Aaditya Thackeray On Nagpur: सोमवारी रात्री नागपूरमध्ये तीव्र हिंसाचार झाला असून, महाल परिसरात दगडफेक, वाहनांची तोडफोड आजूबाजूच्या परिसरात जाळपोळ झाली आहे. या घटनेपासून शहरात तणावपूर्ण परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत नागपूर शहरातील अनेक भागांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेनंतर राज्य सरकारसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर विरोधकांनी जोरदार टीका सुरू केली आहे. अशात शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनी, भाजपा महाराष्ट्राला पुढचे मणिपूर करू इच्छित असल्याचे म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजपा महाराष्ट्राला पुढचे मणिपूर…

नागपूर हिंसाचार प्रकरणावर माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “नागपूरमध्ये हिंसाचाराच्या अफवा पसरत असताना मुख्यमंत्री कार्यालयाने प्रतिक्रिया का दिली नाही? जेव्हा जेव्हा अशी घटना घडणार असते तेव्हा पहिला अहवाल राज्याच्या मुख्यमंत्री आणि गृह विभागाकडे येतो. त्यांच्याकडे याबद्दल कोणतीही माहिती नव्हती का? मला वाटते की भाजपा महाराष्ट्राला पुढचे मणिपूर बनवू इच्छित आहे.”

आदित्य ठाकरेंनी पुढे म्हटले की, “जर तुम्ही मणिपूरकडे पाहिले तर, तिथे २०२३ पासून हिंसाचार सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. त्या राज्यात सर्वत्र संघर्ष सुरू आहेत. तिथे गुंतवणूक होईल का? पर्यटनात वाढ होईल का? नाही. भाजपा महाराष्ट्रावरही तीच परिस्थितीत आणू इच्छित आहे.”

भाजपाकडून देश विभागण्याचा प्रयत्न

मी आज वाचत होतो की, व्हिएतनाम हा भारतापेक्षा लहान देश आहे आणि लोकसंख्याही कमी आहे, परंतु त्यांचा इलेक्ट्रॉनिक उद्योग भारतापेक्षा ३ पट जास्त आहे. आपला देश स्वतःला बलवान मानतो, परंतु भाजपा देशाला जिल्ह्यांमध्ये, धर्मांमध्ये आणि जातींमध्ये विभागण्याचा प्रयत्न करत आहे,” असे आदित्य ठाकरे पुढे म्हणाले.

यापूर्वी कालही आदित्य ठाकरे यांनी,”राज्याची कायदा आणि सुव्यवस्था पूर्वी कधीही नव्हती इतकी ढासळली असून, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचे शहर असलेले नागपूर या परिस्थितीला तोंड देत आहे”, असे म्हटले होते.

मुख्यमंत्र्यांचे निवेदन

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत निवेदन देताना म्हटले होते की, “नागपूरमध्ये झालेला हिंसाचार एक सुनियोजित कट असल्याचे दिसते. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने निदर्शने केली तेव्हा धार्मिक साहित्य असलेल्या वस्तू जाळल्या गेल्याच्या अफवा पसरवण्यात आल्यानंतर हा हिंसाचार झाला.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aaditya thackeray bjp maharashtra nagpur violence manipur aam