Ind vs Pak Asia Cup Match: आशिया कप २०२५ मध्ये येत्या १४ सप्टेंबर रोजी भारत व पाकिस्तान यांच्यात टी-२० सामना रंगणार आहे. एकीकडे क्रिकेट चाहत्यांसाठी भारत व पाकिस्तान यांच्यातील सामना पर्वणी ठरत असताना यावेळी मात्र पहलगाम हल्ल्यामुळे पाकिस्तानबाबत मोठा रोष देशभरातून व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर आशिया कप स्पर्धेत भारतानं पाकिस्तानशी क्रिकेट सामना खेळू नये अशी मागणी राजकीय वर्तुळातून पुढे येत आहे. महाराष्ट्रात शिवसेना (ठाकरे गट) सामना खेळण्याविरोधात १४ तारखेलाच मोर्चा काढणार असून त्यात आता आदित्य ठाकरेंनी थेट भारतीय क्रिकेट बोर्ड व खेळाडूंना लक्ष्य केलं आहे.

भारत-पाकिस्तान सामन्याबाबत काय म्हणाले आदित्य ठाकरे?

आदित्य ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना सामना न खेळण्याची मागणी केली आहे. “ज्या पाकिस्ताननं आपल्या देशावर असंख्य हल्ले केले आहेत. दहशतवाद पसरवला आहे. पहलगाममध्ये ज्या पाकिस्तानने खूप सारे सिंदूर पुसून टाकले, त्या पाकिस्तानशी खेळण्यासाठी बीसीसीआय इतके उत्सुक का झाले आहे? हे पैशांसाठी आहे का? हे चॅनलचा फायदा, जाहिरातींमधून फायदा की खेळाडूंना मिळणाऱ्या मानधनासाठी आहे? एकीकडे पाकिस्ताननं हॉकीच्या आशिया चषकावर बहिष्कार टाकला कारण ते सामने भारतात होते, तर मग बीसीसीआय असा बहिष्कार का टाकू शकत नाही?” असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

भाजपानं विचारसरणी बदलली आहे – आदित्य ठाकरे

पाकिस्तानशी क्रिकेट खेळलं जात असताना भाजपा गप्प असल्यामुळे त्यांनी आपली विचारसरणीच बदलल्याची टीका आदित्य ठाकरेंनी यावेळी केली. “खरी भाजपा सत्तेत असती, तर हे झालं नसतं. भाजपानं आपली विचारसरणी बदलली आहे. ऑपरेशन सिंदूरचा वापर बिहारच्या राजकारणात होणार आहे. पहलगाम हल्ल्यामागे पाकिस्तान होतं हे आपण जगभरात सांगितलं आहे. पण त्याच पाकिस्तानशी बीसीसीआय खेळायला उत्सुक असताना सरकार मात्र गप्प बसलं असेल, तर हे दुर्दैवी आहे”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

“या सामन्यावर ब्रॉडकास्टर्सनंही बहिष्कार घालायला हवा. बीसीसीआय स्वार्थी बनत असली, तरी ब्रॉडकास्टर्सनं स्वार्थी बनू नये. बीसीसीआय देशविरोधी वागत आहे. आजसुद्धा आपले खेळाडू सामन्यावर बहिष्कार टाकू शकतात. जर पाकिस्तान आपल्या देशातल्या हॉकीच्या आशिया कप स्पर्धेवर बहिष्कार टाकू शकतं, तर मग क्रिकेटपटूंना काय गरज आहे तिथे जाऊन खेळायची? बीसीसीआय काय गरज आहे तिथे जायची? ते देशभक्त नाहीयेत का? जर पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही, तर मग क्रिकेट आणि रक्त एकत्र चालू शकतं का?” असा सवालही आदित्य ठाकरेंनी विचारला आहे.

“खेळाडूंनी ठरवावं त्यांच्यात किती देशभक्ती”

“बहिष्काराबाबत बोलणारे खेळाडू राष्ट्रभक्त आहेत. जे खेळणार आहेत त्यांनी विचार करायला हवा की त्यांच्यात किती देशभक्ती जागृत आहे”, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी भारतीय क्रिकेटपटूंना लक्ष्य केलं आहे.

रविवारी रंगणार भारत वि. पाकिस्तान सामना

दरम्यान, दुसरीकडे आशिया कप स्पर्धेत सलामीच्या सामन्यात भारतानं युएईला अवघ्या ५ ओव्हर्समध्ये पराभूत करत सर्वाधिक चेंडू शिल्लक राखून विजय मिळवला. त्यामुळे गुणतालिकेत अ गटात भारत सर्वात वरच्या स्थानी असून नेट रनरेटमध्येही अव्वल ठरला आहे. आता रविवारच्या सामन्याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे.