे – ‘घर में बनाओ, जमके खाओ’! आजोबांची मोठी बहीण म्हणजे मोठी आत्या-आजी आमच्या आजीच्या धाकट्या भावाला संस्कृत शिकवायची. त्यामुळे तो तिला मोठी बहीण मानतो. मग भाऊबिजेला ती धाकट्या मामा-आजोबांना ओवाळते आणि त्यांची ओवाळणी असते एक दिवाळी अंक.’’ काव्याताईने अजून माहिती दिली.
‘‘हे किती भारी आहे!’’ – इति मीराताई.
‘‘दुपारी जेवायला काका-काकूही असतात. अॅक्च्युली माझ्या काकाचं आणि मावशीचं एकमेकांशी लग्न झालंय आई-बाबाच्या लग्नानंतर. त्यामुळे मावशी बाबाला ओवाळते आणि आई काकाला. आणि आम्ही चुलत-मावस भावंडं एकमेकांना.’’
‘‘क्रिस-क्रॉस’ भाऊबीज! सॉल्लिड आहे हे!’’ मीराताईला सगळं गमतीशीर वाटत होतं.
‘‘गेल्या वर्षी काकूने आम्हाला मुलांच्या मासिकाचं ‘सबस्क्रिप्शन’ गिफ्ट दिलं होतं. किती छान कल्पना आहे नं!’’ काव्याताई म्हणाली.
‘‘आमच्या आईच्या माहेरी तिची बरीच सख्खी-चुलत भावंडं आहेत. त्यामुळे फिरत्या गणपती बाप्पासारखी आमची तिथली फिरती भाऊबीज असते. गेल्या वर्षी आमच्याकडे होती. या वर्षी मोठ्या चुलत मामाकडे आहे. त्यामुळे संध्याकाळी आमचा दौरा तिथं!’’ काव्याताई पुढे म्हणाली.
‘‘अनय, तुझं रे काय?’’ मीराताईने उत्सुकतेने विचारलं.
‘‘आपण एकला गडी- नो भाऊ, नो बहीण. बाबा एकुलते एक आहेत आणि आईचा भाऊ अमेरिकेला असतो. त्यामुळे माझ्या मामे बहिणीची आणि माझी भाऊबीज दरवर्षी ‘ऑनलाइन’! तसं भाऊबिजेला आमच्याकडे फार काही नसतं, कारण जवळचे असे कुणी नातेवाईक नाहीयेत. पण आई मला ओवाळते आणि तीच गिफ्ट देते. आणि मी तिला ओवाळणी म्हणून ‘गुड बॉय’सारखं वागण्याचं ‘प्रॉमिस’ देतो.’’
‘‘पण वागतोस का तसा?’’ काव्याताईने चिडवलं.
‘‘म्हणजे काय? काही शंका?’’
इतक्यात अनयचे बाबा त्याला हाका मारू लागले.
‘‘अजून दिवाळी शॉपिंग का?’’ मीराताईने विचारलं.
‘‘तुझं ते गेल्या वर्षीचं सीक्रेट नं! सांगूनच टाक आज.’’ कबीरने आग्रह धरला.
‘‘ओक्के! इथून साधारण चाळीस किलोमीटरवर भिन्नमती मुलींची एक निवासी शाळा आहे. माझा वाढदिवस तिथीने भाऊबिजेचा. गेल्या वर्षी मी दहा वर्षांचा झालो तेव्हा आई-बाबांनी ठरवलं की भाऊबीज आता वेगळ्या पद्धतीने साजरी करायची. आई-बाबा, मी आणि दोन्हीकडचे आजी-आजोबा त्या शाळेला गेल्या वर्षी भेट द्यायला गेलो होतो. तिथल्या बहिणींनी मला ओवाळलं आणि ओवाळणी म्हणून आम्ही पुस्तकं, खाऊ, खेळणी, ड्रेस अशा अनेक गोष्टी त्यांना दिल्या. यंदा तिथं दिवाळीनिमित्त खेळाच्या स्पर्धा होणार आहेत- चमचा लिंबू, बटाटा शर्यत वगैरे. बाबाने त्यासाठी खाऊ आणि बक्षिसं ‘स्पॉन्सर’ केली आहेत. माझ्या त्या खास बहिणींसाठी थोडी खरेदी करायला जायचंय.’’
‘‘ही खरी हटके भाऊबीज!’’ काव्याताई म्हणाली
‘‘चला, निघतो मी! आईपण येईल आता. मी खाली आलो तेव्हा ती त्यांच्यासाठी बेसनाचे लाडू वळत होती.’’ अनय हसत म्हणाला.
‘‘हो! चुकायला ‘स्कोप’च नाही.’’ कबीरने टाळी दिली. सगळे मनमुराद हसले.
‘‘हसत काय बसले मी! आईने मला उटणं, अभ्यंग तेल आणि बत्तासे आणायला सांगितलेत!’’ म्हणत मीराताई लगबगीने निघून गेली. अनयही बाबाकडे पळाला.
काव्याताई कबीरचा हात एकदम धरत म्हणाली, ‘‘कबिरा, बघितलंस! सगळ्यांना सामावून घेणारी, अशी असावी दिवाळी…’’
इतक्यात काही तरी तडतडण्याचा आवाज आला. दोघांनी वर पाहिलं. रॉकेटमधून निघालेल्या लाल, सोनेरी, निळ्या, हिरव्या, गुलाबी चांदण्यांना तिन्हीसांजेच्या प्रकाशाने आपसूक सामावून घेतलं होतं.
mokashiprachi@gmail.com