आरती कुलकर्णी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पर्यावरणाच्या डॉक्युमेण्ट्रीज्चा थरार खूप मोठा आहे. तुम्ही एखादी गोष्ट ठरवता, पण निसर्ग तुमच्या डॉक्युमेण्ट्रीचा खरा पटकथाकार असतो. तो तुमच्या पदरात असं काही दान टाकतो की तुम्ही जन्मभराचे अचंबित होऊन जाता.. निसर्गाला आणि त्यातील वेचक क्षणांना टिपताना आलेल्या अनुभवांचा शब्दपट..

मी ज्या डॉक्युमेण्ट्री बनवते त्या निसर्गाशी आणि पर्यावरणाशी निगडित असतात. त्यामुळे एखाद्या घनदाट जंगलात, समुद्रकिनारी, नदीकिनारी, गवताळ माळरानामध्ये किंवा अगदी उजाड वाळवंटामध्ये झाडं, पक्षी, प्राणी यांच्यासोबत मला जे अनुभव येतात ते सगळयांना सांगावे. मी जे पाहिलं, अनुभवलं ते सगळयांपर्यंत पोहोचावा ही माझी डॉक्युमेंटरी बनवण्याची मूळ प्रेरणा आहे. या गोष्टी सांगताना मी फक्त माध्यम आहे. ती गोष्ट, त्याच्याशी जोडलेला निसर्ग आणि तो जपणारे लोक हेच माझ्या डॉक्युमेण्ट्रीचा आत्मा आहेत, याचं भान मला सतत असतं.

या अनुभवाला २० वर्ष होत आली आता. ‘सह्याद्री निसर्ग मित्र’ संस्थेसह पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत अशी एक दिवस मी कोकणकिनाऱ्याची यात्रा केली होती. त्या दिवशी मी कोकणच्या निसर्गाचा जो अनुभव घेतला तो माझ्या मनावर कायमचा ठसला. ‘सह्याद्री निसर्ग मित्र’च्या कार्यकर्त्यांनी ऑलिव्ह रिडले सागरी कासवांच्या संवर्धनाचं काम सुरू केलं होतं. भाऊ काटदरे आणि राम मोने यांचं हे काम पाहण्यासाठी मी वेळासच्या किनाऱ्यावर गेले होते. आता वेळास ‘कासवांची पंढरी’ म्हणून नावाजलं आहे, पण त्यावेळी तिथे नुकत्याच या चळवळीच्या पाऊलखुणा उमटल्या होत्या. या संस्थेने कासवांची घरटी जपून ठेवण्यासाठी एक ‘हॅचरी’ उभारली होती. तिथे वाळूच्या कुशीत कासवांची पिल्लं जन्म घेत होती..

हेही वाचा : दोन प्रवाहांची त्रिवेणी! सजग वाचकांचा महोत्सव..

कोकणच्या समुद्रकिनाऱ्यावर घडणारं हे कासवांचं जन्मनाटय चित्रित करावं असं वाटलं आणि माझ्या पहिल्या डॉक्युमेण्ट्रीचा जन्म झाला. ‘गाज.. उं’’ ऋ ३ँी डूींल्ल.’ गाज म्हणजे समुद्राच्या लाटांचा घनगंभीर नाद. किनाऱ्यावर सतत वाजत राहणाऱ्या या आवाजाचं पार्श्वसंगीत या डॉक्युमेण्ट्रीमध्ये मुरलं.

कोकणच्या समुद्राची गोष्ट शाळकरी मुलांना सोबत घेऊन सांगावी असं मला एकदा अचानक सुचलं. रत्नागिरीसोबतच सिंधुदुर्गाच्या समुद्राची साथ महत्त्वाची होती. मग थेट मालवणच्या टोपीवाला हायस्कूलमध्ये जाऊन थडकले. तिथे मुलांशी गप्पा मारताना सागरी कासवं, डॉल्फिन, समुद्री गरुड, हिवाळयात इथे स्थलांतर करून येणारे सीगल्स, समुद्रात बेटांवर घरटी करणाऱ्या पाकोळयाही सोबत येऊ लागली.

