प्रा. राजा होळकुंदे
सध्या देशातील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थितीकडे नजर टाकली तर आपल्याला काय दिसून येते? देशातील विविध क्षेत्रांतील घडामोडी कोणत्याही संवेदनशील व्यक्तीला अस्वस्थ करणाऱ्या आहेत. न्याय, बंधु-भाव संपुष्टात आलेला आहे. सामाजिक आणि राजकीय परिस्थितीत कुठलाच गुणात्मक बदल होताना दिसत नाही. आपण एका अत्यंत विसंवादी, विरोधाभासी आणि विसंगतीने भरलेल्या गंभीर परिस्थितीत अडकलो आहोत. हे कसे बदलायचे? देशाच्या राजकारणाला एक मूलगामी कलाटणी मिळाल्याशिवाय अर्थपूर्ण बदलाकडे आपली वाटचाल सुरू होणार नाही. मग ही मूलगामी कलाटणी म्हणजे काय? ती कशी देता येईल? याचा मूलभूत विचार आणि सूत्रबद्ध चिंतन दत्ता देसाई यांच्या ‘सत्ताबदल : राष्ट्रीय चक्रव्यूहाचा भेद’ या पुस्तकात आहे.

सध्या सर्वच संवेदनशील व विचारी लोकांच्या मनात जे प्रश्न आहेत त्यातील तीन प्रमुख प्रश्न यात मांडलेले आहेत-१) आज जी परिस्थिती आहे ती नेमकी काय आहे? ती अशी का आहे? ती कशातून उद्भवली आहे? तिचे दर्शनी म्हणजे ताबडतोबीने दिसणारी कारणे कोणती आहेत आणि खोलवरची पोटात दडलेली कारणे काय आहेत? २) आजचे निष्ठुर व पाताळयंत्री सत्ताधारी कुठवर जातील? देशात ते अत्यंत क्रूर आणि दडपशाहीचा वरवंटा फिरवणारी राजवट आणतील का? ३) अशा परिस्थितीत आपण काय केले पाहिजे? इथे आपण म्हणजे अर्थातच भारताचे सर्वसामान्य नागरिक. सरकारबदल आणि सत्ताबदल हे आपल्याला कसे घडवावे लागतील? त्याचा राजकीयबरोबरच त्यापुढचे आणखी कोणते बदल घडवावे लागतील? या प्रश्नांची सविस्तर उत्तरे आपल्याला या पुस्तकात सापडतील.

करोनाकाळातील लॉकडाऊन आणि सामाजिक अंतराचे (सोशल डिस्टन्स) राजकारण कसे केले गेले, यामागे कोणती भूमिका होती यावर लेखकाने सविस्तर लिहिले आहे. त्यातून उद्भवलेला सामाजिक दुरावा, यामागे छुप्या पद्धतीने ठाण मांडून बसलेल्या स्पृश्य-अस्पृश्य कल्पना, सामाजिक अंतरातून प्रस्थापित व्यवस्थेने साधलेला डाव, भांडवलदाराची एकाधिकारशाही, आर्थिक उत्पन्नातील विषमता, नव फॅसिस्टवादाचा उदय ही सर्व अरिष्टे कशी निर्माण होत गेली याची सांगोपांग चर्चा या पुस्तकात आहे.

या सर्व गोष्टीला उजव्या प्रतिगामी दमनकारी शक्ती कारणीभूत आहेत. त्यांच्या उदयामुळेच ही सगळी परिस्थिती उद्भवली आहे. या परिस्थितीचे काय करायचे हा आता मुख्य प्रश्न आहे. लोकांनी आपले लक्ष याच गोष्टीवर केंद्रित केले पाहिजे. मूळ सामाजिक वास्तवाला भिडल्याशिवाय नव हिंदुत्व-जमातवाद-नवफासी वादाच्या रूपात जे संकट निर्माण झाले आहे त्याचा निचरा होणार नाही.

सत्ताधारीवर्गीय हितसंबंधांना आजची स्थिती मनापासून बदलणे शक्य होणार नाही. ही कोंडी फोडण्याचे आव्हान प्रागतिक देशप्रेमी व परिवर्तनवादी सामाजिक व्यक्तींनाच पेलावे लागणार आहे. अर्थात त्यासाठी नवीन दृष्टी आणि नवे व्यवहार कोणते हाही प्रश्न आहे. हे सारे नव्याने लोकांसमोर मांडावे लागेल. या पुस्तकातून याची चर्चा सविस्तरपणे आलेली आहे.

आज देशात गरिबी, बेरोजगारी, महागाई, हिंसा, जगण्यातला बेदरकारपणा या गोष्टी वाढत आहेत, यातून एक आर्थिक संकट किंवा अरिष्ट उभं राहताना आपल्याला दिसत आहे. पण आर्थिक संकटाची कोणत्याही स्वरूपाची एकांगी व्याख्या करून चालणार नाही असे लेखक म्हणतो.

