रतन टाटा यांच्याशी भेट झाली तेव्हा रतन टाटा पायउतार होऊन वर्ष व्हायला दोन महिन्यांचा अवधी होता. भेटीची वेळ तीन वाजताची होती. २.५५ वाजता आतून निरोप आला. बैठक संपायला पाच मिनिटं आहेत. बाजूच्या छोट्या कक्षात बरोबर तीनच्या ठोक्याला ते समोर. ही मुलाखत अनौपचारिक. त्यामुळे आत आल्या आल्या त्यांनी कोट काढला. टायची गाठ सैल केली. आगतस्वागत. भेटीच्या आदल्या दिवशी त्यांना ईमेल करून साधारण मुद्दे कळवले होते. पुस्तक कसं असणार आहे वगैरे सर्व माहिती त्यांच्या कार्यालयानं घेऊन ठेवली होती. त्यात त्यांना कळवलं होतं, आजोबा टाटा केमिकल्सच्या उभारणीपासून मिठापूरला कसे होते वगैरे. खरं तर त्याची गरज नव्हती, पण आपलं असू द्यावं म्हणून. पण मुख्य म्हणजे ते सर्व रतन टाटांनी ऐकून घेतलं होतं. त्याविषयी दोन-पाच वाक्यं झाल्यावर, तितक्याच मोजकेपणानं पुस्तकाची चौकशी. मग म्हणाले… सुरू करू या…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रश्न- जेआरडी त्यांच्या बहिणीला एकदा असं म्हणाले होते की, जे काही करू शकलो त्यामागे माझ्या ‘टाटा’ या आडनावाचा मोठा वाटा आहे. जेआरडींच्या नंतर या प्रचंड समूहाची सूत्रं तुमच्या हाती आली. तेव्हा तुम्हालाही असं वाटलं का? तुमच्या कारकीर्दीत या टाटापणाचं मोल किती?

उत्तर- माझ्यासाठी हे टाटापण एक जबाबदारीची जाणीव घेऊन आलं. हे टाटापण म्हणजे त्या लौकिकाला जागण्याचं आव्हान. या आव्हानाचा आकार महाप्रचंड आहे, याची मला पहिल्यापासूनच जाणीव होती. त्यामुळे टाटा असणं म्हणजे हे आव्हान पेलणं हेच माझ्या मनात होतं. या आडनावाशी काही मूल्यं जोडली गेलेली आहेत, उद्याोगक्षेत्रातल्या काही जाणिवा याच नावाशी निगडित आहेत. ते जपणं हे माझ्या दृष्टीनं टाटापण. आपल्या कोणत्याही कृतीनं, निर्णयानं या नावाला गालबोट लागणार नाही याची काळजी घेणं म्हणजे टाटा असणं. पण यातला महत्त्वाचा मुद्दा असा की, या टाटापणाचा वेगळा, जाणीवपूर्वक असा विचार मला कधी करावा लागला नाही. कारण मी जन्मापासून याच वातावरणात वाढलोय. टाटा आपल्या कर्मचाऱ्यांना, घरच्या नोकरचाकरांना कसं वागवतात हे बघत बघतच मी मोठा झालोय. त्यामुळे हे टाटापण जपण्यासाठी मला काही विशेष कष्ट करावे लागलेत, असं कधी झालं नाही. ते सगळंच खूप नैसर्गिक आणि सहज होतं. आणि ते तसंच आहे.

प्रश्न- जमशेटजींनी जेव्हा उद्याोगात पडायचं ठरवलं तेव्हा त्यांच्यापुढे भव्य स्वप्नं होती. जगात कधी काही कोणी केलं नव्हतं, ते त्यांनी केलं. उंच डोंगरावर कृत्रिम तलाव बांधून त्यातलं पाणी खाली आणत त्यावर वीज तयार करावी, असं कधी त्या वेळी जगात झालं नव्हतं. ते जमशेटजींनी केलं. जेआरडींच्या काळात एअर इंडिया जन्माला आली. त्यांच्या काळात टाटा समूहाचा विस्तार झाला. तुम्ही जेव्हा सूत्रं हाती घेतलीत तेव्हा तुमच्या डोळ्यांसमोर काय ध्येय होतं? किंवा कोणत्या स्वप्नांचा पाठपुरावा आपण करावा असं तुम्हाला वाटत होतं?

उत्तर- जेआरडींप्रमाणे विमानांचा शौक मलाही होता. मलाही विमानं भुरळ घालतात. तितकंच माझं प्रेम मोटारींवरही होतं. आणि ते केवळ मोटारी चालवण्यापुरतंच नव्हतं. मला त्यांच्यात अभियांत्रिकी रस होता. त्यातूनच आपण मोटार विकसित करावी असं मला वाटलं आणि संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली मोटार माझ्या काळात तयार झाली. ‘इंडिका’ ही भारतात तयार झालेली पहिली मोटार. परत जगातली सर्वात स्वस्त मोटार बनवावी अशीही माझी इच्छा होती. ‘नॅनो’ ही त्यातूनच आकाराला आली. पण आम्ही केवळ या मोटारी करून थांबलो नाही. जगातला सर्वांत लोकप्रिय, प्रतिष्ठित असा जग्वार ब्रँड आम्ही टाटा समूहात आणला. जग्वार लँड रोव्हर ही आता टाटा समूहाचा भाग आहे. मी हवाई क्षेत्र किंवा पोलाद या क्षेत्रात काही नवीन केलं नाही. पण मोटारीच्या क्षेत्रात केलं. आता मागे वळून पाहताना मी नक्कीच समाधानानं सांगू शकतो… या काही नवीन गोष्टी मी करू शकलो. हे काही नवीन मी केलं. हे सर्व करणं माझ्यासाठी खूप उत्साहवर्धक होतं.

