गुजरात दंगलीत अहमदाबाद येथे काँग्रेसच्या माजी खासदारासह मुस्लीम समुदायातील २० लोकांना जाळून मारण्यात आले, पण राज्याचा प्रमुख म्हणून मोदींनी त्यांच्या कुटुंबीयांची भेटही घेतली नाही. त्यामुळे मोदी पंतप्रधान झाल्यास राष्ट्रीय एकात्मतेलाच सुरुंग लागेल, अशा शब्दांत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींवर टीका केली. गेल्या काही दिवसांपासून पवार यांनी सातत्याने गुजरात दंगलीच्या मुद्दय़ावरून मोदींना टीकेचे लक्ष्य केले आहे. राज्यातील दुष्काळी भागातील छावण्यांमधील जनावरांना मोफत खाद्यपुरवठा करणाऱ्या गुजरातेतील काही संस्थांच्या मागे मोदींनी चौकशीचा ससेमिरा लावल्याचा आरोपही पवारांनी या वेळी केला.
बीड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश धस यांच्या प्रचाराचा प्रारंभ शनिवारी गेवराई येथे पवार यांच्या उपस्थितीत झाला. पवार यांनी गारपीट व दुष्काळात राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. सरकारने गारपीटग्रस्तांसाठी तीन हजार कोटींचे पॅकेज दिले. नुकसानीचे निकष बदलून सरकारने द्राक्षबागांसाठी ५० हजार, तर डाळिंब व संत्र्यासाठी ३५ हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. हे अस्मानी संकट आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्येचा विचार करू नये, असे आवाहन केले. मोदी यांच्यावर टीका करताना पवार म्हणाले की, मागील वर्षी महाराष्ट्रातील दुष्काळी भागात सरकारने छावण्या सुरू करून जनावरे वाचवली, त्या वेळी गुजरातेतील काही शेतकरी व सहकारी संस्थांनी दुष्काळी भागात जनावरांसाठी पशुखाद्य तयार करून मोफत देण्याचा निर्णय घेतला. आपणास भेटून या संस्थांनी राज्यातील छावण्यांमध्ये पशुखाद्य पाठवले. मात्र मुख्यमंत्री मोदी यांनी सत्तेचा वापर करीत ज्या संस्थांनी महाराष्ट्रात मोफत पशुखाद्य पाठवले, त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लावला. अहमदाबादेत काँग्रेसचे माजी खासदार व मुस्लीम समाजाच्या २० लोकांना जिवंत जाळले गेले. या घटनेच्या चौकशीची मागणी झाली. चौकशीतून सत्य बाहेर येईल. मात्र राज्याचा प्रमुख म्हणून मोदी यांची जबाबदारी होती. दु:खितांची भेट घेऊन अश्रू पुसणे मात्र केले नाही. त्यामुळे सत्तेचा धार्मिक कारणासाठी उपयोग करून अन्यायग्रस्त समाजाच्या हिताची जपणूक केली गेली नाही. मोदी पंतप्रधान झाल्यास देशाच्या एकात्मतेला सुरुंग लागेल, असा हल्ला करून जनता असे कदापि होऊ देणार नाही, असा दावा पवार यांनी केला.
लोकांची वाट पाहत पवारांची दोन तास प्रतीक्षा!
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ करण्यासाठी निश्चित केलेल्या वेळेनुसार केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे गेवराईत आगमन झाले. मात्र, सभास्थळी कोणीच नसल्यामुळे तब्बल दोन तास पवारांना आमदार बदामराव पंडित यांच्या घरी थांबावे लागले! नियोजित सभा सकाळी दहाची होती. त्यानुसार पवार हेलिक ॉप्टरने वेळेवर पोहोचले; पण सभास्थळी कोणीच नसल्याचे पाहून लोकांच्या उपस्थितीच्या प्रतीक्षेत पवार यांना दोन तास थांबावे लागले. दुपारी बारा वाजता सभास्थळी पवारांचे आगमन झाले, त्यावेळीही फारशी गर्दी नव्हतीच!