-धनंजय भावलेकर
डॉक्युमेण्ट्री फिल्मनिर्मिती प्रक्रिया म्हणजे एक बौद्धिक व्यायाम आहे. व्यवस्थापन कौशल्य चांगल्या पद्धतीने शिकायचे असल्यास चित्रपट करण्याआधी दोन-तीन डॉक्युमेण्ट्री करायला हव्यात. त्यातून संशोधनाची आवड निर्माण होते, लोकांच्या भेटी होतात, त्यांचे प्रत्यक्ष अनुभव ऐकायला मिळतात. पुढे सिनेमा लिहिताना, निर्मिती प्रक्रियेत कथेतील व्यक्तिरेखा आणि त्यांचे स्वभाव रेखाटायला मदत मिळते..
माहितीपट या माध्यमाचा उपयोग आपल्या भवतालची जाणीव करून देण्यासाठी होतो. आता कसली जाणीव, हा प्रश्न पडू शकतो. आपण लोकशाहीप्रधान राष्ट्रात राहत असल्याने संविधानाने लोकांना स्वातंत्र्याचे अधिकार दिलेले आहेत- त्यापैकीच अभिव्यक्ती स्वातंत्र्य. माहितीपटातून स्वातंत्र्य, बंधुता, समता ही मूल्ये पेरणे गरजेचे वाटले. त्यामुळे मी अनेक वेगवेगळे सामाजिक प्रश्न आणि विविध प्रवाहात झटणाऱ्या, लढणाऱ्या लोकांचा संघर्ष पडद्यावर मांडला. मी कुठल्याही अमुक विषयांवरील माहितीपट पाहिले आणि ते मला भावले अन् म्हणून मी माहितीपट माध्यमाकडे वळलो, असे अजिबात घडले नाही. किंवा कुठलेही औपचारिक शिक्षण घेतले नाही, लोकांशी संवाद साधण्याची आणि त्यांच्या अंतर्मनात प्रवेश करण्याची उपजत कला अवगत होती. छोटया छोटया गांवांमधून अनेक लोक शहराकडे काम -धंदा शोधायला येतात. शहराच्या मधोमध किंवा बाहेर वस्त्या तयार होतात. मी आणि माझे कुटुंब असेच स्थलांतरित झालेलो.
हेही वाचा…आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: सामाजिक चळवळींच्या निमित्ताने..
अन्न- वस्त्र- निवारा -चांगली आरोग्यपूर्ण जीवनपद्धती मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. आजूबाजूला भेडसावणारे अनेक प्रश्न होते. खऱ्या अर्थाने तेथील घटना या वास्तवाला धरून होत्या. हे सगळे लोकांपर्यंत पोहचवणे महत्त्वाचे होते. पथनाटय़ातून सुरू झालेला प्रवास, एकांकिका, दीर्घ अंक, दोन अंकीपर्यंत अन् मग माहितीपट निर्मितीपर्यंत येऊन पोहोचला. कचराप्रश्नापासून ते आदिवासी लोकभाषांपर्यंत अनेक विषय माहितीपटातून हाताळले. या फिल्म्सची दखल अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवात घेतली गेली.
थोडक्यात, सर्वप्रथम माध्यम हाताळले आणि मग त्याच्या शास्त्रीय बाजूंकडे वळलो. त्यातले सिद्धांत समजून घेतले असे म्हणायला हरकत नाही. विविध फिल्म फेस्टिव्हलचे भरघोस पीक हे अलीकडच्या दहापंधरा वर्षांत आलेले दिसते, तेव्हा म्हणजे साधारण दोन दशकांपूर्वी काही शिबिरांमध्ये किंवा कोणाकडून तरी माहितीपट मिळवून पाहावे लागायचे. मागील एक दीड दशकात डिजिटल उपकरणे आल्याने आता निर्मिती प्रक्रिया अधिक सोपीदेखील झालेली दिसते. आनंद पटवर्धन यांच्या ‘राम के नाम’, ‘वॉर अॅण्ड पीस’, ‘नर्मदा डायरी’, ‘हमारा शहर- बॉम्बे’, मीरा नायर यांच्या ‘जामा स्ट्रीट मसजीद जर्नल’, ‘सो फार फ्रॉम इंडिया’, ‘चिल्ड्रेन ऑफ डिजायर्ड सेक्स’, श्याम बेनेगल यांची ‘नेहरू’, जब्बार पटेल यांची ‘हंस अकेला’ याबरोबर फिल्म डिव्हिजनने केलेल्या अनेक डॉक्युमेण्ट्रीज नंतर पाहिल्या.