हे ही वाचा… प्रचारक… संघाचा कणा!

प्रश्न- टाटा समूहात काहीतरी एक विशेष आहे. भारतीयांना टाटा खूप आपले वाटतात, ते का? अनेकांना माहीतही नसेल, पण तुमच्या महसुलातला साठ टक्क्यांपेक्षा अधिक वाटा भारताबाहेरून येतो. पण तरीही भारतीयांना टाटा समूहाविषयी एक विशेष ममत्व आहे, ते का? असं तुम्हाला वाटतं?

उत्तर- (रतन टाटांचा चेहरा एकदम विचारमग्न… शांतता) मला वाटतं… ही जी काही भावना आहे ती केवळ टाटा या नावामुळे तयार झालेली नसावी. किंबहुना नाहीच. भारतात जे काही नवनवीन घडलं त्याच्याशी टाटा जोडले गेलेत हे त्यामागचं कारण असावं. टाटांच्या उत्पादनांतून त्यांची विचारधारा दिसते. त्यामुळे ही काही टाटांविषयीची म्हणून असलेली भावना आहे ती त्यांनी आपल्या पिढ्यान् पिढ्यांच्या कामातून कमावलेली आहे. टाटा हे काही राजघराणं नाही की त्यात जन्मलेला राजपुत्र… म्हणजे मग तो पुढचा राजा होईल आणि त्याच्याविषयीही जनता आदर व्यक्त करेल… असं झालेलं नाही… ही जी काही विशेष भावना आहे ती प्रत्येक पिढीतल्या टाटाला नव्यानं कमवावी लागते. त्यासाठी कष्ट करावे लागतात. खूप सुंदर असतं हे कष्ट करणं. समाधान वाटतं ते कष्ट करायला. तुम्ही टाटा आहात म्हणून ती भावना आपोआप तयार होईल वा होते असं काही कधी झालेलं नाही.

प्रश्न- पण टाटांच्या प्रत्येक पिढीला ते कसं काय जमलं? आजही देशातल्या तरुणांना टाटा समूहात काम करावं असं वाटतच असतं… ते कसं काय?

उत्तर- वेल… ते बहुधा टाटा जी काही मूल्यं मानतात ती प्रत्यक्षात आणली जातात याचं या पिढीला आकर्षण वाटत असावं. ग्राहकांशी, कर्मचाऱ्यांशी असलेली टाटांची बांधिलकी आकर्षित करत असावी. मला आशा आहे टाटातली प्रत्येक नवी पिढी या मूल्यांचं पालन करत करतच पुढे जात राहील.

प्रश्न- तुम्ही जेव्हा कंपनीचं सुकाणू हाती घेतलंत, तेव्हा खूप मोठमोठ्या असामी टाटांच्या विविध कंपन्यांत होत्या. त्यांची म्हणून स्वतंत्र अशी साम्राज्यं समूहात तयार झालेली होती. तेव्हा तुम्हाला असं वाटलं का… किंवा वाटतं का कधी की जेआरडी हे जरा जास्तच लोकशाहीवादी होते. त्यांच्या अतिस्नेहाळ स्वभावाची किंमत टाटा समूहाला चुकवावी लागली…

उत्तर- मला नाही असं वाटत. जेआरडींचा म्हणून एक स्वभाव होता. एक प्रेमळ मानसिकता होती. त्या मानसिकतेतून त्यांचं व्यक्तिमत्त्व तयार झालेलं होतं आणि त्या व्यक्तिमत्त्वातून टाटा समूहाचा चेहरा तयार झाला होता. जेआरडी म्हणायचे, माझ्या कार्यालयाचं दार सर्वांसाठी खुलं आहे. मग तो साधा सफाई कामगार असो वा समूहातल्या कंपनीचा एखादा संचालक. कोणीही त्यांच्याशी जाऊन बोलू शकायचा. जेआरडी म्हणायचे, हा सफाई कामगारही माझा कर्मचारी आहे आणि माझ्या संचालकाइतकाच त्याचाही माझ्यावर अधिकार आहे. तो त्यांचा स्वभाव होता. कित्येकदा असं घडलंय… जेआरडी स्वत: गाडी चालवत कार्यालयात यायचे… वाटेत कोणी बस स्टँडवर, टॅक्सी स्टँडवर वाट पाहत उभा असलेला दिसला तर ते त्याला विचारायचे… मी इकडेइकडे चाललोय… हवं असेल तर सोडतो… त्या काळी टीव्ही नव्हता… अजून यायचा होता… वर्तमानपत्रंही खूप वाचली जात होती असं नाही… त्यामुळे गाडीत बसलेल्या कित्येकांना कळायचंही नाही आपल्याला लिफ्ट देणारे जेआरडी आहेत म्हणून… त्यांना वाटायचं, कोणत्या तरी सहृदयी व्यक्तीनं आपल्याला त्याच्या मोटारीतनं सोडलं… नंतर कधी तरी त्याला वर्तमानपत्रात वगैरे पाहून लक्षात यायचं… अरेच्चा ते जेआरडी होते… तो त्यांचा स्वभाव होता… तसं वागणं त्यांना आवडायचं, कारण त्यामुळे सामान्य जनतेशी आपली नाळ जोडलेली राहते असं ते म्हणायचे… रस्त्यावरचा एखादा नागरिक असो वा कंपनीतला कामगार वा राजकारणी वा एखाद्या देशाचा प्रमुख… जेआरडी तितक्याच आत्मीयतेनं सगळ्यांशी वागायचे… ही सहृदयता हेच त्यांचं व्यक्तिमत्त्व होतं.

