ठाण्यातील सेंन्ट्रल मैदानावरील जाहीर सभेत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गेली तीन दशके ठाण्यात सत्ताधीश असलेल्या शिवसेनेच्या कारभाराविषयी धारण केलेल्या मौनामुळे येथील मनसैनिक कोडय़ात पडले असून एरवी स्थानिक मुद्दयांचा आधार घेत विरोधी पक्षांची त्रेधातिरपीट उडविणाऱ्या साहेबांच्या या मौनामागील नेमके ‘राज’ काय, अशी चर्चा येथील राजकीय वर्तुळात सुरू आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत याच सेन्ट्रल मैदानावर घेतलेल्या जाहीर सभेत राज यांनी शिवसेना उमेदवाराच्या गुन्हेगारी पाश्र्वभूमीचे वाभाडे काढल्याने राष्ट्रवादीच्या विजयाचा मार्ग सोपा झाला होता. राज यांच्या तडाखेबंद भाषणामुळे ठाणे, कोपरी-पाचपाखाडी आणि ओवळा-माजीवडा या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातून मनसेला सुमारे ९९ हजार मते मिळाली होती. त्यामुळे गुरुवारी ठाण्यातील सभेत राज नेमके काय बोलणार, याविषयी कमालिची उत्सुकता होती. प्रत्यक्षात ठाण्यातील तलावांच्या दुर्दशेचा पुसटसा उल्लेख वगळता राज यांनी शिवसेनेविषयी मवाळ भूमिका घेतल्याने मनसैनिक अचंबित झाले आहेत.
ठाणे महापालिकेत शिवसेनेची गेली तीन दशके सत्ता असून हा परिसर या पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. या काळात ठाणे शहराच्या नियोजनाचे अक्षरश तीनतेरा वाजल्याचे चित्र असून बेकायदा बांधकामांमुळे या शहराचा उकीरडा झाला आहे. ठाणे रेल्वे स्थानकात दररोज सहा लाख प्रवाशांची ये-जा असल्यामुळे ठाणेकर प्रवाशांचे होणारे हाल, येथील वाहतूक व्यवस्थेचा उडालेला बोजवारा, आदी गोष्टींमुळ सर्वसामान्य ठाणेकरांच्या मनात नाराजीची भावना असताना राज ठाकरे सेंट्रल मैदानावरील सभेत या भावनांना वाट करून देतील, अशी ठाणेकरांची अपेक्षा होती.