हेही वाचा…आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: वास्तव मांडण्याची कला..
डॉक्युमेण्ट्री हे माध्यम सिनेमा करण्याआधी हाताळल्यास विषयाकडे पाहण्याची दृष्टी नक्कीच प्रगल्भ व्हायला मदत होते, उदा. मार्टिन स्कॉर्सीस, जेम्स कॅमेरॉन या ज्येष्ठ दिग्दर्शकांनी आपल्या चित्रपटांतून एकापेक्षा अनेक ऑस्कर किंवा इतर आंतरराष्ट्रीय पारितोषिके घेतली; परंतु त्याआधी डॉक्युमेण्ट्री फिल्म्सदेखील केल्या. आपल्या इथे सिनेमा म्हणजे एकदम सुंदर आणि डॉक्युमेण्ट्री म्हणजे काहीतरी बोजड बौद्धिक असे समजले जाते. मी चित्रपट केला आहे, आता डॉक्युमेण्ट्री का करू? असा संकुचित विचार जोपासला जातो. खरे तर ही दोन्ही माध्यमे आपापल्या स्थानी महत्त्वाची आहेत. त्यांची बलस्थाने स्वतंत्र आहेत, याविषयी साक्षरता व्हायला हवी.
डॉक्युमेण्ट्री म्हणजेच माहितीपट हा दृक् श्राव्य माध्यमातील अतिशय महत्त्वाचा ‘‘संवर्धन’’ मूल्य असलेला प्रकार आहे. कारण माहितीपटांचा संबंध थेट वास्तवाशी असतो. आता डॉक्युमेण्ट्री का महत्त्वाची आहे?, ती करून व्यावसायिक मोबदला मिळतो का?, त्यासाठी व्यासपीठ आहे का?, डॉक्युमेण्ट्री फिल्म करत असताना गुंतवलेले पैसे परत येतात का? असे अनेक प्रश्न निर्माता किंवा आर्थिक मदत करणारा विचारत असतो. हे प्रश्न इतके भंडावून सोडणारे असतात की माहितीपट करण्याचा विचार करणाऱ्या दिग्दर्शकाची भंबेरी उडते. अशीच काही स्थिती सुरुवातीला माझीही झाली. डॉक्युमेण्ट्री एखाद्या संस्थेची, व्यक्तीजीवन किंवा त्याच्या कार्यावर आधारित अथवा उत्पादक कंपनीच्या जाहिरातीसाठी केल्यास माहितीपटासाठी प्रायोजक किंवा निर्माता सहज मिळू शकतो, कारण त्यामागे एक ठरावीक उद्देश असतो. तो हा की त्यांना त्यांचा विषय समाजातील विविध लोकांपर्यंत पोहचवायचा असतो. याउलट काही माहितीपट हे संवेदनशील प्रश्न हाताळत असतात. ज्यामध्ये प्रस्तुत विषयाचे संवर्धन, जतन हा प्रमुख मुद्दा असतो. अशा डॉक्युमेण्ट्री या सामाजिक, कलात्मक उद्देश ठेवून केल्या जातात.
हेही वाचा…आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : ‘गॉड इज द डिरेक्टर?’