प्रश्न- पण त्यामुळे तुम्हाला, म्हणजे टाटा समूहाला… विकासात, प्रगतीत काही अडथळे आलेत असं कधी झालं का?

उत्तर- नाही नाही… तसं काही होण्याचा प्रश्नच नव्हता. जेआरडी हे असं काही ठरवून, विचार करून वागायचे असं नाही. ते त्यांच्यासाठी सहज होतं. नैसर्गिक होतं.

प्रश्न- …पण तरीही ही अतिसहृदयता कंपनीच्या विकासाला मारक ठरलीये असं नाही का वाटत तुम्हाला… ज्या काळात बिर्लांसारखा तगडा स्पर्धक टाटांना होता… वेगवेगळ्या उद्याोगांचे साठसाठ परवाने त्यांनी घेऊन आपल्या मांडीखाली ठेवलेले होते… ज्या परमिट राजच्या काळात नवीन उद्याोगाचे परवाने मिळवण्यासाठी खटपटी कराव्या लागायच्या, त्या काळात जेआरडींचा अतिलोकशाहीवाद टाटा समूहाच्या आड नाही का आला?

उत्तर- अजिबात नाही. जेआरडी मुळात अतिलोकशाहीवादी नव्हते. खरं तर अतिलोकशाहीवाद असा काही नसतो. तुम्ही लोकशाही मानणारे तरी असता किंवा न मानणारे. अतिलोकशाहीवादी असं काही नसतं. तो शब्दप्रयोग हा मनाचा गोंधळ… आणि त्यामुळे व्यक्तीचा अशक्तपणा दर्शवणारा आहे. जेआरडी असे अजिबात नव्हते. त्यांची मतं ठाम असत. त्याबाबत त्यांनी कधी तडजोड केलीय असं कधी झालेलं नाही. त्यांचं वागणं वेगळं होतं. म्हणजे समजा एखादा माणूस पडला तर ते असा नाही विचार करायचे की तो कोण आहे. तो रस्त्यावरचा सामान्य माणूस असेल. अगदी भिकारीही असेल… तरी जेआरडी स्वत: त्याला उठून उभं राहायला मदत करायचे… इतर कोणी येतंय न येतंय याची वाट नाही पाहायचे ते… हे त्यांचं जीवनविषयक तत्त्वज्ञान होतं… मला ते पूर्णपणे मान्य आहे… माझाही त्याच तत्त्वज्ञानावर विश्वास आहे. तेव्हा त्यांना अतिलोकशाहीवादी म्हणणं योग्य ठरणार नाही…

प्रश्न- मला आठवतंय… सुनावाला (टाटा समूहातले एक संचालक) एकदा असं म्हणाले होते, जेआरडींनी जरा अधिक कडक असायला हवं होतं… ते जास्तच प्रेमळ आहेत…

उत्तर- लोक असं म्हणायचे कारण जेआरडी युज टू गिव्ह देम अ लाँग रोप… जेआरडी अधिकाऱ्यांना खूप संधी द्यायचे म्हणून अधिकाऱ्यांना असं वाटायचं इतकंच. पण त्यांचा या वागण्यावर विश्वास होता. ते त्यांचं तत्त्वज्ञान होतं.

प्रश्न- उद्योगविषयक तत्त्वज्ञान…

उत्तर- हो उद्याोग तत्त्वज्ञान… त्यावर त्यांचा ठाम विश्वास होता.

प्रश्न- त्याबाबत त्यांना कधी शंका नव्हती…

उत्तर- कधीच नाही. ते प्रत्येकजण प्रामाणिकच असेल असं समजून वागायचे… ही युज टू टेक एव्हरीवन ऑन फेस व्हॅल्यू अनटिल ही ऑर शी बिट्रेड हिम…

प्रश्न- पण तरी मागे वळून पाहताना असं नाही का वाटतं का की तुमची टाटा समूहाच्या प्रमुखपदी नेमणूक करण्याचा निर्णय घ्यायला त्यांनी जरा उशीरच लावला… तुम्ही ६२ पासून…१९६२ पासून टाटा समूहात होतात…

उत्तर- पण मी काही त्यांचं उत्तराधिकारी व्हायचं हे ठरवून टाटा समूहात आलो नव्हतो. ते काही माझं ध्येय वा लक्ष्य नव्हतं. त्यांनाही असंच वाटलं असावं… त्यांच्याही मनात माझ्याविषयी अशीच भावना असावी… म्हणजे माझ्याकडे त्यांनी सुरुवातीपासून त्यांचा उत्तराधिकारी या नजरेतनंच पाहिलंय असं कधी झालं नाही… त्यामुळे माझ्याबाबतचा निर्णय झाला तेव्हा झाला. योग्य वेळी झाला. आता मागे वळून पाहताना असं वाटतं की तो आधी झाला असतं तर बरं झालं असतं. बरं झालं असतं यासाठी की माझ्या अंगात अधिक काही करण्यासाठी लागणारी ऊर्जा अधिक असली असती. पण (तो झाला नाही) जेआरडी शेवटपर्यंत अत्यंत कार्यक्षम होते. त्यांचं व्यक्तिमत्त्व खूप उदात्त आणि उंच होतं. त्यामुळे माझ्याकडे जेव्हा कंपनीची सूत्रं आली तेव्हा खरं सांगायचं तर मी घाबरलेलो होतो… आय वॉज टेरिफाइड… माय गॉड… कारण जेआरडी तेव्हाही कार्यक्षम होते. बॉम्बे हाऊसमध्ये यायचे, असायचे तेव्हा वाटायचं, कसं काय आपण काम करणार. हा माणूस ज्यात त्यात लक्ष घालेल… आपल्याला स्वातंत्र्य देणार नाही… सूचना देत राहील… कसं काय जमणार आपल्याला… पण त्यांचा मोठेपणा हा की, पदावरून उतरल्यावर त्यांच्याकडून कधीही माझ्या स्वातंत्र्याचा संकोच झालेला नाही… एकदाही नाही… कधीही माझ्या निर्णयात वा निर्णयप्रक्रियेत त्यांनी नाक खुपसलंय असं झालेलं नाही… ते माझ्यासाठी कायमच मेंटॉर राहिले… तो खूप मोठेपणाच आहे त्यांचा.