माझा सागरी संशोधक मित्र सारंग कुलकर्णी तेव्हा अंदमानमध्ये संशोधन करत होता. सारंग स्कुबा डायव्हिंगमध्येही तरबेज. त्याला म्हटलं, ‘‘तू अंदमानात काम करतोस. एकदा कोकणात ये. तिथल्या समुद्राखाली काय दडलंय तेही बघूया.’’ सारंग त्याचा साथीदार अनिसला घेऊन आला आणि त्यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या अवतीभवतीच्या समुद्रात स्कुबा डायव्हिंग करून प्रवाळ भित्तिका, लाटांवर लहरणारी शेवाळं, रंगीबेरंगी वनस्पती, माशांचे घोळके असं सगळं चित्रित केलं. कोकणातल्या समुद्राखाली जाऊन त्याचं चित्रण करण्याचा हा पहिलाच प्रयत्न.
निवतीच्या समुद्रात बन्र्ट आयलंडवर जाताना असेच समुद्रातले मित्रगण भेटले. त्या दिवशी निवतीचे श्रीधर मेहतर, सारंग कुलकर्णी, टोपीवाला हायस्कूलची मुलं आणि मी पाहिलेला थरार मी आयुष्यभर विसरणार नाही. सुमारे ५० डॉल्फिन आमच्या बोटीच्या भोवती मोठमोठया उसळया घेत होते. त्यांचं ते प्रदर्शन पाहून मुलं चित्कारत होती तसतसा डॉल्फिन्सना अजून जोर चढत होता.

हेही वाचा : ‘शकलो’त्तर संमेलन..

निवतीच्या किनाऱ्यावर गेलो तर तिथे एक भलंमोठ्ठं ‘ग्रीन टर्टल’ एका होडीजवळ उपडं करून ठेवलं होतं. आता कासवांबद्दल खूपच जागृती झाली आहे, पण त्यावेळी या कासवाची शिकार करण्याचा मच्छिमारांचा बेत असावा. आम्ही अगदी योग्य वेळी तिथे पोहोचलो. मग सारंगने त्या कासवाला सरळ करून हायसं केलं. मुलांनी मिळेल त्या छोटयाछोटया डबडयांमधून पाणी आणून त्याच्यावर शिंपडलं. हळूहळू कासवाला धीर आला आणि ते समुद्राकडे जाऊ लागलं. जोरजोरात पुढे सरकत लाटांपर्यंत गेलं. ते हिरवं कासव समुद्रात दिसेनासं होईपर्यंत आम्ही किनाऱ्यावर थांबलो होतो.. डॉक्युमेण्ट्रीसाठी वेळासला ऑलिव्ह रिडले कासवांच्या पिल्लांचं शूटिंग करायचं होतं. किनाऱ्यावर जाताना गावातल्या छोटया मुलांना गोळा केलं. त्यादिवशी सकाळीच हॅचरीमधून कासवांची पिल्लं बाहेर आली होती.. वेळासच्या किनाऱ्यावर चिल्लीपिल्ली उभी राहिली, त्यांनी एकेक पिल्लू समुद्रात सोडलं. समुद्रात जाणाऱ्या पिल्लांची शर्यत पाहताना भरून आलं..