नुकतीच आम्ही एक डॉक्युमेण्ट्री फिल्म केली- जिचे नाव ‘समास’ असे आहे. या फिल्मचे निवेदन डॉ. मोहन आगाशे यांनी केले आहे. तब्बल दोन ते अडीच वर्षे या माहितीपटाचे काम सुरू होते. या फिल्मचे शूटिंग दिल्ली, पुणे, धारवाड तसेच गुजरात येथील तेजगड आश्रमात केले गेले. कुठलाही निधी उपलब्ध नसताना केवळ एका छोटय़ाशा कॅमेरावर या फिल्मचे शूटिंग केले. या फिल्ममध्ये ७८० च्या आसपास लोकभाषांचे विविध राज्यांचे सर्वेक्षण ज्यांनी ज्यांनी केले त्यांना भेटलो. डॉ. गणेश देवी आणि त्यांचे सहकारी हे भाषा संशोधनाचे काम करत असताना काय काय अडचणी आल्या, त्यावर कशी मात केली याविषयी बोलले आहेत. आदिवासी पाडे, त्यांचे राहणीमान, संस्कृती अशा अनेक गोष्टींची उकल शूटिंगदरम्यान करण्यात आली. त्यानंतर युनेस्कोने मरू घातलेल्या भाषांची प्रसिद्ध केलेली यादी पाहिली. त्यात जवळ जवळ भारतातील १०० भाषांचा समावेश केला होता. एकीकडे ‘समास’ फिल्मचे काम सुरू असतानाच ‘युनेस्को’च्या यादीतील महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेशमधील एकूण अकरा भाषा कॅमेरामध्ये चित्रित करण्यात आल्या. त्यांचे दस्तावेजीकरण करण्यात आले, हे काम आम्ही गुजरातच्या ‘भाषा फाऊंडेशन’ मदतीने पूर्ण केले. आणि ‘समास’ करता करता त्या बरोबर ‘दे आर डाईंग’ या मरणाच्या वाटेवर असणाऱ्या भाषांसंदर्भातील माहितीपटाची निर्मिती झाली. म्हणजे दोन्ही डॉक्युमेण्ट्री फिल्म्सचे विषय भाषा आणि जगणे यांच्याशी निगडित होते; पण प्रश्न, आशय वेगवेगळे होते.
माहितीपटासाठी विषयाची निवड करताना अनेक गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. विषयाचा आवाका, संशोधन, चित्रीकरणाचे एकूण दिवस, तंत्रज्ञ, लागणारी इतर टीम, वापरण्यात येणारे तंत्रज्ञान, उपलब्ध असणारे संदर्भ, विषय तज्ज्ञ आणि त्यांच्या भेटी, चित्रीकरणाची स्थळे, दृश्यात्मक मूल्ये आणि हे सगळे जुळवून आणण्यासाठी लागणारे अर्थसाहाय्य. माहितीपट करत असताना टीम मर्यादित असते; परंतु कामाच्या जबाबदाऱ्या अनेक असतात. प्रायोजक किंवा निर्माता नसेल तर ही प्रक्रिया अधिक जिकिरीची असते. उपलब्ध असलेली साधने आणि प्रतिकूल परिस्थितीत अनेक चांगले विषय हाताळले जाऊ शकतात याचे उदाहरण म्हणजे ‘समास’, ‘जिप्सी’, या डॉक्युमेण्ट्री फिल्म्स. सर्व तंत्रज्ञ मित्र विषयाबाबत तेवढेच संवेदनशील असतील तर ओझे कमी होते. सर्वजण एका समविचारी भूमिकेवर एकत्र येऊन काम करत असल्याने निर्मितीचा प्रवास खूप सोपा आणि सर्जनशील होतो.