हे ही वाचा…आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : तिसरा डोळा…

प्रश्न- जेआरडींना सुरुवातीच्या काळात पीटर्सन यांच्यासारखा मेंटॉर लाभला. तुम्हाला तसं कोणी नव्हतं…

उत्तर- नाही… जेआरडींच्या वडिलांनी त्यांना पीटर्सनच्या हाती सोपवलं… ते आणि पीटर्सन एकाच खोलीत बसायचे… जेआरडींना व्यवस्थापनाचे धडे पीटर्सन यांनी दिले… त्या वेळची परिस्थिती वेगळी होती.

प्रश्न- पण जेआरडी वागायला इतके गोड होते, स्वभावाने इतके लाघवी होते… त्यांचा सहवास सर्वांनाच हवाहवासाच वाटायचा… पण तरी त्यांच्याकडून सत्तांतर… म्हणजे तुमच्याकडे कंपनीची सूत्रं येणं… अपेक्षेइतकं सुरळीत झालं नाही… कटूपणा बराच आला…

उत्तर- कारण मला वाटतं, मी हे अगदी खात्रीनं म्हणतोय असं नाही… तरीही मला याची थोडीफार खात्री आहे… मला वाटतं, या पदाचं आश्वासन त्यांनी अनेकांना दिलं होतं… त्यांच्या आवडीनिवडी खूप तीव्र होत्या. त्यामुळेही असेल, एखादा या पदावर बसण्यास योग्य आहे असं त्यांना अनेकांच्या बाबतीत वाटलं. पण एकेकाकडून त्यांचा भ्रमनिरास होत गेला की ते दुसऱ्याचा विचार करत… असं करत करत ते माझ्यापर्यंत आले… आता मागे वळून पाहताना जे झालं ते बरंच झालं असं म्हणायला हवं… कारण मी जर त्यांच्या नजरेत आधी भरलो असतो तर माझीही अवस्था इतरांसारखीच झाली असती… म्हणजे मीही कदाचित नावडता ठरलो असतो… तेव्हा सगळ्यात शेवटी मला संधी मिळाली ते उत्तम झालं… (हे सांगतात आणि रतन टाटा खळखळून हसतात… )

प्रश्न- मला वाटतं नस्ली वाडिया (बॉम्बे डाईंगचे) यांचासुद्धा त्यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून विचार केला होता.

उत्तर- नस्ली त्यांना मुलासारखा होता. जेआरडींना मूलबाळ नव्हतं. त्यामुळे त्यांना नस्लीविषयी त्या नसलेल्या मुलाचं ममत्व होतं. आणि नस्लीच्या मागे ते एखाद्या वडिलांसारखे उभे राहिले… त्यामुळेही काही काळ तरी नस्ली आपला उत्तराधिकारी होईल असं वाटत होतं हे खरं आहे… पण कशावर तरी काहीतरी छोटे मतभेद झाले आणि नस्ली त्यांच्या मनातून उतरले.

प्रश्न- टाटांना… म्हणजे समूहाला… देशाच्या अनास्थेचा मोठा फटका बसला… ही अनास्था नसती तर देशाला पहिली भारतीय मोटार साठच्या दशकातच मिळाली असती. टाटा विमान कंपनीने एव्हाना भरारी घेतली असती. मागे वळून पाहताना या सगळ्याविषयी तुम्हाला खंत वाटते का… सरकारच्या नाकर्तेपणामुळे हातातून गेलेल्या संधी…

उत्तर- (एक मोठी स्तब्धता. उसासा… मग अत्यंत काळजीपूर्वक एकेक शब्द तोलत) हो… मागे वळून पाहताना असं वाटतं… तशी थोडी खंत वाटते… तसं झालं नसतं तर आपण, देश अधिक प्रगती करू शकला असता असं वाटतं… बट वुई हॅव टेकन टेक ऑल दॅट व्हेरी फिलॉसॉफिकली…

प्रश्न- काही कडवटपणा याविषयी…

उत्तर- जराही नाही. कडवटपणा अजिबात नाही…

प्रश्न- जराही नाही?… सरकारी अनास्था नसती तर तुमच्या मनातली टाटा- सिंगापूर विमान कंपनी आघाडीवर असती… तसं झालं असतं तर ती एक उत्तम घटना ठरली असती.

