नरेंद्रभाऊ (सॉरी भाई) मोदी उद्या पंतप्रधान झाले किंवा न झाले तरी जगभरातला गुजराती समुदाय अत्यंत सुखावला आहे. जिथे-जिथे मोदींची पावले पडतात तिथे तिथे गुजराती माणसाची छाती ५६ इंच मोठी होते. देशभरात गुजराती माणसाचे वर्चस्व असलेल्या सर्वच संस्थांना सुगीचे दिवस आले आहे. अनेक संस्थांनी तर पुढच्या पाच वर्षांत विस्ताराची योजनाच आखली. दिल्लीत सरदार पटेल यांच्या नावाने चालणाऱ्या शाळेने विस्तारासाठी पुढच्या पाच वर्षांची ब्ल्यू प्रिंट तयार केली आहे. बरं दिल्लीत मोदींची सभा असली की, किमान हजारेक गुजराती परिवार तिथे जाणारच. पटेल यांचे नाव पटेल, गुजराती माणसाला? अहो, हे काय विचारणं झालं? मोदींची पंतप्रधानपदाची उमेदवारी घोषित होण्यापूर्वीच दिल्लीतील गुजराती समुदायाचे वर्चस्व असलेल्या संस्थांनी त्यांना पाठिंबा दिला. तेव्हापासून नरेंद्रभाई मोदींचा त्यांच्याशी थेट संपर्क असतो. गुजराती माणसाला पंतप्रधान करण्यासाठी गुजराती माणूस कामाला लागला आहे. अहो, पटेल यांच्या नावाने चालणाऱ्या त्या शाळेने नवीन जागा घेतली आहे. विकासकाशी बोलणे झाले आहे. मुहूर्त जून महिन्यातला आहे. बहुधा मोदींचा पहिलाच कार्यक्रम असेल जूनमधला. आत्ता काल-परवा मोदी शास्त्री पार्कमधल्या सभेसाठी आले होते. तिथे गुज्जू लोकांची शिरगणती झाली. पंडय़ा, जोशी, पाठक अशी आडनावानुसार विभागणी करण्यात आली. सौ. पंडय़ा, सौ. जोशी, सौ. पाठक आल्या आहेत की नाही, हेही पाहिले गेले. आता ही सर्व माहिती एकत्रित संकलित केली जात आहे.         
    -चाटवाला