महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परत आले ही घटना भारतीय स्वातंत्र्यलढय़ाच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाची घटना होय. या घटनेस नुकतीच (९ जानेवारी) शंभर वष्रे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने या घटनेशी संबंधित तत्कालीन भवतालाचा घेतलेला वेध..
‘अरेबिया’ बोट मुंबईच्या किनाऱ्याजवळ आली. एडनहून मुंबईला येताना बोट खूप हलत होती. त्यामुळे गांधी दाम्पत्याची प्रकृती बिघडली होती. पण स्वदेशाचा किनारा जवळजवळ एका तपानंतर पाहताना ती अचानक सुधारली. बॅरिस्टर गांधी १८९३ साली एका वर्षांसाठी म्हणून दक्षिण आफ्रिकेला गेले होते. मध्ये एकदा आपले कुटुंब नेण्यासाठी ते येऊन गेले. बोअर वॉर संपल्यावर मायदेशी परतता येईल असे त्यांना वाटले. त्यानुसार ते सहकुटुंब आलेही; पण त्यांना ‘नाताळ इंडियन काँग्रेस’चे पुन्हा बोलावणे आले आणि ते १९०३ मध्ये पुन्हा आफ्रिकेला गेले. या खेपेस ते ट्रान्सवालमध्ये स्थायिक झाले. त्यानंतर ते दोनदा इंग्लंडला प्रतिनिधी मंडळातर्फे चच्रेसाठी गेले; पण परतले ते दक्षिण आफ्रिकेलाच. विरुद्ध पक्षाशी चर्चा ही सत्याग्रहाची पहिली पायरी होती. ती निष्फळ झाल्यावर १९०८ मध्ये ते पहिल्यांदा जाणीवपूर्वक तुरुंगात गेले. आपण वकील असूनही कायदा मोडला आहे, ही गांधींची भूमिका; तर त्याच वर्षी िहदुस्थानात टिळकांनी कोर्टात आपण निर्दोष असल्याची ग्वाही दिली होती.
१९०९ साली दुसऱ्या वेळी परतताना त्यांनी ‘िहद स्वराज’ हा मौलिक ग्रंथ किल्डोनान बोटीवर गुजरातीत लिहिला. तोवर ते आफ्रिकेतल्या िहदी लोकांच्या सन्मानाबरोबरच िहदुस्थानच्या स्वराज्याचा विचार करू लागले होते. त्यांनी बॅरिस्टरकीची वस्त्रं उतरवली होती आणि सत्याग्रह चळवळीमुळे ते ‘भाई गांधी’ म्हणून ओळखले जाऊ लागले होते.
दक्षिण आफ्रिकेत त्यांनी आपली सर्वधर्मसमभाव ही भावना तपासून घेतली होती. प्रत्येक धर्माचा पाया नीती हा आहे; तरी प्रत्येक धर्मात काही दोष निर्माण झाले आहेत. तरीही कोणत्याही धर्माचा त्याग न करता ‘धर्म म्हणजे नीतिमत्ता’ हे स्वीकारून त्यांनी आपले आचार-विचार घडवायला प्रारंभ केला. जॉन रस्किनच्या ‘अण्टू धिस लास्ट’च्या वाचनानंतर त्यांनी आपल्या जीवनाला वेगळेच वळण लावून फिनिक्सला आश्रमाची स्थापना केली. तिथे काळे-गोरे सारे एकत्र राहून आपले हात मातीत घालून काम करू लागले आणि त्याचवेळी ‘इंडियन ओपिनियन’ही पत्रिका ते प्रकाशित करू लागले. ‘प्रत्येकाला त्याच्या गरजांनुसार आणि प्रत्येकाकडून त्याच्या ताकदीनुसार’ ही सर्वोदयाची कल्पना म्हणजे तेव्हा प्रत्यक्षात न आणल्या गेलेल्या मार्क्सविचारांची अिहसात्मक विचारांशी सांगड होती. या मूलगामी विचारांना समाजात रुजवायचे असेल तर अपरिग्रह, अस्तेय यांबरोबरच ब्रह्मचर्य व्रताचा स्वीकार करायला हवा, हेही त्यांच्या लक्षात आले होते. ट्रान्सवालमधील युरोपियन शासकांनी वंशभेदावर आधारित कायदे केल्यावर त्या काळ्या कायद्यांचा स्वीकार न करता शांततामय प्रतिकार करण्यासाठी त्यांनी सत्याग्रहाची कल्पना तयार केली होती. आणि पुढील वर्षांत त्याची तत्त्वेच नव्हे, तर प्रत्यक्ष आचरण याविषयी त्यांनी प्रणाली निश्चित केली. १९०९ साली गांधी इंग्लंडला गेले तेही या सत्याग्रहाचा पाठपुरावा करायला. या प्रक्रियेत सर्ववंशसमभाव आणि सर्वभाषासमभाव या विचारांनाही पाठबळ मिळाले.