उत्तर- कडवटपणा जराही नाही… खरं आहे, तसं झालं असतं तर ते अधिक चांगलं झालं असतं. जेआरडींनी सर्वोत्तम विमान कंपनी सुरू करावी अशी इच्छा सरकारनंच त्या वेळी व्यक्त केली होती. त्यातूनच एअर इंडिया जन्माला आली. पण तिचं सरकारीकरण झालं. तेव्हा बऱ्याच वर्षांनी जेआरडींना वाटत होतं, आपण एका सर्वोत्तम कंपनीच्या सहकार्यानं… सहकार्यानं अशासाठी की… मधे बराच मोठा काळ गेला होता. नवीन विमान कंपनी सुरू करावी. तेव्हा पूर्ण अभ्यासांती त्यांना वाटलं, टाटांनी सिंगापूर एअरलाइन्सच्या सहकार्यानं हे काम करावं… पण सरकारच आडवं आलं… खरं म्हणजे सरकार नव्हे एक व्यक्ती… (हसतात)

प्रश्न- प्रमोद महाजन?

उत्तर- नाही…

प्रश्न- मग देवेगौडा सरकारातले हवाई वाहतूक खात्याचे मंत्री सीएच इब्राहीम.

उत्तर- (हसून) तेही नाही. (हवाई क्षेत्रातल्या एका उद्याोगपतीचं नाव घेतात.) महाजन त्याच्या वतीनं काम करत होते. खरा विरोध या उद्याोगपतीचा होता.

प्रश्न- व्यापक विचार करायला गेलं की लक्षात येतं, ही माणसं खूप लहान होती… देशाचा विचार करणं त्यांच्यालेखी महत्त्वाचं नव्हतं… त्यांच्यालेखी स्वार्थाला जास्त किंमत होती… ते सगळं आठवणं त्रासदायक असेल नाही…

उत्तर- यामुळे जेआरडी कधी कडवट झाल्याचं आठवत नाही… त्यांना वाईट वाटायचं जरूर… त्यामुळे त्यांनी अनेक गोष्टींचा विचारच केला नाही… त्यांना माहीत होतं सरकार याला मंजुरी देणारच नाही… पण त्यामुळे त्यांच्या राष्ट्रीयत्वाच्या भावनेला कधी तडा गेलाय असं झालं नाही… ही समटाइम्स युज टू गेट फेड अप… मी त्या वेळी त्यांच्या जवळ होतो मला माहीतीये… जेआरडी म्हणायचेदेखील हे आपण करायलाच नको… सरकार मंजुरी देणारच नाही… आपल्याला नकारच मिळणार… वैतागायचे…

प्रश्न- सरकारनं जेआरडींची एअर इंडिया घशात घातली… न्यू इंडिया अॅश्युरन्स घेतली… जॉर्ज फर्नांडिस यांनी टिस्को घेण्याचा प्रयत्न केला…

उत्तर- टेल्कोच्याही राष्ट्रीयीकरणाचा प्रयत्न झाला…

प्रश्न- तुम्ही त्या काळात जेआरडींच्या सर्वात जवळ होतात. खासगीत कधी जेआरडी या सगळ्याबद्दल त्रागा करायचे का? डिड ही एव्हर फील दॅट द गव्हर्न्मेंट हॅज लेट हिम डाउन… सरकार आपल्याला मागे ओढतंय असं कधी त्यांना वाटायचं का?

उत्तर- ही डिड. बट ही नेव्हर फेल्ट ही बिइंग लेट डाउन… सरकारमुळे टाटा मागे पडतायत याबद्दल त्यांना वाईट वाटत होतं असं अजिबात नाही. पण त्यांना वाटायचं सरकार जर अधिक उद्याोगस्नेही झालं… परमिटराज मानसिकतेतून बाहेर आलं तर देशाची अधिक प्रगती होईल… त्यांना खंत होती… सरकारच्या या धोरणांमुळे देश मागे पडतोय… त्यांचा त्या व्यवस्थेला विरोध होता… ती बदलत नाही याची खंत त्यांना जरूर होती. पण ते अजिबात कडवट नव्हते…

प्रश्न- हे त्यांनी अगदी सहज घेतलं?

उत्तर- अधिक सहज. ही टुक ऑल दीज इन हिज स्ट्राइड… ही वॉज व्हेरी फिलॉसॉफिकल अबाउट इट…

प्रश्न- हा त्यांचा मोठेपणा. टाटांसाठी परिस्थिती बदलायला लागली ती राजीव गांधी यांच्या उदयानंतर… राजीव गांधींचं येणं… त्याच सुमारास तुमच्याकडेही अधिक जबाबदारी येणं… हे सगळं जुळून आलं… तुमचा राजीव गांधींबाबतचा अनुभव कसा होता, त्याविषयी काही सांगाल? इंदिरा गांधी आणि जेआरडींमधल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर राजीव गांधींसमवेत काम करणं काही वेगळं होतं का?

उत्तर- मी त्यांच्याबरोबर असं कधी काम केलं नाही… इंदिरा गांधी यांचा मला काही अनुभव नाही. पण राजीव तरुण होते. त्यांना काही करायची उमेद होती. आपला देश बदलावा असं त्यांना वाटत होतं. त्या बदलांसाठी ते उत्सुक होते. त्या अनुषंगानं काही सूचना केल्या तर त्या ते स्वीकारायचे. सत्तेवर आल्यानंतर पहिल्या १८ महिन्यांत त्यांनी खरोखरच काही करून दाखवलं… त्यांना अपेक्षित होता तो बदल खरोखरच घडत असल्याचं दिसू लागलं होतं. पण नंतर ते काँग्रेसच्या राजकारणानं त्यांना गुरफटून टाकलं. त्यातच ते अडकून गेले. मग काहीच घडलं नाही. पण त्यांचे पहिले १८ महिने खरोखरच उत्साहाचे होते. एकट्या टाटांसाठीच असं नाही. साऱ्या देशासाठीच. काही चांगली सूचना केली की त्यांनाही उत्साह वाटायचा… लगेच बोलवून घ्यायचे… अरुण सिंग, अरुण नेहरू यांनाही बोलवायचे काय करता येईल हे जाणून घेण्यासाठी… आपण हे का करू शकत नाही असं अधिकाऱ्यांना विचारायचे… आपण हे करू शकत नाही हा त्यांच्यासाठी मुद्दाच नसायचा. तर आपण हे का करू शकत नाही, हा त्यांचा प्रश्न असे. पण नंतर ते राजकारणात अडकले आणि पुढे तर सत्ताही गेली…

