सावंतवाडी: अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे ३३ वे राष्ट्रीय अधिवेशन १६ व १७ जानेवारी रोजी कणकवली महाविद्यालयाच्या एचपीसीएल सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. तळ कोकणात होणारे हे परिषदेचे पहिलेच राष्ट्रीय अधिवेशन असून यामध्ये अखिल भारतातून सुमारे ३५० अभ्यासक आणि प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेच्या अध्यक्षा डॉ. अरुणा मोरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कणकवली महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य युवराज महालिंगे हे परिषदेचे मुख्य आयोजक आहेत, तर इतिहास विभाग प्रमुख डॉ. सोमनाथ कदम हे स्थानिक संयोजक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.
डॉ. अरुणा मोरे यांनी सांगितले की, या राष्ट्रीय अधिवेशनात प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक अशा तीन सत्रांमध्ये शोधनिबंध सादर केले जातील. इतिहास परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे वितरणही यावेळी होणार आहे. ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, प्रसिद्ध अभ्यासक डॉ. अशोक राणा (यवतमाळ) आणि इतिहास संशोधक डॉ. जी.डी. खानदेशे यांना प्रसिद्ध इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार व अन्य मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे दुबई येथूनही प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
आंतरविद्याशाखीय संशोधनाला चालना
प्रा. डॉ. सोमनाथ कदम यांनी माहिती दिली की, हे राष्ट्रीय अधिवेशन इतिहास विषयाबरोबरच आंतरविद्याशाखीय संशोधनाला चालना देणारे असेल. नवीन शैक्षणिक धोरणानुसार सर्व विद्या शाखांना एकत्र जोडले गेले असल्याने कला, वाणिज्य, विज्ञान व तंत्रज्ञान अशा सर्व विद्याशाखेतील महत्त्वपूर्ण आंतरविद्याशाखीय शोधनिबंध सादरीकरणाची संधी अभ्यासक व प्राध्यापकांना देण्यात येणार आहे. तसेच कोकणातील कातळ शिल्प, किल्ले याविषयी स्वतंत्र व्याख्यानांचे सत्र आयोजित केले जाईल. अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या एकूण १४ समित्या कार्यरत आहेत. सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपले शोधनिबंध ३० नोव्हेंबर, २०२५ पर्यंत पाठवायचे आहेत.
ग्रंथ प्रकाशन आणि सिंधुदुर्गच्या वारसा स्थळांवर सत्र:
या निमित्ताने अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे वार्षिक मासिकांचे तीन खंड, आंतरविद्याशाखीय शोधनिबंधाचा स्वतंत्र खंड आणि ‘कनक’ ही स्मरणिका प्रकाशित केली जाणार आहे. सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग या दोन किल्ल्यांचा जागतिक युनेस्कोने जाहीर केलेल्या जागतिक वारसा संरक्षण स्थळ यादीत समावेश झाल्याबाबतची माहिती देणारे एक सत्रही आयोजित केले जाईल.
राष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने अखिल भारतीय स्तरावरील ग्रंथ प्रदर्शन, शस्त्र प्रदर्शन, ऐतिहासिक स्मारके चित्र प्रदर्शन, छायाचित्रे प्रदर्शन, मोडी लिपी प्रदर्शन, विजयदुर्ग आणि मालवण या किल्ल्यांच्या प्रतिकृतीचे प्रदर्शन अशा वेगवेगळ्या प्रदर्शनांचे आयोजन करण्यात येणार असून विविध स्पर्धाही घेतल्या जाणार आहेत, अशी माहिती डॉ. सोमनाथ कदम यांनी दिली.
शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव विजयकुमार वळंजू यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याची महती सांगितली आणि विचारवंत, साहित्यिक व कलावंतांच्या या भूमीत आंतरविद्याशाखीय अभ्यासकांना भौगोलिक, अध्यात्मिक, ऐतिहासिक पर्यटन व संशोधनाची नवी पर्वणी मिळणार असल्याचे सांगितले. त्यांनी इतिहासप्रेमींनी याचा लाभ घ्यावा आणि जिल्ह्याची महती सर्वदूर पोहचवावी, असे आवाहन केले.
कणकवली महाविद्यालयातील सामाजिक विज्ञान मंडळ आणि अंतर्गत गुणवत्ता व हमी कक्षाच्या संयुक्त विद्यमाने हे अधिवेशन घेण्यात येत असून, प्रभारी प्राचार्य युवराज महालिंगे यांनी इतिहास प्रेमींनी या अधिवेशनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. पत्रकार परिषदेला अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे सचिव प्राचार्य डॉ. सोपानराव जावळे, कार्यकारी मंडळ सदस्य डॉ. नारायण गवळी, डॉ. शोभा वाईकर, शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव विजयकुमार वळंजू, प्राचार्य युवराज महालिंगे, डॉ. सोमनाथ कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी आभार मानले.