|| कुलवंतसिंग कोहली

प्रत्येकाच्या मनात आठवणींचा एक पेटारा असतो. त्या पेटाऱ्यात वंशपरंपरागत चालत आलेल्या मखमली पठणींसारख्या आठवणी व्यवस्थित लावून ठेवलेल्या असतात. कधीतरी आपल्याला वाटतं, की पेटारा उघडावा आणि त्या मखमली आठवणींना उराशी घेऊन आंजारावं- गोंजारावं आणि पुन्हा मनातल्या तळघरात त्यांना दडवून ठेवावं. या लेखाची आखणी करत असतानाच टीव्हीवर अचानक बातमी दिसली- भूतपूर्व पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना एम्समध्ये दाखल केल्याची! आणि मनाचा पेटारा अलगद उघडला गेला आणि आठवणींची एक भरजरी पठणी त्यातून डोकावली. ज्ञानेश्वरांनी सांगितलेल्या अलांच्छित चंद्रम्याच्या शीतल प्रकाशाची त्यातून पखरण झाली.

मी अटलजींना भेटलोय. एकदा नव्हे, तीन-चार वेळा. आमची पहिली भेट झाली ती माजी केन्द्रीय मंत्री वेदप्रकाशजी गोयल यांच्यामुळे. वेदप्रकाशजी हे अटलजींच्या मंत्रिमंडळात होते. त्याहून महत्त्वाचं म्हणजे ते भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेपासून पक्षाचे खजिनदार होते. वेदप्रकाशजी हे एक अत्यंत साधे, नि:स्पृह, प्रामाणिक आणि सच्चे व्यक्तिमत्त्व होते. ते अतिशय कमी बोलत. त्यांना बोलण्यापेक्षा कृती करायला आवडे. त्यांचं अख्खं कुटुंब देशसेवेला वाहून घेतलेलं आहे. त्यांच्या पत्नी चंद्रकांताजी या तीन वेळा आमदार होत्या. तर पुत्र पियूष हा सध्या भारताचा कर्तबगार रेल्वेमंत्री आहे. (पियूषला मी एकेरीत संबोधतोय, याचं कारण त्याला मी त्याच्या बालपणापासून ओळखतोय व तो माझ्या धाकटय़ा मुलाचा वर्गमित्र आहे.) चंद्रकांताजीही अतिशय साध्या आणि कौटुंबिक नाती जपणाऱ्या आहेत. येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाचं आगतस्वागत करण्यात त्यांचा हात कोणी धरणार नाही. खूप साधं कुटुंब आहे हे. त्यांच्या वागण्यात कोणताही गर्व नाही की सत्तेचा दर्पही आढळत नाही. वेदप्रकाशजींची व माझी ओळख खूप जुनी आहे. याचं मुख्य कारण म्हणजे आम्ही एकमेकांच्या अगदी जवळ राहत असू. आमचं परस्परांकडे सारखं येणं-जाणं आहे. एकमेकांच्या सुख-दु:खात आम्ही सामील असतो. वेदप्रकाशजी माझ्यापेक्षा दहा वर्षांनी तरी मोठे असावेत. चंद्रकांताजी आणि माझी बीजी- आई या दोघी मत्रिणी होत्या. वेळात वेळ काढून दोघी मत्रिणी गप्पा मारत असत. आज बीजी नाही, पण त्या आशीर्वाद द्यायला आहेत. वेदप्रकाशजी मला नेहमी ‘बेटा’ म्हणत असत. माझी व प्रमोद महाजनांची भेट त्यांच्यामुळेच झाली. आणि प्रमोदजींमुळे मी त्यांच्या पक्षाच्या अनेक महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वांना भेटू शकलो.