त्याच वर्षी हेन्री पोलाक याच कामासाठी हिंदुस्थानात आले होते. इथे त्यांनी गांधींच्या सत्याग्रह चळवळीबद्दल नेत्यांना तर सांगितलेच, शिवाय एक पुस्तकही प्रसिद्ध केले. हे सारे ऐकून ना. गोखले एवढे प्रभावित झाले, की त्यांनी काँग्रेसच्या सभेत गांधींविषयी पुढील उद्गार काढले- ‘गांधींचा माझा परिचय आहे, ही माझ्या आयुष्यातील एक महद्भाग्याची गोष्ट आहे. या जगात त्यांच्याहून अधिक शुद्ध, उदार, शूर आणि उदात्त स्वरूपाची व्यक्ती कधी अवतरली नाही. गांधी अशा व्यक्तींपकी एक आहेत, की जे स्वत: साधेपणाने राहून इतर लोकांविषयी आणि सत्य व न्यायप्रियता यांच्याविषयी प्रेम बाळगतात. गांधींचे वर्णन माणसांतील नरश्रेष्ठ, वीर पुरुषांतील वीरश्रेष्ठ, देशभक्तांमध्ये भक्तराज असे करता येईल. भारतीय मानवतेचा सर्वश्रेष्ठ िबदू या माणसामध्ये सापडेल.’
१९१२ साली गोपाळ कृष्ण गोखले गांधींच्या निमंत्रणावरून दक्षिण आफ्रिकेत गेले. बोथा आणि स्मट्स यांनी त्यांना सगळ्या मागण्या पूर्ण होतील असे आश्वासन दिल्यावर त्यावर विश्वास ठेवून त्यांनी गांधींना शक्यतो लवकर घरी परत येण्याचा आदेश दिला. गांधींना त्यांनी काही दिवस बोटीवर सोबत नेऊन िहदुस्थानातील राजकारणाचे त्यांना धडे दिले. सुरत काँग्रेस १९०७ साली फुटल्यावर टिळकांचा राष्ट्रीय पक्ष या ना त्या कारणांनी नेस्तनाबूत झाला होता. टिळक मंडालेच्या तुरुंगात होते. इतर नेते हद्दपार झाले होते. क्रांतिकारकांपकी सावरकर बंधू अंदमानात, तर अरिवद घोष संन्यस्त. काँग्रेस मवाळांच्या हातात होती. पण तिला मरगळ आली होती. हे सारे गांधींना समजावून सांगणे गोखल्यांना आवश्यक वाटले.
गांधी बोथा-स्मट्स यांना ओळखून होते. प्रश्न सुटायला वेळ लागणार याची त्यांना कल्पना होती. पुन्हा सत्याग्रहाचे शस्त्र उचलल्याशिवाय आपले नियोजित काम पूर्ण होणार नाही याची त्यांना खात्री होती. सत्याग्रह हा उपाय गोखल्यांना पटणार नाही याचीही गांधींना कल्पना होती. गोखले व्हाइसरॉय लॉर्ड हाìडगच्या सहकार्याने सामोपचाराचा मार्ग शोधत होते. १९१३ तील लाँग मार्चनंतर सारं बदललं. आपल्यातील मतभेद विसरून गोखले आपल्या शिष्याला सर्व मदत करत होते.
