अलिबाग : रायगड जिल्ह्यात नऊ महिन्यात बालविवाह प्रतिबंधक कायद्या अंतर्गत २१ गुन्हे दाखल केल्याचे वृत्त लोकसत्ताने ७ ऑक्टोबरच्या अंकात प्रसिध्द केले होते. दीड वर्षात ३४८ अल्पवयीन मुलींवर मातृत्वाचा भार आल्याची गंभीर बाब या वृत्ताच्या माध्यमातून समोर आणली होती. दरम्यान या वृत्ताची गंभीर दखल राज्याच्या महिला व बाल विकास आदिती तटकरे यांनी घेतली आहे. रायगड जिल्ह्यासह राज्यभरात बालविवाह रोखण्यासाठी विशेष प्रबोधन अभियान राबविण्याची घोषणा त्यांनी केली आहे.
११ ऑक्टोबर २०२५ (आंतरराष्ट्रीय कन्या दिन) ते २६ जानेवारी २०२६ (प्रजासत्ताक दिन) या कालावधीत “बालविवाहमुक्त महाराष्ट्रासाठी १०० दिवस” हे अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाचा मंगळवारी आदिती तटकरे यांनी घेतला. संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. जिल्हा परिषद आणि माध्यमिक शाळांमधील मुलींच्या शाळा सोडण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी, लैंगिक शिक्षणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी विभागीय पातळीवरही विशेष उपक्रम राबवण्याचे यावेळी निर्देश दिले.
मराठवाड्यातील ऊसतोड कामगारांच्या कुटुंबांना प्रत्यक्ष भेट देऊन बालविवाह प्रतिबंध आणि आरोग्य विषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर विशेष उपाययोजना राबवाव्यात. त्याच बरोबर रायगड जिल्ह्यातील अलिबाग, कर्जत, पेण, सुधागड, मुरुड, रोहा, पनवेल, खालापूर आणि माणगाव या तालुक्यांमध्ये सर्व उपाययोजना प्राधान्याने राबवाव्यात. तसेच, आदिशक्ती अभियान अंतर्गत कार्यरत ग्राम, तालुका, विभाग आणि राज्यस्तर समित्यांचाही या जनजागृती मोहिमेत सहभाग असावा अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यावेळी विभागाच्या आयुक्त नयना गुंडे, रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक आंचल दलाल, रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, उपसचिव आनंद भोंडवे, अवर सचिव प्रसाद कुलकर्णी, सहआयुक्त राहुल मोरे, रायगडचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीकांत हावळे, सुजाता सकपाळ यांच्यासह दूरदृश्य प्रणालीद्वारे सर्व विभागीय उपायुक्त व संबंधित अधिकारी उपस्थित होते.