सातारा: उत्तराखंडमध्ये झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे आणि महापुरामुळे रस्ते वाहून गेले आहेत. या घटनेमुळे महाराष्ट्रातील मोठ्या संख्येने पर्यटक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. यामध्ये महाबळेश्वर तालुक्यातील झांजवड येथील संभाजी जाधव यांच्या कुटुंबातील सहा जणांचा समावेश आहे. या पर्यटकांच्या सुटकेसाठी सातारा जिल्हा प्रशासनाने व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तराखंडमधील प्रशासनाशी संपर्क साधला आहे. दरम्यान, बरकोट या जिल्ह्याच्या ठिकाणी आम्ही सुरक्षित आहोत, असे यातील आपत्तीग्रस्त पर्यटक आकाश जाधव यांनी सांगितले.
उत्तराखंड राज्यातील चारधाम यात्रेसाठी महाराष्ट्रातील सातारा, सांगली, बीड, नाशिक तसेच कर्नाटकातील पर्यटक गेले आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडमध्ये ढगफुटी होत आहे. त्यामुळे प्रमुख व अंतर्गत रस्ते वाहून गेले असून संपर्क तुटला आहे. या पर्यटकांना आता सध्या असलेल्या जिल्ह्यातून बाहेर पडणे मुश्कील झाले आहे. महाबळेश्वर तालुक्यातील झांजवड या गावातील कुटुंब अडकल्याची माहिती मिळताच प्रशासनाने व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याशी संपर्क साधला.
झांजवड गावातील सेवानिवृत्त शिक्षक संभाजी जाधव, आकाश जाधव, आशिष जाधव, नीलम जाधव, कल्पना जाधव व नियती जाधव असे कुटुंबातील एकूण सहा जण उत्तराखंडमधील सुरू असलेल्या ढगफुटीमध्ये अडकले आहेत. हे कुटुंब महाबळेश्वर येथून दि. २८ जून रोजी रवाना झाले होते. तेथून गंगोत्रीला जायचे. मात्र, अचानक ढगफुटीसदृश थरकाप उडवणारा पाऊस सुरू झाला. या पावसाचा जोर वाढतच गेला. त्यामध्ये प्रचंड हानी झाली. रस्ते वाहून गेले. त्यामुळे या कुटुंबासह अनेक पर्यटक यमुनोत्री येथे अडकून पडले. त्या ठिकाणाहून तेथील स्थानिक प्रशासनाने त्यांना मदतीचा हात दिला.
त्यांना सुमारे सहा किलोमीटर चालत एका डोंगरापर्यंत जावे लागले. तेथून त्यांना स्थानिक प्रशासनाने बरकोट या जिल्ह्याच्या ठिकाणी वाहनातून सुखरूप पोहोचविण्यात आल्याची माहिती अडकलेले पर्यटक आकाश जाधव यांनी दिली.
आकाश जाधव व कुटुंबीय अडकल्याची माहिती सातारा जिल्हा प्रशासन व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचली. त्यामुळे प्रशासन व उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या पर्यटकांशी संपर्क साधला. एकनाथ शिंदे यांनी आकाश जाधव यांच्याशी मोबाइलवरून संपर्क साधला. यावेळी जाधव यांनी आपण कुठे आहोत व तेथील काय परिस्थिती आहे याची सर्व माहिती दिली. यावर एकनाथ शिंदे यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांशी या विषयावर चर्चा केली जाईल. तसेच स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांमार्फत जिल्हावासीयांची तेथून सुटका केली जाईल, अशी ग्वाही दिली.
उत्तराखंडमधील यमुनोत्री परिसरात आम्ही अडकलो होतो. आमच्या कुटुंबातील एकूण सहा सदस्य आहेत. आम्हाला स्थानिक प्रशासनाकडून रेस्क्यू करून आता बरकोट या जिल्ह्याच्या ठिकाणी हलवले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी मोबाइलवरून संपर्क झाला आहे. त्याचबरोबर साताऱ्यातील जिल्हा प्रशासनही आमच्या संपर्कात आहे. इकडे भीतीचे वातावरण आहे. सध्या आम्ही मदतीची वाट पाहत आहोत. आमची येथून लवकर सुटका करावी.-आकाश जाधव, झांजवड