ते आणि त्यांचे सहकारी हेन्री पोलाक आणि हरमान केलनबाख यांना तुरुंगात ठेवले तेव्हा गोखले यांनी अॅण्ड्रय़ूज आणि पीयरसन यांना आफ्रिकेला पाठवले. त्यांच्या सहकार्याने स्मट्सशी बोलणी यशस्वी झाली. काही प्रमाणात िहदी रहिवाशांच्या मागण्या जनरल स्मट्सने स्वीकारल्या.
१८ जुल १९१४ ला गांधींनी दक्षिण आफ्रिकेचा निरोप घेतला. प्रोफेसर गोपाळ कृष्ण गोखले यांना भेटण्यासाठी ते इंग्लंडला गेले, ते पहिल्या महायुद्धाच्या तोंडाशी त्या युद्धातील सनिकांसाठी अॅम्ब्युलन्स पथक सुरू करण्याच्या कामात गुंतले. पण बिघडलेल्या प्रकृतीमुळे डॉक्टरांनी त्यांना िहदुस्थानला पिटाळले. त्यांचे राजकीय मार्गदर्शक गोखले त्याआधीच िहदुस्थानात गेले होते. एव्हाना बॅरिस्टर गांधी ‘भाई’पासून ‘बापू’ म्हणून ओळखले जाऊ लागले होते. बा आणि बापू प्रकृतीची काळजी घेता घेता आपल्या देशात पोहोचल्यावर काय काय करायचे यासाठी मनाची तयारी करत होते. प्रकृतिअस्वास्थ्य, युद्धपरिस्थिती आणि आपल्या कार्यासंबंधीची अनिश्चितता यांमुळे त्यांना आलेली मरगळ िहदुस्थानचा किनारा पाहताच दूर झाली. िहदुस्थानात आल्यावर प्रो. गोखले यांच्या पायाशी बसून ते सांगतील त्याप्रमाणे वागण्याचे ठरवून गांधी सपत्नीक मायदेशी परतले ते तब्बल वीस वर्षांनंतर. ९ जानेवारी १९१५ ला.. बरोब्बर शंभर वर्षांपूर्वी.
गोखले यांनी लंडनला त्यांचे स्वागत आयोजित केले होते तसेच आता मुंबईतही या शांततावादी वीराला यथोचित सन्मान मिळेल अशी व्यवस्था त्यांनी केली होती. स्वागत समितीचे अध्यक्ष सर फिरोझशहा मेहता होते. मुंबईतली जवळजवळ सर्व महत्त्वाची मंडळी त्यात सामील झाली होती. नरोत्तम मोरारजी, जे. बी. पेटिट, बी. जी. हॉíनमन इत्यादी नेत्यांचे प्रतिनिधी मंडळ लाँचवरून बोटीवर स्वागतासाठी गेले. किनाऱ्यावर गांधी उतरले ते काठेवाडी शेतकऱ्याच्या पोशाखात. ‘बोले तसा चाले’ एवढीच गांधींची प्रथा नव्हती, तर आपल्याला काय सांगायचे आहे ते ठसविण्यासाठी ते पोशाखाचाही उपयोग करत. गांधी आणि कस्तुरबा शेतकरी म्हणून पाहिल्यावर त्याचा योग्य तो परिणाम झाला. जमनादास द्वारकादास यांनी आपल्या आठवणींत हे नमूद केले आहे- ‘गांधी १९१५ ला िहदुस्थानात परतले तेव्हा त्यांच्यामागे एका देशभक्त साधूपुरुषाचे वलय होते.’ द्वारकादास लिहितात, ‘साध्या, हाती विणलेल्या काठेवाडी पोशाखात ते पाश्चात्त्य पोशाखांत नटलेल्या इतर िहदुस्थानी नेतेमंडळींहून वेगळे दिसत होते. गांधीजींच्या पोशाखात काहीतरी साधे, तरीही विलक्षण आणि वेगळे होते. त्याचा माझ्यावर आणि इतर तरुणांवरही खोलवर परिणाम झाला.’
