“करोनाचे संकट शिखरावर असताना मुंबई आणि परिसरात लोक विनाकारण फिरताना आणि वाहने बाहेर काढून रस्त्यावर गर्दी करताना दिसत आहेत. हे अजिबात अपेक्षित नाही. यामुळे करोनाची साथ जी आपण आटोक्यात ठेवली आहे, ती मोठ्या प्रमाणावर वाढून आपल्यासमोर आव्हान उभे राहील,” असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनाकारण वाहने घेऊन फिरणाऱ्यांबद्दल नाराजी व्यक्त केली. “पोलिसांनी २ किमी अंतराचे निर्बंध टाकले, त्यामागे मुक्त आणि अनावश्यक वावराला रोखणे हाच उद्देश आहे,” असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
आणखी वाचा- मोठी बातमी: संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाउन कायम, ३१ जुलैपर्यंत निर्बंध लागू
पावसाळा, करोना तसेच मुंबईसंदर्भातील इतर नागरी समस्यांवर व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलत होते. या बैठकीला खासदार अनिल देसाई, परिवहन मंत्री अनिल परब, आमदार सुनील प्रभू यांनीही बैठकीत सहभाग घेऊन सूचना केल्या. बैठकीस मुख्य सचिव अजोय मेहता, एमएमआरडीए आयुक्त आर राजीव, बृहन्मुंबई पालिकेचे अधिकारी देखील उपस्थित होते.
आणखी वाचा- महाराष्ट्रात ३१ जुलैपर्यंत लॉकडाउन : या नियमांचं करावं लागणार पालन
“आपण अनलॉकमधील नियमांनुसार कार्यालयांमध्ये जात असाल, दवाखाने किंवा इतर आवश्यक कारणांसाठी जाणे गरजेचे असेल, तर तुम्हाला कुणी अडवणार नाही. पण कोणतेही कारण नसताना फिरायला गेल्यासारखे बाहेर पडत असाल. वाहनांची गर्दी होणार असेल, तर तुम्ही स्वत:चा आणि इतरांचाही धोका वाढवीत आहात, हे लक्षात ठेवा. तुमच्या घराच्या आसपासच्या भागामध्ये किराणा, अन्न धान्य, जीवनावश्यक वस्तू, औषधी, भाजीपाला हे सर्व काही मिळू शकते, अशी परिस्थिती आज मुंबईत आहे. तुम्हाला सकाळी, संध्याकाळी उद्याने , मैदाने यांमध्ये जायचे आहे, तर नजीकच्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. आता तर आपण अनेक व्यवहार खुले केले आहेत. त्यामुळे नागरिक म्हणून जबाबदारीने वागणे पण गरजेचे आहे,” असं आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं.