‘निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या रायगड जिल्ह्यासाठी १०० कोटी रुपयांची मदत तोकडी ठरेल’ असे मत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. “या चक्रीवादळाचा फटका बसलेल्या नागरिकांना राज्य सरकारने मोठी मदत करावी. तातडीने रोख रक्कम नागरिकांना मिळाली पाहिजे” अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.
“राज्यात भाजपाचे सरकार असताना अशा आपत्तीच्या प्रसंगात कसे निर्णय़ घेण्यात आले. नागरिकांना कशी जास्तीत जास्त मदत उपलब्ध करुन दिली” त्याची उदहारणे त्यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रायगड जिल्ह्याचा दौरा केला. त्यावेळी त्यांनी १०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती.
आणखी वाचा- Cyclone Nisarga: रायगडसाठी उद्धव ठाकरेंकडून १०० कोटींची मदत जाहीर
देवेंद्र फडणवीस यांनी मोदी सरकारच्या वर्षपुर्तीवर बोलताना सरकारने घेतलेल्या चांगल्या निर्णयांचे कौतुक केले. “मोदी सरकारने कठोर निर्णय घेतले. जे निर्णय आपण पाहू शकणार नाही असे अनेकांना वाटत होते, ते निर्णय मोदी सरकारने घेतले. यात कलम ३७० रद्द करणे हा महत्वाचा निर्णय होता” असे ते म्हणाले. “३७० रद्द झाल्यानंतर रक्ताचे पाट वाहतील असे बोलले जायचे. पण असे काही घडले नाही उलट काश्मीरच्या विकासाची प्रकिया सुरु झाली” असे त्यांनी सांगितले. सुधारित नागरिकत्व कायदा, राम मंदिर हे केंद्र सरकारचे चांगले निर्णय असल्याचे ते म्हणाले.