विशेष परवानगी घेऊन त्यांना गेटवे ऑफ इंडिया येथे आणण्याची व्यवस्था केली होती. तिथे शेकडो लोक जमले होते. गांधी दाम्पत्याला मिरवणुकीत वाजतगाजत नेण्यापूर्वी त्यांचा स्वागत समारंभ गेटवेपाशी करावा अशी लोकांची इच्छा होती. परंतु परवानगी न मिळाल्याने यात बदल करावा लागला. तरी ठिकठिकाणी त्यांचा सत्कार झालाच. गांधींनी सांताक्रूझच्या पत्रकार परिषदेत बॉम्बे क्रॉनिकल वर्तमानपत्राच्या प्रतिनिधींना सांगितले, ‘मी िहदुस्थानबाहेर जवळजवळ पाव शतक आणि सलग १३ र्वष इतका काळ राहिलो आहे. त्यामुळे माझी मायभूमी पाहून मला आणि माझ्या पत्नीला अपार आनंद झाला आहे. येथील लोकांनी दाखवलेल्या प्रेमाने तो आनंद द्विगुणित झाला आहे.’ त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील आपले अनुभव सांगितले आणि आपण इथेच राहण्यासाठी आलो असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘कोणत्याही विषयासंबंधी मत बनवण्याचे अधिकार मला नाहीत, असे गोखले यांनी सांगितले आहे ते योग्यच आहे. मी इथे विद्यार्थ्यांच्या भूमिकेतून काही काळ अवलोकन केले पाहिजे. मी तसे त्यांना वचन दिले आहे आणि मी ते पूर्णपणे पाळण्याचा प्रयत्न करीन.’
त्यांनी रेवाशंकर जव्हेरी यांच्या घरी मुक्काम केला. १२ तारखेला जे. बी. पेटिट यांच्या राजेशाही बंगल्यात त्यांच्या सन्मानार्थ एक खाना झाला. ६०० लोक हजर होते. त्यावेळी फिरोझशहा मेहता म्हणाले की, ‘गांधींचा परिचय करून देण्याची आवश्यकता नाही.’ खरोखरच आफ्रिकेतील चळवळीबद्दल िहदुस्थानात जागरूकता होती. गांधींनी सर्वाचे आभार तर मानलेच; शिवाय आपल्या त्रुटींचा कबुलीजबाबही दिला.
लोकमान्य टिळक एव्हाना मंडालेच्या तुरुंगातून परतले होते. तरी त्यांच्यावर शासनाची नजर होती. आपण येण्याने गांधी किंवा स्वत: टिळक गोत्यात येणार नाहीत ना, याची चौकशी करून त्यांनी १३ तारखेच्या स्वागत समारंभात भाग घेण्याचे ठरवले. तोपर्यंत फक्तमवाळ पक्षाचे लोक जवळ आले होते. या सभेला टिळक आणि जोसेफ बाप्टिस्टा हेही मुद्दाम आले. देशात गांधींसारखी नि:स्वार्थी माणसे निर्माण होण्याची आवश्यकता त्यांनी सांगितली. मवाळ आणि जहाल एकत्र यायला काही काळ जायचा होता. टिळकमहाराज सभेत येताच गांधी खाली उतरून त्यांना सन्मानाने मंचावर घेऊन गेले. काँग्रेसमध्ये एकोपा निर्माण होण्याची ही सुरुवात होती का?
त्यानंतरचे दिवस ठिकठिकाणी स्वागत स्वीकारण्यात गेले. देशाच्या राजकारणापासून दूर राहून, देशभर िहडून देशबांधवांना समजून घेण्याचे व्रत गोखले गेल्यानंतरही गांधी पाळत राहिले. वास्तविक हे बंधन त्यांनी एका वर्षांसाठी घालून घेतले होते. प्रत्यक्षात चंपारणला त्यांना ओढून नेईपर्यंत १९१७ पर्यंत ते सार्वजनिक कार्यापासून दूर राहिले.
यानंतरचे ‘गांधीभारत’ सांगायला तो संजयच हवा.
रामदास भटकळ
संग्रहित लेख, दिनांक 11th Jan 2015 रोजी प्रकाशित
गांधींचे भारतागमन
महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परत आले ही घटना भारतीय स्वातंत्र्यलढय़ाच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाची घटना होय.
First published on: 11-01-2015 at 01:09 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Entry of gandhi in indian politics