सातारा जिल्ह्य़ात बुधवारी नव्या सहा जणांना करोना झाल्याचे स्पष्ट झाल्याने जिल्ह्य़ातील रुग्णसंख्या ४१ झाली आहे. नव्या रुग्णांमध्ये कराड तालुक्यातील ५, तर फलटण तालुक्यातील एक जण आहे.

सातारा जिल्ह्य़ातील एकूण ४१ रुग्णांपैकी एकटय़ा कराड तालुक्यातील ३३ रुग्ण आहेत. कराड येथील ४९ जणांचे करोना चाचणी अहवाल प्राप्त झाले असून पैकी ५ जणांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. तर उर्वरित जिल्ह्य़ात फलटण तालुक्यातील एकाचा चाचणी अहवाल देखील सकारात्मक आला आहे. दरम्यान, जिल्ह्य़ात विलगीकरण कक्षात नव्याने १६७ जणांना दाखल केले आहे. या सर्वांच्या घशातील स्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचित्सिक डॉ. अमोल गडीकर यांनी दिली आहे.

कराड तालुक्यातील वनवासमाची आणि आगाशिवनगर येथील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मंगळवारी आणखी पाच रुग्णांना करोनाची लागण झाल्याचे आरोग्य विभागाच्या तपासणी अहवालातून समोर आले आहे.

सोलापुरात अलगीकरण कक्षातील महिलेचा मृत्यू

शहरातील तेलंगी पाच्छा पेठेत करोनाबाधित नातेवाईकाच्या संपर्कात आलेल्या एका महिलेचा मंगळवारी अलगीकरण कक्षात अचानक बेशुद्ध पडून मृत्यू झाला.  तेलंगी पाच्छा पेठेत एका छोटय़ा रुग्णालयात नोकरीस असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याला करोनाची बाधा झाली होती. तिच्या संपर्कात आलेल्या अन्य १८ व्यक्तींनाही करोनाबाधा झाली आहे. तर संपर्कात आलेल्या अन्य व्यक्तींची छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून त्यांची रवानगी केगाव येथील अलगीकरण कक्षात झाली होती. त्यापैकीच अलगीकरण कक्षात असलेल्या एका ३९ वर्षांची महिला पहाटे अचानक बेशुद्ध पडली. तिला तत्काळ सर्वोपचार रूग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले.