लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर जागा वाटबाबत भाजपमधील अंतर्गत वाद त्यांनी आपसात चर्चा करून सोडविणे आवश्यक आहे, असा सल्ला योगगुरू रामदेव बाबा यांनी दिला. आम आदमी पक्षाच्या अरविंद केजरीवाल यांच्यावर त्यांनी टीका केली. ते ‘केजरीबवाल’ आहेत. ते काँग्रेसचे हस्तक असून मोदी यांच्यावर आरोप करीत असल्याचे स्वामी रामदेव म्हणाले.
 देशभरात आयोजित करण्यात आलेल्या योग सप्ताहाच्या निमित्ताने जनजागृती करण्यासाठी स्वामी रामदेवबाबा नागपुरात आले असता पत्रकारांशी बोलत होते. या देशाला परिवर्तनाची गरज असून त्यासाठी नरेंद्र मोदी हा एकच पर्याय देशासमोर आहे. त्यामुळे काही मुद्यांवर समर्थन देऊन राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या प्रचारार्थ मैदानात उतरणार आहे. देश आज माफियांच्या हातात आहे. भ्रष्टाचार, दहशतवाद वाढला असून एकाच परिवाराच्या हाती देशाची सत्ता आहे. त्यामुळे परिवर्तनाशिवाय आज पर्याय नाही. देशात अनुभवी आणि स्थिर सरकार नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मिळू शकेल, असा विश्वास रामदेव बाबा यांनी व्यक्त केला.
विदेशातील काळा पैसा ही राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित करावी, अशी मागणी करून काही मुद्दे राष्ट्रीय लोकशाही आघाडीसमोर ठेवून शपथपत्र तयार केले आहे. ते शपथपत्र राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या प्रत्येक नेत्यांकडून भरून घेणार आहे. भाजपवर कधीच नाराजी नव्हती. मात्र, काही मुद्यांना विरोध होता. भ्रष्टाचारी नेत्यांना उमेदवारी देऊ नये, असा आमचा आग्रह आहे आणि भाजपने तसा प्रयत्न केला तर त्याला आमचा विरोध राहील. भाजपमध्ये उमेदवारी वाटपावरून अंतर्गत कलह असतील तर त्यांनी ते समोर आणू नये. काँग्रेस हा पक्ष एका व्यक्तीचा पक्ष आहे. तसा भाजप नाही. कुठलेही निर्णय घेताना भाजपमध्ये सामूहिकरित्या ते घेतले जातात. मात्र, काँग्रेसमध्ये सोनिया गांधी यांच्या सांगण्यानुसार निर्णय घेतले जातात, अशीही टीका त्यांनी केली.
अरविंद केजरीवालांबाबत ते म्हणाले, व्यवस्था परिवर्तनासाठी आणि भ्रष्टाचारमुक्त देशासाठी केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाची स्थापना केली. मात्र, सध्या ते काँग्रेसचे ‘एजंट’ म्हणून ते काम करीत आहेत. गेल्या वर्षभरात ते काँग्रेसच्या नेत्यांवर किंवा सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यावर टीका किंवा आरोप करीत नाही. त्यांच्यासमोर केवळ नरेंद्र मोदी हे एकच लक्ष्य आहे. ज्या ठिकाणी जातील तेथे मोदींवर टीका करीत असतात. आता तर प्रसार माध्यमावर टीका करीत आहेत. त्यामुळे केजरीवाल हे ‘केजरीबवाल’ झाले आहेत.
नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसीमधून केजरीवाल निवडणूक लढत असतील, तर त्यांनी निवडणुकीत हरलो तर राजकारणातून संन्यास घेईल, असे जाहीर करावे. मोदी यांच्याविरोधात निवडणूक लढणे म्हणजे केवळ प्रसिद्धीसाठी आहे. ‘विनाशकाले विपरित बुद्धी’ असे सांगून केजरीवाल यांच्यावर रामदेवबाबा यांनी चांगलेच तोंडसुख घेतले. स्वामी रामदेव बाबा यांनी नितीन गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली.
“राहुल गांधी हे गोंधळलेले नेते आहेत. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या ५० ते ६०, तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या २८० ते ३०० जागा येतील.”
रामदेवबाबा