वेदप्रकाशजींबरोबर घरोबा असल्याने त्यांच्याकडे कोणी महत्त्वाचे पाहुणे येणार असले की मला आमंत्रण असे. मला लोकांना भेटायची, त्यांना जाणून घ्यायची आवड असल्यानं मीही जात असे. वेदप्रकाशजी हे भाजपाचे खजिनदार असल्यानं देशभरातली नेते मंडळी त्यांना भेटायला येत. ऐंशीच्या दशकात केव्हातरी त्यांनी मला निरोप पाठवला की, ‘आमच्या घरी एक महत्त्वाची व्यक्ती येणार आहे. तू नक्की ये.’ कोण येणार, ते त्यांनी सांगितलं नाही. मी मोठय़ा उत्सुक मनानं दिलेल्या वेळेच्या आधीच त्यांच्याकडे गेलो. त्यांच्या घरात आनंदी वातावरण होतं. ज्याला ‘इलेक्ट्रिफाइंग’ म्हणतात तसं. थोडय़ा वेळानं आधी प्रमोदजी आले आणि पाठोपाठ अटलबिहारी वाजपेयी! इतकी र्वष मी त्यांना दूरवरून पाहत होतो. त्यांच्या प्रासादिक हिंदी भाषणांचा दूरचित्रवाणीवरून आस्वाद घेत होतो. भाषेवरील त्यांच्या अद्भुत प्रभुत्वामुळे अचंबित होऊन जात होतो. लाखो लोकांच्या मनावर गारुड करणारी त्यांची छबी पाहत होतो. ते अटलजी साक्षात् समोर उभे होते. मध्यम उंची. गोल चेहरा. चेहऱ्यावर स्मितहास्य. पांढरे होत चाललेले व्यवस्थित िवचरलेले केस, डोळ्यांत अपार मित्रता. अंगात स्वच्छ पांढरं धोतर. त्यावर खादीचा लांब हाताचा सदरा आणि त्यावर खादीचं बिनहातांचं एक जॅकेट. छोटी छोटी, पण गतिमान पावलं टाकत मोकळेपणानं हसत हसत अटलजी वेदप्रकाशजींच्या घरात शिरले. सगळं वातावरण भारून गेलं. हात जोडून नमस्कार करत, ‘‘वहिनीसाहेब, कशा आहात?’’ अशी पृच्छा करत त्यांनी उपस्थित प्रत्येकाची विचारणा केली. वेदप्रकाशजींनी माझा व त्यांचा परिचय करून दिला- ‘‘ये कुलवंतसिंग कोहली। मेरा बच्चा है।’’ अटलजींनी प्रेमानं हस्तांदोलन केलं व म्हणाले, ‘‘वेदप्रकाशजी आप को बेटा मानते है, यही अच्छी पहचान है।’’ अटलजी जेव्हा केव्हा मुंबईत येत तेव्हा वेदप्रकाशजींच्या घरी आवर्जून जात असत. त्यामुळे ते घर त्यांना जवळून परिचित होतं. गप्पाटप्पा, न्याहारी झाल्यावर त्यांनी मला विचारलं, ‘‘तुम्ही काय करता?’’ मी म्हणालो, ‘‘हॉटेलचा व्यवसाय करतो.’’ ‘‘बढिया। आप अन्नदाता हो।’’ हॉटेल व्यवसायाकडे या पद्धतीनं पाहण्याचा अटलजींचा दृष्टिकोन मला आवडला. वेदप्रकाशजी व प्रमोदजी एकदम म्हणाले, ‘‘यांच्या हॉटेलात एकदम चविष्ट जेवण मिळतं.’’ ‘‘भई, हमें कैसे पता चलेगा? आप तो हमें बुलाते ही नहीं हो!’’ मी गडबडीत म्हणालो, ‘‘सर, आपका ही हॉटेल है। कभी भी आईये। आप हमारे मेहमान नहीं, घर के ही हो।’’ वेदप्रकाशजी म्हणाले, ‘‘अटलजी पक्षाच्या कामानिमित्त इथं मुंबईत आहेत. त्यांना घेऊन मी येत्या आठवडय़ात येतो.’’ एवढा मोठा आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवलेला देशातला एक मोठा स्टेट्समन आपल्याकडे कशाला येईल, अशा विचारानं मी निवांत होतो. पण तीन दिवसांनी प्रमोदजी आणि वेदप्रकाशजींचा फोन आला की, ‘‘अटलजी आज तुमच्याकडे जेवायला येणार आहेत.’’ आमची एकदम गडबड उडाली. माझ्या पत्नीला, मुलांना खूप आनंद झाला. भारतातला एक महान नेता आपल्याकडे येतो आहे, या भावनेनं ते उत्तेजित झाले होते. दिलेल्या वेळेवर अटलजींना घेऊन वेदप्रकाशजी, प्रमोदजी, तेव्हाचे कार्यकत्रे (आताचे खासदार) किरीट सोमय्या आदी आले. आम्ही तोवर ‘प्रीतम’च्या तिसऱ्या मजल्यावर राहायला गेलो होतो. आमच्या घरातल्या दिवाणखान्यात जेवण झालं. आधी थोडय़ा गप्पा झाल्या. घरातल्या प्रत्येकाशी अटलजी प्रेमानं व आदरानं बोलले. प्रत्येकाची वैयक्तिक चौकशी केली. गप्पांमध्ये विचारलेल्या छोटय़ा छोटय़ा प्रश्नांनाही त्यांनी सविस्तर उत्तरं दिली. सगळं वातावरण अगदी मोकळं करून टाकलं. नंतर ते जेवणासाठी उठले. मी व मुलं त्यांना जेवण वाढण्यासाठी गडबडीनं धावलो. त्यांनी शांतपणे आम्हाला थांबवलं. मला म्हणाले, ‘‘कुलवंतजी, घरातल्यासारखं म्हणता ना, मग वाढता कशाला? मी घेईन स्वत:च. आपल्या हातानं जेवण वाढून घेण्याचा व हातानंच ते जेवण्याचा आनंद मोठा असतो. अन्नाचा स्पर्श म्हणजे अन्न बनवणाऱ्या हातांचा स्पर्श! त्याचा आदर केलाच पाहिजे ना!’’ अटलजींनी स्वत: जेवण वाढून घेतलं व त्याचा मन:पूर्वक आस्वाद घेतला. जेवण झाल्यावर कविमनाचे अटलजी म्हणाले, ‘‘अन्नदाता सुखी भव!’’ बीजी गहिवरून गेली. अटलजींनी सर्वाची मनं जिंकून घेतली होती. महान व्यक्तींच्या साध्या साध्या गोष्टीही ते महान का आहेत, हे सांगून जातात.