हेही वाचा…आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: काळाची बखर
स्वतंत्रपणे कॅमेरा, एडिटिंग, साऊंड ही तंत्र हाताळण्याची आणि अवगत करण्याची संधी डॉक्युमेण्ट्रीमुळे मिळते. अलीकडे माहितीपट करण्याचा कल थोडा कमी झालेला दिसतो. साहजिकच सोशल मीडियावर येणारा मजकूर इतका अल्पायुषी असतो की सतत तुम्हाला तात्पुरत्या परिणाम करणाऱ्या नवनवीन गोष्टी शोधाव्या लागतात. याउलट एका परिपूर्ण माहितीपटाच्या निर्मितीसाठी संशोधन आणि पुरेसा वेळ द्यावा लागतो. फक्त ढोबळ माहिती पुरवली की झाला माहितीपट असे नसून, ती माहिती आपण गोष्टी सांगणारे म्हणून कुठल्या पद्धतीने मांडतो कुठल्या फॉर्ममध्ये पोहचवतो ते महत्त्वाचे असते. काही माहितीपट फक्त निरीक्षणात्मक असतात. असंख्य दृश्यांची शृंखला गुंफून त्यामधून प्रेक्षक अर्थ शोधत असतात. काही माहितीपट मुलाखती वर आधारित असतात तर काही दृश्य आणि मुलाखती यांचे मिश्रण असते. आज जगभरात अनेक माहितीपट महोत्सव होतात. पर्यावरण, समाजकारण, राजकारण याविषयी विविध संदेश देणारे माहितीपट यांचा समावेश या महोत्सवांत दिसतो.
समाजवादी नेते, कार्यकर्ते माजी गृह राज्यमंत्री भाई वैद्य आणि आरोग्य सेना निर्मित राष्ट्र सेवा दलाचे पन्नालाल सुराणा यांच्यावर माहितीपट करण्याची प्रक्रिया रोमांचक होती. कारण फक्त व्यक्तीचा इतिहास दाखवून उपयोग नव्हता, या दोन्ही डॉक्युमेण्ट्रीमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळ आणि त्यानंतर काळानुसार होत आलेल्या राजकीय उलथापालथीच्या घटना, स्थित्यंतरे त्यांचे संदर्भही महत्त्वाचे होते. भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे दिल्लीचे सदस्य, ‘पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाणारे भारतीय परराष्ट्र सेवेतील डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांचा विदेशातील राजदूत म्हणून प्रवास ‘जिप्सी’ या माहितीपटातून सगळ्या जगाने पाहिला. हा माहितीपट कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, दिल्ली आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि न्यूयॉर्कमधील इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवला गेला. आजही स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी यूटय़ूबवर जाऊन आवडीने पाहतात. त्याचाच पुढील भाग म्हणून आम्ही ‘टीसीएस’ आणि ‘सेफ सी’ यांच्या सहकार्याने ‘पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया’ हा माहितीपट पूर्ण केला- ज्याची निवड हाँगकाँग, भूतान, इस्तंबूल, मेलबर्न, ढाका, कोरिया, अंदमान निकोबार येथील चित्रपट महोत्सवात झाली. या फिल्मसाठी ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद यांनी निवेदन केले आहे.
हेही वाचा…आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : वास्तव नावाची जादू
सध्या तरुणाई विविध माध्यम प्रकारांचा वापर करताना दिसते. त्यात इंस्टाग्राम, फेसबूक, पिनट्रेस्ट, स्नॅपचॅट ही बहुचर्चित माध्यमे आहेत. परंतु ही माध्यमे तात्पुरत्या स्मरणशक्तीची आहेत. या माध्यमांवर होणारे व्हिडीओ किंवा त्यांचा दर्जा दीर्घकाळ प्रभाव ठेवणारा नसतो. परंतु हे सर्व करण्यासाठी ऊर्जाही लागतेच. ही ऊर्जा दीर्घकाळ टिकणारे सकस असे काही तरी करण्यासाठी लावल्यास त्याचा नक्कीच येणाऱ्या पिढ्यांना, अभ्यासकांना भविष्यात उपयोग होऊ शकतो. डॉक्युमेण्ट्री फिल्ममध्येही मूल्ये आहेत. त्यामुळे आज अनेक वेगवेगळे माहितीपट विविध ओटीटी व्यासपीठांवर उपलब्ध आहेत. विषयानुरूप त्याचा प्रेक्षक वर्ग नक्कीच वेगवेगळ्या गटातील आहे ही वस्तुस्थिती आहे. कुणाला ऐतिहासिक माहितीपट आवडतात तर कुणाला चरित्रपट मांडणारे, तर कुणाला विज्ञान समजावून सांगणारे. त्यामुळे माहितीपट माध्यम हे नामशेष होणार नाही, हे नक्कीच. कारण माहितीपट ही ‘फस्टहँड ’ माहिती मिळवण्याचे माध्यम आहे. आज बहुतांश देशांमध्ये होणाऱ्या चित्रपट महोत्सवांमध्ये ‘नॉन फीचर फिल्म’ हा विभाग असतोच.