प्रश्न- तुम्ही कंपनीची सूत्रं हाती घेतल्यावर काही कठोर निर्णय घेतलेत… रुसी मोदी, अजित केरकर… नंतर… टाटा फायनान्स घडलं..

उत्तर- ते बरंच नंतर..

प्रश्न- हो बरंच नंतर… पण केरकर, मोदी…

उत्तर- हो ते करावं लागलं खरं मला… माझ्याकडे कंपनीची सूत्रं आली तेव्हा टाटा स्टीलची परिस्थिती खूप वाईट होती. टेल्कोतही संघर्ष होता… कामगार नेता राजन नायर त्याच्या काळातला संप… असं बरंच काही घडत होतं. ते कसोटीचे क्षण होते हे तर खरंच. पण हे क्षणच आपल्याला बरंच काही शिकवतात… घडवतात… मोठ्या लढाईसाठी तयार करतात… हे सगळं मी त्या क्षणांतनंच शिकलो…

प्रश्न- त्यानंतर… म्हणजे तुमच्याकडे कंपनीची सूत्रं आल्यानंतर… टाटा समूह चालवण्यात मूलभूत बदल झाला. तुम्ही सूत्रं हाती घ्यायच्या आधी अनेक बडे व्यवस्थापक वेगवेगळ्या कंपन्यांचं नियंत्रण करत होते, त्यांना समाजात एक प्रतिमा होती, चेहरा होता… तुम्ही ती व्यवस्था बदललीत. ब्रँड रॉयल्टीसारख्या वेगवेगळ्या संकल्पना तुम्ही राबवल्यात. मोठं आव्हान असेल ते त्या वेळी…

उत्तर- ते सर्व करणं आवश्यक होतं. कारण टाटा समूहाला एक सुलभ आकार देणं, त्याची पुनर्रचना करणं ही काळाची गरज होती. त्या वेळी आमच्यावर टीका झाली होती. अनेकांनी जेआरडींच्या बाबतही बोलून दाखवलं होतं की टाटा समूहातल्या कंपन्या वेगवेगळ्या दिशांनी जात आहेत. जवळपास ३५ वेगवेगळ्या मार्गांनी टाटा समूहाचं प्रतिनिधित्व केलं जात होतं. टाटा केमिकल्सचं एक बोधचिन्ह होतं. टाटा स्टील वेगळंच काहीतरी दाखवायचा. त्यातून टाटा म्हणून आमची काही एकसंध अशी प्रतिमाच तयार होत नव्हती. मी जर काही केलं असेल तर टाटांची समूह म्हणून एक अशी ओळख तयार केली. सर्वांना एका प्रतिमेत आणलं. टाटा नाव वापरण्यासाठी कंपन्यांकडून वेगळं शुल्क घ्यायला सुरुवात केली. या शुल्कासाठी आम्ही काही कोणाला जबरदस्ती केली नाही. पण हे शुल्क भरलंत तरच तुम्हाला टाटा हे नाव लावता येईल असं सांगितलं. ते द्यायचं नसेल तर तुम्हाला बॉम्बे हाऊसमध्ये जागा नसेल हे स्पष्ट केलं. त्यामुळे या नावाची म्हणून एक किंमत कळायला मदत झाली. या सगळ्यासाठी एक करार केला. तो सर्व कंपन्यांना पाठवला. त्या करारानुसार या कंपन्यांनी काही एक कार्यपद्धती, नीतिनियम पाळणं नक्की केलं. टाटा नाव लावायचं असेल तर ही कार्यपद्धती पाळणं हे सर्वांवर बंधनकारक झालं.

प्रश्न- या सगळ्याचा काही उपयोग झाला का? कारण टाटा सन्समध्ये टाटांचा असा मालकी वाटा नव्हता.

उत्तर- आम्ही ही मालकी वाढवली. २६ टक्क्यांपर्यंत नेली आणि मगच हे रॉयल्टी शुल्क वगैरे आकारायला सुरुवात केली. अन्यथा या कंपन्यांनी कशाला आमचं काही ऐकलं असतं? आधी आम्ही मालकी वाढवली आणि मगच हे करार केले.

प्रश्न- हे सगळं सरळपणे झालं? कारण तेव्हाची ती माणसं सगळी एकापेक्षा एक तगडी होती. दरबारी सेठ, रुसी मोदी वगैरे..

उत्तर- झाला… सुरुवातीला या सगळ्याला विरोध झाला. नाही असं नाही. परंतु लवकरच त्यांना मी काही म्हणतोय त्याचे फायदे दिसायला लागले. मग त्यांचं मतपरिवर्तन व्हायला सुरुवात झाली.