अटलजी आणि माझी आजवर तीन-चारदाच भेट झाली असेल; पण या प्रत्येक भेटीत एक अत्यंत सुसंस्कृत कविमन भेटत गेलं. ९३-९४ च्या सुमारास मुंबईत पक्षाच्या एका चिंतन शिबिरासाठी म्हणून अटलजी, अडवाणीजी आदी देशभरातले नेते मुंबईत आले होते. प्रमोदजींनी मला फोन केला, की ते प्रीतममध्ये एक पत्रकार परिषद घेऊ इच्छितात व त्यानंतर जेवण असेल. प्रमोदजींची इच्छा म्हणजे मला आज्ञाच! मी सर्व जय्यत तयारी केली. त्या दिवशी अडवाणीजीही आले होते. लालकृष्ण अडवाणीजी म्हणजे एक कणखर व्यक्तिमत्त्व. त्यांचा एक ‘ऑरा’ आहे. मुळात ते कराचीचे असल्यानं व फाळणीच्या झळा त्यांनी भोगलेल्या असल्यानं माझ्या मनात त्यांच्याविषयी एक वेगळं प्रेम आहे. अटलजींनी पत्रकार परिषद झाल्यावर जेवणाच्या वेळी मला बोलावलं. माझी वास्तपुस्त केली. मला आश्चर्य वाटलं. काही वर्षांपूर्वी एकदाच भेटलेल्या माझ्यासारख्या एका सामान्य माणसाला त्यांनी लक्षात कसं ठेवलं? अटलजींनी जेवण झाल्यावर जेवणाची स्तुती केली. विचारलं, ‘‘किती हॉटेल्स आहेत तुमची?’’ प्रमोदजींनीच उत्तर दिलं, ‘‘एकच आहे.’’ ‘‘अरेच्चा! असं कसं? इतकं चांगलं जेवण देता.. मग आणखी हॉटेलं काढायला हवीत तुम्ही.’’ प्रमोदजींनी माझ्याकडे मिश्कीलपणे पाहिलं व म्हणाले, ‘‘बघा कुलवंतजी, मी तुम्हाला सांगत होतो ना! आता अटलजींनी सांगितलेली गोष्ट मनावर घ्या.’’ मी कसनुसा हसलो. एवढा मोठा माणूस इतकी साधी चौकशी करत होता! पुढे माझ्या नातवंडांनी ती गोष्ट मनावर घेतली.