‘गाज’चं चित्रण करताना तेव्हा ध्यानीमनीही नव्हतं की, याच कोकणच्या किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले कासवांबद्दल एक ऐतिहासिक प्रयोग होणार आहे आणि आपण त्यावरही डॉक्युमेण्ट्री करणार आहोत. करोनाच्या टाळेबंदीनंतर २०२२ साली कोकणात कासवांना सॅटेलाइट ट्रान्समीटर बसवण्याचा प्रयोग झाला. यावर तयार झाली ‘अँटिनावालं कासव’ ही डॉक्युमेण्ट्री. गुहागरच्या किनाऱ्यावर त्यावर्षी कासवं मोठया प्रमाणात अंडी घालण्यासाठी आली होती. अशाच एका कासविणीने अंडी घालून घरटं बुजवल्यानंतर तिला रात्रभर किनाऱ्यावर थांबवून ठेवण्यात आलं. या कासविणीला सॅटेलाइट ट्रान्समीटर बसवायचा होता. हा ट्रान्समीटर लावण्यासाठी कासविणीला पकडल्यानंतरची ती रात्रही मी कधीच विसरणार नाही. ही कासवीण अंडी घालून, खड्डा बुजवून समुद्रात निघाली होती.. अजूनही ती तंद्रीतच होती. तिला तातडीने तिच्या अधिवासात जायचं होतं. तिची घालमेल पाहवेना. तिला त्रास होऊ नये म्हणून आम्ही ‘फ्लॅश’ टाकून शूटिंगही केलं नाही. पर्यावरणाच्या डॉक्युमेण्ट्री करताना ही नैतिकता पाळणं फार महत्त्वाचं आहे. तुमच्यासमोर एखादी अतिशय थरारक घटना घडत असते ती चित्रित करण्याचा मोह तुम्हाला होतोच, पण तरीही आपल्या चित्रीकरणाच्या मोहापायी तुम्ही त्या वन्यप्राण्यांना हानी पोहोचवत नाही ना, हे फार महत्त्वाचं असतं. तुम्ही संयम दाखवलात तर निसर्ग संशोधक त्यांच्याकडे असलेलं, त्याहीपेक्षा दुर्मीळ चित्रण तुम्हाला द्यायला तयार होतात, असा माझा अनुभव आहे.

‘नातं पश्चिम घाटाशी’ ही माझी आणखी एक डॉक्युमेण्ट्री. यासाठी आम्ही वर्षभर वेगवेगळया ऋतूंमध्ये पश्चिम घाटातल्या सहा राज्यांत िहडलो. सह्याद्रीच्या संवर्धनामधल्या आव्हानांचा वेध घेतला आणि यासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांना भेटलो. त्याचबरोबर माधव गाडगीळ यांच्या पश्चिम घाट संवर्धन समितीचं कामही सगळयांसमोर आणलं. टेलिव्हिजन चॅनलसाठी काम करत असतानाही मी डॉक्युमेण्ट्रीचं व्रत सोडलं नाही. ताडोबा जंगलाच्या अगदी जवळ कोळशाच्या खाणी येणार होत्या. चंद्रपूरचे लोक आणि त्या जंगलातले आदिवासी याविरुद्ध आंदोलन, उपोषण करत होते. ‘घुसखोरी वाघाच्या जंगलात’ या डॉक्युमेण्ट्रीमधून मी ही जंगलाची कहाणी मांडली. लोकांचं आंदोलन आणि आमचा रिपोर्ताज याचा योग्य तो परिणाम झाला आणि या जंगलातली कोळसा खाण सरकारला रद्द करावी लागली. कोकणातल्या ऊर्जाप्रकल्पांवर मी ‘हिरवं कोकण धगधगतंय’ असा एक रिपोर्ताज केला होता.

हेही वाचा : आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: बौद्धिक कसरत..