प्रश्न- पण त्या सगळ्या महानुभवांना असं वाटलं का की तुम्ही त्यांच्या साम्राज्याला आव्हान देताय म्हणून…

उत्तर- हो वाटलं ना. तसं वाटलं अनेकांना. पण पर्याय नव्हता. आणि ज्या उद्याोगांची ओळख टाटा या नावाशिवाय झाली होती, त्यांना आम्ही नाही हात लावला. उदाहरणार्थ ताज हॉटेल. त्या नावात आम्ही मुद्दाम टाटा हे नाव घुसवलं नाही. टायटन घड्याळांना टायटनच ठेवलं. त्यांच्यावर बदलाची सक्ती केली नाही. पण नंतर टाटा समूहाबरोबर असणं हे किती उपयुक्त आहे हे दिसल्यावर, जाणवल्यावर त्या कंपन्या स्वत:ला आम्ही टाटा समूहात आहोत, असं सांगायला लागल्या.

प्रश्न- आकडेवारी असं दर्शवते की तुमच्या काळात टाटा समूहानं मोठी भरारी घेतली. प्रत्येकाच्या कारकीर्दीत असा एक क्षण येतो की जो ओळखता येतो… हो… हा याचा क्षण. तुमच्या कारकीर्दीतला असा क्षण कोणता?

उत्तर- माझ्या आयुष्यातला असा क्षण म्हणजे अत्यंत कृश, तोट्यात गेलेली इलेक्ट्रॉनिक्स कंपनी नेल्को जेव्हा माझ्याकडे दिली गेली तो. त्या वेळी कंपनीची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. इतकी की पुढच्या महिन्यात कामगारांचे पगार देता येईल की नाही असा प्रश्न असायचा. त्या वेळी वेतनासाठी पैसे उसने घेण्यासाठी मला बँकांचे उंबरठे अनेकदा झिजवावे लागलेत. त्या काळात मी खूप शिकलो. परिस्थितीनं मला खूप शिकवलं, दिलंही.

प्रश्न- पण हा अनुभव नेल्कोपेक्षा कित्येक पट मोठं असलेला टाटा समूह चालवण्यासाठी पुरेसा होता?

उत्तर- तो पुरेसा नसता तर यापेक्षा मला ते शिकण्यासाठी यापेक्षा अधिक मोठ्या चुका कराव्या लागल्या असत्या. (हसतात) त्या काळात कामगार प्रश्न हाताळायचीही सवय मला झाली. अनेक कामगार नेत्यांशी संपर्क आला.

प्रश्न- गंमतच आहे. असा संपर्क आला म्हणून तुमची राजकारणाशी जवळीक नाही कधी निर्माण झाली. नवल टाटा यांनी चक्क लोकसभा निवडणूक लढवली… तुम्ही कधी त्यांना सल्ला नाही दिलात निवडणूक लढवू नका म्हणून…

उत्तर- हो दिलाना. मीच काय, पण कुटुंबातल्या सगळ्यांनीच त्यांना त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना खूप इच्छा होती राजकारणात प्रवेश करण्याची. पण माझ्या मनात तशी काही कधी इच्छा निर्माण झाली नाही. ते ती निवडणूक हरले. पण मग राज्यसभेत जावं अशी त्यांची इच्छा होती.

प्रश्न- ती १९७१ ची निवडणूक… असं होतं का, की त्या वेळी प्रतिस्पर्धी उद्याोग घराण्याचे के. के. बिर्ला राज्यसभेत होते. त्यामुळे नवल टाटांनाही इच्छा निर्माण झाली…

उत्तर- काही कळत नाही… त्या काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशीही संपर्क आला. सेनेच्या कामगार आघाडीचे प्रमुख दत्ताजी साळवी यांची कामगार संघटना होती नेल्कोत. त्यांच्याकडून बरेच अडथळे आणले जायचे. मग मी बाळासाहेबांकडे बऱ्याचदा साळवी यांच्याविरोधात तक्रार करायचो. ते कधी ऐकायचे. कधी नाहीत. पण पुढे एकदा गंमत झाली. मी टेल्कोत गेल्यावर टाटा इस्टेट ही नवी मोटार आम्ही विकसित केली.

प्रश्न- तुम्ही त्या वेळी सिएरा नावाची मोटारही आणली होती.

उत्तर-हो… ‘सिएरा’ आधीची. ‘इस्टेट’ तिच्यानंतर. इस्टेट ही सिएरापेक्षा आकाराने भली मोठी होती. ती बाळासाहेबांना मला वाटतं आवडली असावी. त्यांनी ती घेतली. पण त्या वेळी मोटारीची अभियांत्रिकी अगदीच प्राथमिक होती. सर्वच गोष्टीत सफाईचा आनंद होता. तर झालं असं की त्या मोटारीला सेंट्रल लॉकिंग होतं. त्याचा दर्जा इतका खराब होता की आतमध्ये बसल्यावर हे कुलूप काढलं तरी आपोआप स्वत:हून ते लागायचं. बाळासाहेबांच्या गाडीत तसं अनेकदा व्हायचं. त्यामुळे ते घाबरलेच. मला म्हणाले, ‘‘त्या कामगार प्रश्नांत मदत केली नाही म्हणून मला कुलूपबंद करायचा विचार दिसतोय तुझा…’’ (मोठ्यांदा हसतात) मग त्यांनी ती गाडी वापरणंच बंद केलं. परत पाठवून दिली नंतर त्यांनी ती गाडी.