पुढे मी मुंबईचा शेरीफ झालो. मुंबईत येणाऱ्या प्रत्येक मान्यवर पाहुण्याचं मुंबई शहराच्या वतीनं स्वागत करण्याची जबाबदारी माझ्यावर आली. या काळात अटलजी पंतप्रधान होते. एकदा ते मुंबई दौऱ्यावर आले होते. विमानतळावर मी त्यांचं स्वागत करायला गेलो होतो. राज्यपाल महोदयांनी स्वागत केल्यावर मीही त्यांचं स्वागत केलं. मला बघून आश्चर्यचकित होऊन त्यांनी विचारलं, ‘‘कुलवंतजी, तुम्ही इथं कसे?’’ दोनदाच भेटलेल्या व्यक्तीचं नाव घेऊन त्याला हाक मारणाऱ्या अटलजींना मी म्हणालो, ‘‘सर, मुझे आपने ही तो शेरीफ बना दिया है!’’ भारताच्या पंतप्रधानांनी माझ्याकडून होणारं स्वागत स्वीकारलं. हस्तांदोलन केलं. वर पाठीवर छोटीशी थापही दिली. किती मुलायम व आश्वासक हात होते त्यांचे. माणसाचा स्पर्श त्याचं मन अभिव्यक्त करतो. त्या संध्याकाळी राज्यपाल महोदयांनी पंतप्रधानांच्या सन्मानार्थ स्नेहभोजन ठेवलं होतं. मलाही त्याचं निमंत्रण होतं. मी पत्नीसह त्याला गेलो. माझ्या पत्नीला नमस्कार करून पंतप्रधानांनी तिची आस्थेनं चौकशी केली. माझा हात धरून त्यांनी मला शेजारी बसवून घेतलं व म्हणाले, ‘‘कुलवंतजी, तुम्ही शहराचे प्रथम नागरिक आहात. हे शेरीफ पद शोभेचं असतं अशी अनेकांची समजूत असते. पण पदाला शोभेचं बनवायचं की नवनवे उपक्रम राबवून त्याची प्रतिष्ठा वाढवायची, हे त्या- त्या व्यक्तीवर अवलंबून असतं. तुम्ही काय करता आहात?’’ मी उत्तरलो, ‘‘सर, मुंबईसमोर अनेक प्रश्न आहेत. पण त्यातील प्रदूषणाचा प्रश्न मला महत्त्वाचा वाटतोय. ‘हरित मुंबई, स्वच्छ मुंबई’-बरोबरच प्रदूषणमुक्त मुंबई असणं गरजेचं आहे. या दृष्टिकोनातून आम्ही मुंबईत वाहनचालकांचे मेळावे घेऊन त्याबद्दल जागृती करत आहोत. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीना मी विनंती केली आहे की शहरातल्या ट्रक- चालकांचा प्रदूषणासंदर्भात एक मेळावा आम्ही घेत आहोत, त्यात मार्गदर्शन करायला तुम्ही या. त्यांनी ती विनंती मान्य केली आहे.’’ पंतप्रधानांनी स्मितहास्य केलं व म्हणाले, ‘‘अगदी उत्तम उपक्रम आहे. प्रदूषण हा माझ्याही अजेंडय़ावरील महत्त्वाचा विषय आहे. माझ्या तुम्हाला शुभेच्छा!’’

अटलजींच्या पंतप्रधानपदाच्या तिसऱ्या टप्प्यात मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली होती. पंतप्रधानांनी सर्वाना सक्त सूचना दिली होती, की कोणीही भेटायला येऊ नये. प्रमोद महाजनांशिवाय ते कोणालाही भेटत नसत. प्रमोदजी हे त्यांचे मानसपुत्र होते. ते अटलजींची पूर्ण काळजी घेत असत. प्रमोदजी माझे मित्र. मी त्यांना विनंती केली, की मला पंतप्रधानांना भेटायचं आहे. प्रमोदजींनी उत्तर दिलं, ‘‘नाही भेटता येणार. तशी त्यांची सूचनाच आहे. तुम्ही बाहेर येऊन बसा. तुम्ही आल्याची नोंद होईल.’’ मी ‘ठीक आहे’ म्हणत प्रमोदजींचं म्हणणं ऐकलं. दोन दिवस बाहेर कॉरिडॉरमध्ये येऊन बसलो. प्रमोदजींकडे त्यांची चौकशी केली. चार दिवसांनी दुपारच्या सुमारास प्रमोदजींचा फोन आला- ‘‘संध्याकाळी सहा ते सात लोकांना पंतप्रधानांना भेटायची परवानगी मिळाली आहे. पण तुम्ही पाच वाजता या.’’ मी बरोबर पाचच्या ठोक्याला ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. प्रमोदजी मला पंतप्रधानांच्या खोलीत घेऊन गेले. पंतप्रधानांनी मला पाहिलं. त्यांचं प्रसिद्ध स्मितहास्य केलं. मी त्यांच्या प्रकृतीची चौकशी करायला गेलेलो.. तर माझा हात धरून त्यांनी माझीच चौकशी केली. ‘लवकर बरे व्हा!’ अशा शुभेच्छा देऊन मी तिथून निघालो. ती त्यांच्याबरोबर झालेली माझी शेवटची भेट! पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी नंतर सक्रीय राजकारणातून निवृत्ती स्वीकारली. आमच्यातील दुवा असणारे वेदप्रकाशजी व माझे मित्र प्रमोदजी दोघेही हे जग सोडून गेले. अटलजींना भेटायची संधी नंतर मिळाली नाही. देव कोणालाही एकदाच भेटतो असं म्हणतात. पण मला हे देवरूप तीन-चारदा भेटलं. हेही नसे थोडके!

ksk@pritamhotels.com

शब्दांकन : नीतिन आरेकर