डॉक्युमेण्ट्रीमधून आपल्या निसर्गसंपदेचं शास्त्रीय दस्तावेजीकरण व्हावं, प्रत्यक्ष मैदानात काम करणाऱ्या पर्यावरण कार्यकर्त्यांचे प्रयत्न सगळयांसमोर आणावे, त्यांच्या कामाला मदत आणि पािठबा मिळवून द्यावा आणि पर्यावरण संवर्धनाचे निर्णय घेणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचावं हा माझा उद्देश असतो.
हे सगळं करत असताना परदेशात जाऊन डॉक्युमेण्ट्री करण्याची एक संधी माझ्याकडे चालून आली. इजिप्तमधल्या नाईल नदीवर तिथे पंधरा दिवस राहून डॉक्युमेण्ट्री केली. नाईल नदी इजिप्तमध्ये प्रवेश करते त्या आस्वानपासून ते अलेंक्झांड्रियाला ती भूमध्य समुद्राला मिळते तिथपर्यंत आम्ही नाईलची यात्रा केली. कैरोमधल्या फेस्टिवलमध्ये ही फिल्म दाखवण्यात आली तेव्हा गंगा आणि नाईलचा संगम झाल्याचा अनुभव आला. पुढे इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर आले तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मला भारत- इजिप्त शिष्टमंडळामध्ये आमंत्रित केलं होतं. आता माझा हा डॉक्युमेण्ट्रीचा प्रवास डिजिटल झाला आहे. ‘नागझिऱ्याची प्रेमकथा’ ही माझी पहिलीवहिली डिजिटल डॉक्युमेण्ट्री. नागझिऱ्याजवळ पिटेझरीला राहणारे किरण पुरंदरे या जंगलाशी जोडलेले आहेत. जंगलात फिरून त्यांच्याशी संवाद साधतासाधता माझ्या आयफोनवर मी ही फिल्म केली.

हेही वाचा : शिकवताना शिकण्याचा प्रवास..

जंगल ट्रेलसाठी मोठा कॅमेरा वापरला, पण आयफोनमुळे किरण पुरंदरेंशी, तिथल्या जंगलाशी अगदी निकटचा संवाद साधता आला. ही डॉक्युमेण्ट्री आम्ही एडिट करून दाखवणार तर टाळेबंदी सुरू झाली. या काळात लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मग ‘शेकरू’ नावाचं यूटय़ूब चॅनल सुरू केलं आणि ही फिल्म सर्वदूर पोहोचवता आली. अलीकडेच मी नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्यावरही अशीच डिजिटल फिल्म केली आहे. डॉक्युमेंटरी करताना तुमची गोष्ट जेवढी साधीसोपी तेवढी ती जास्त पोहोचते, असा माझा अनुभव आहे. तो अनुभव तुम्ही जेवढा एकरूप होऊन घ्याल आणि प्रामाणिकपणे सांगाल तेवढे प्रेक्षकही त्याच्याशी जोडले जातात. त्यातही पर्यावरण रक्षणासाठीच्या उपायांवर लक्ष केंद्रित केलं तर त्यातून एक सकारात्मक संदेश पोहोचतो. आपल्या डॉक्युमेण्ट्रीची कितीही वाहवा झाली, पुरस्कार मिळाले तरी एखाद्या जंगलात पाऊल न वाजवता गेल्यावर तिथली फुलपाखरं हवेत विखुरतात, रात्रीच्या नीरव शांततेत झाडांवर असंख्य चांदण्या येऊन बसतात, संध्याकाळच्या तळयावर जमलेली हरणं सावधपणे एकटक आपल्याकडे पाहात राहतात. असे कितीतरी क्षण अनमोल आहेत. आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत हेच करत राहावं आणि झाडं, पक्षी, प्राणी यांच्या नजरेतूनच जगाकडे पाहावं, असं मला वाटतं.

पत्रकार आणि डॉक्युमेण्ट्री मेकर ही ओळख. गेली २५ वर्ष पर्यावरण क्षेत्रात कार्यरत. दोन वेळा रामनाथ गोएंका पुरस्काराने सन्मानित. नाईल नदीवर त्यांनी बनवलेल्या लघुपटाची दखल जागतिक पातळीवर. वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या सल्लागार.

arti.kulkarni1378@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: We the documentry maker capturing nature turtul and coastal area of konkan css
First published on: 18-02-2024 at 01:09 IST