प्रश्न- आता वयाच्या या टप्प्यावर मागे वळून पाहताना असं वाटतं का आपण भारतात जन्माला आलो नसतो तर अधिक काही करू शकलो असतो… आपण योग्य घरात, पण अयोग्य प्रदेशात जन्माला आलो…

उत्तर- नाही. असं अजिबात नाही. उलट मी स्वत:ला खूपच भाग्यवान समजतो. कारण माझ्याकडे कंपनीची सूत्रं येण्याचा काळ आणि देशात उदारीकरणाचे वारे वाहू लागण्याचा काळ एकच होता. ते तसं झालं नसतं तर तू म्हणतोयस तसं कदाचित मला वाटू लागलं असतं… मी कदाचित परत अमेरिकेला गेलो असतो. त्या अर्थाने मी खरंच भाग्यवान. अनेक क्षेत्रं गुंतवणुकीसाठी खुली झाली. आधी इतकी वर्षं जे काही करता आलं नाही ते आम्ही करू शकलो. लायसन्स परमिटराजच्या शेवटाची सुरुवात झाली. हे असं व्हावं यासाठी जेआरडींना किती संघर्ष करावा लागला होता. माझ्या काळात त्याला फळं आली.

प्रश्न- एक भारतीय म्हणून प्रश्न. भारतात संपत्ती निर्मितीला कधीच महत्त्व दिलं गेलं नाही. ते आपल्या संस्कृतीत नाही. जमशेटजी टाटा आणि अमेरिकेतले महाप्रचंड उद्याोगपती जॉन डी रॉकफेलर यांचा जन्म एकाच वर्षातला. पण रॉकफेलर ज्या गतीनं पुढे जाऊ शकले ती गती टाटा समूहाला कधी मिळाली नाही. तेव्हा असं वाटतं का टाटा जर अमेरिका, युरोपात असते तर अधिक काही करू शकले असते..

उत्तर- आपल्याकडे संपत्ती निर्मितीला महत्त्व नाही हे वाईट आहे. अगदी दु:खदायक आहे. त्यामुळे हे खरं आहे की टाटा जर अमेरिकेत, युरोपात असते तर नक्कीच अधिक प्रगती करू शकले असते. पण त्याच वेळी भारतावर टाटांचा जितका प्रभाव आहे तितका प्रभाव या बड्या देशात टाटा असते तर त्यांच्यावर पडला असता का? हा प्रश्नही मी स्वत:ला विचारतो. जमशेटजींनी जे काही प्रकल्प हाती घेतले ते सर्वच्या सर्व राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचे होते. पोलाद, वीज वगैरे. हे त्या वेळी कोणी खासगी क्षेत्रात करत नव्हतं. ते जमशेटजींनी केलं. आम्ही जर समजा अमेरिकेत असतो तर असं करणाऱ्या अनेकांमधले एक ठरलो असतो.

हे ही वाचा…कारवीचं फुलणं… एक क्लेशदायक अनुभव

प्रश्न- पण आपल्या देशात काही बदल घडतोय असं वाटतंय तुम्हाला… बदल म्हणजे उद्याोगाविषयीच्या दृष्टिकोनातले बदल..

उत्तर- मला वाटतंय बदल घडतोय… आता प्रगतीची सगळ्यांनाच आस लागलीये. पण समस्या ही आहे की आपल्याकडे प्रगतीमुळे द्वेष निर्माण होतो. एखाद्याची प्रगती होतेय असं दिसलं की त्याचे पाय ओढण्याचे प्रयत्न होतात. हे थांबायला हवं. आजच्या तरुणांमुळे ते थांबेल असं वाटतंय. कारण आपण प्रगती करायला हवी असं आता सगळ्यांनाच वाटू लागलंय… संपत्ती निर्मितीला महत्त्व द्यायला हवं हे सर्वांनाच कळू लागलंय… आनंद याचा आहे की हा असा बदल होताना तो घडवण्यात टाटा समूहाचा बराच वाटा आहे… आणि हेही आनंददायक आहे की या समूहाचा मीही एक घटक आहे…

मुलाखत संपली. रतन टाटा सैलावले. चहा झाला. त्यांचा स्वीय साहाय्यक म्हणाला, ‘‘ते आता सिंगापूरला निघालेत.’’रतन टाटांनी त्याला अडवलं. म्हणाले, ‘‘मी थोडा कार्यक्रमात बदल करावं म्हणतोय. मी आधीच्या कार्यक्रमानुसार इथूनच थेट विमानतळावर जाणार होतो. आता काही काळ घरी जाईन. मग सिंगापूरसाठी निघेन.’’

हा घरचा टप्पा का ते त्यांच्या साहाय्यकाला कळलं. घरचा कुत्रा आजारी होता. त्याची वास्तपुस्त करूनच मग त्यांना घर सोडायचं होतं. त्या दिवशी मग रतन टाटा घरी गेले. निघताना कार्यालयातून श्वानवैद्याकाशी त्यांना बोलायचं होतं. बोलले काही सूचना दिल्या घरी गेले. तासाभरानं सिंगापूरकडे रवाना झाले. दुसऱ्याच दिवशी सिंगापुरातून घोषणा झाली. सर्व मोठ्या वर्तमानपत्रांची ती त्या दिवशीची मुख्य बातमी होती. टाटा आणि सिंगापूर एअरलाइन्स पुन्हा नव्याने एकत्र येऊन नवीन विमान कंपनी स्थापन करणार होते. रतन टाटा त्याचसाठी सिंगापूरला गेले होते. त्या आधीच्याच या मुलाखतीत या विमान कंपनीचा उल्लेख होता, हा विलक्षण योगायोग. या समूहाचं उपभोगशून्य स्वामित्व दाखवणारा….(‘राजहंस’ प्रकाशनाच्या ‘टाटायन’ या गिरीश कुबेर लिखित पुस्तकातून साभार)

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta lokrang article interview with ratan tata sud 02