आतापर्यंत मी अनेक वेगवेगळय़ा डॉक्युमेण्ट्रीज केल्या. त्यातील काहींचा वर उल्लेख झालेला आहे. त्याव्यतिरिक्त कचरा प्रश्नावर आधारित ‘बबल ऑफ डेव्हलपमेंट’ ही फिल्म बऱ्यापैकी नावाजली गेली. दिवंगत शास्त्रीय गायक ‘पंडित कमलाकर जोशी’ हा माहितीपट त्यांनी रचलेल्या अनवट रागांची माहिती, तसेच ४२ वर्षे त्यांनी औरंगाबाद आकाशवाणीवर केलेल्या कामाबद्दल माहिती देतो. हे माहितीपट एका छोटयाश्या हँडीकॅमवर शूट केले आहेत, ते यूटयूबवर पाहता येतील. अमेरिकेतील भारतीय उद्योजक तिथे स्थायिक होऊन भारतीय कला, योग, शास्त्रीय संगीत कसे टिकवतात, भारतीय रेस्टॉरंट चालवणारे आणि डॉक्टर्स यांचे तेथील अनुभव सांगणारा ‘ब्रेकिंग बॉण्ड्रीज’ हा माहितीपट न्यूयॉर्कमध्ये जाऊन पूर्ण केला.
हेही वाचा…मन:स्वास्थ्यासाठी..
येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील सर्व लोकभाषा चित्रित करायच्या आहेत. डॉक्युमेण्ट्री निर्मिती प्रक्रियेचा उपयोग किंवा अनुभव हा नक्कीच सिनेमातील विविध तंत्रे शिकण्यासाठी, संशोधनाची आवड जोपासण्यासाठी होतो. काही वेळा चित्रपट, लघुपट आणि माहितीपट या माध्यमांमध्ये चुकीच्या पद्धतीने तुलना करण्याचा प्रयत्न होताना दिसतो. परंतु या सगळया कला प्रकारातील फरक गांभीर्याने लक्षात घेतले पाहिजेत. आणि त्यांची निर्मिती मूल्ये आणि परिणाम वेगवेगळे आहेत हे समजून घेतले पाहिजे. असे केल्यास माहितीपट हा कलाप्रकार भविष्यात आणखी चांगल्या पद्धतीने रुजेल. त्याची सुरुवात झाली आहे. आज ‘नेटफ्लिक्स’, ‘अॅमेझॉन’ या प्रसिद्ध ओटीटी व्यासपीठांवर माहितीपटांचे नवनवीन विषय येताना दिसतात. आणि लोक ते आवडीने पाहत आहेत. फक्त भविष्यात माहितीपटांच्या विषयांमध्ये आणि मांडणीमध्ये साचलेपणा येऊ नये, हीच आशा!
वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेले धनंजय भावलेकर यांचे शिक्षण पुण्यात झाले. दीड-दोन दशके दृक्श्राव्य माध्यमात कार्यरत. बहुतांश डॉक्युमेण्ट्री आंतरराष्ट्रीय पातळीवर वाखाणल्या गेल्या. ‘समास’ माहितीपटाची निवड या महिन्यात होणाऱ्या चेन्नई आंतरराष्ट्रीय माहितीपट लघुपट महोत्सवात स्पर्धा विभागात झाली आहे.
dhananjaybhawalekar@gmail.com