‘मूळ समस्या आणि तोकडी व्यवहारवादी उत्तरे!’ हे प्रकरण तर मुळातूनच वाचण्यासारखे आहे. यात हिंदुत्ववादाचा विचार, हिंदुत्वविचार आणि हिंदुत्ववाद कसा उदयाला आला. आधुनिक कायदे कसे धार्मिक पायावर उभे केले गेले. युरोपकेंद्री तसेच युरोपीय चष्म्यातून केली गेलेली आणि हिंदू- मुस्लीम फारकतीवर आधारित इतिहास मांडणी येथे कशी प्रस्थापित केली गेली. याविषयीची चर्चा या प्रकरणात केली गेलेली आहे. ‘सत्योत्तर जग आणि नवी वळणे’ या प्रकरणात आज होणाऱ्या विकासाविषयी आणि बदलत चाललेल्या वैचारिकतेविषयी त्यांनी काही महत्त्वपूर्ण गोष्टींची नोंद घेतलेली आहे. आता आपण सत्योत्तर (पोस्टट्रूथ) जगात आहोत असे भासवून असत्याची चलाखीने निश्चिती करून लोकांवर हेच सत्य कसे आहे हे सांगून सद्या:स्थितीत ते लादले जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नवे सामाजिक प्रबोधन होणे हे अनेक कारणांनी व विविधरीतीने अपरिहार्य कसे झाले आहे याची सविस्तर मांडणी लेखकाने केलेली आहे.

नव्या राजकारणाचे धुरीणत्व तसेच जनतेच्या भारतासाठी अशी नव्याने मांडणी करणारी प्रकरणेही यात आहेत. एकुणात काय, तर सत्ता म्हणजे काय आणि बदल म्हणजे काय? देश स्वतंत्र होताना झालेला सत्ता-बदल हे सत्ता हस्तांतरण होते. ते क्रांतिकारी परिवर्तन नव्हते असे म्हटले गेले. आपली चौकट बदलली, तरी अनेक बाबतीत ती तशीच राहिली. देशाने अनेक बरी वाईट वळणे घेतली. काही प्रश्न सुटत गेले, अनेक प्रश्न तसेच राहिले, तर बरेच नवे प्रश्न उभे होत गेले. आपला देश जगाच्या नजरेत भरेल असे अफाट संपन्नता, विकासाच्या घोषणा, प्रचंड विसंगती, असह्य विषमता व घुसमटवून टाकणारे वातावरण अनुभवतो आहे. ही साधीसुधी कोंडी नाही. हा राष्ट्रीय स्वरूपाचा चक्रव्यूह आहे!

हा चक्रव्यूह नेमका काय आहे? तो कसा भेदता येईल? त्यासाठी देशाच्या राजकारणाला कोणती मूलगामी वैचारिक राजकीय कलाटणी मिळायला हवी? याची चर्चाही पुस्तक करते. त्यामुळेच हे पुस्तक या देशावर व इथल्या विविधतेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी आहे. विषमता आणि विध्वंस यांनी अस्वस्थ होणाऱ्या भारतीय माणसांसाठी हे पुस्तक आहे. विचारांचे स्वातंत्र्य आणि कृतीचे महत्त्व ओळखणाऱ्या प्रत्येकासाठी ते आहे. नवे काही घडवण्यासाठी उत्सुक असलेल्या प्रत्येक युवक- युवतींसाठीही हे पुस्तक आहे.

संघ जरी सकल हिंदू बंधू म्हणून वाटचाल करत असता तरी त्यांच्या मनात मनुस्मृती पक्की होती. ती या देशाची घटना असली पाहिजे असे त्यांना वाटत होते. त्यामुळे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा चवदार तळ्याचा सत्याग्रह, हरिजनाने मंदिर प्रवेश, एक गाव असताना परिवर्तनवादी मंडळी पूर्णपणे बेसावध होती. प्रस्तावनेत एके ठिकाणी देवदत्त दाभोळकर असे म्हणतात की, ‘‘३० जानेवारी १९४८ रोजी संध्याकाळी महात्मा गांधींचा खून झाल्याची बातमी आली. सारे शहर शोकाकुल झाले. बातमी आल्यावर प्रथमच संघ शाखा मध्यावरच सोडण्यात आली. मात्र दुसऱ्या दिवशी एक स्वयंसेवक घरी आला आणि तोही हातात पेढे असणारा. ६ मे १९४८ रोजी सरदार पटेल यांनी श्यामाप्रसाद मुखर्जी यांना पत्र पाठवून सांगितले, ‘गांधीजींचा खून संघाने कट करून केला की नाही हे आपणाला कदाचित कळणार नाही. मात्र संघाने या देशात जे विषारी वातावरण निर्माण केले त्यातूनच खून झाला हे उघड आहे आणि माझ्याकडे आलेल्या अहवालाप्रमाणे भारतभर मिठाई वाटून संघाच्या स्वयंसेवकांनी तो साजरा केलाय.’

सध्याच्या परिस्थितीचा उत्तम पद्धतीने ऊहापोह करणारे हे पुस्तक आहे.

‘सत्ताबदल : ‘राष्ट्रीय चक्रव्यूहाचा भेद’’- दत्ता देसाई, मनोविकास प्रकाशन, पाने- २३२, किंमत- ३२० रुपये.