लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा १९ तारखेला पार पडतो आहे. भारतातल्या लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव हा १९ एप्रिल ते १ जून अशा सात टप्प्यांत पार पडणार आहे. या निवडणुकीत काय होतं याची उत्सुकता सगळ्यांना आहे. तसंच महाराष्ट्रात काय घडतं हे पाहणंही महत्त्वाचं ठरतं आहे. महाराष्ट्रात २०१९, २०२२, २०२३ या वर्षांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती आपण सगळ्यांनी पाहिलीच आहे. महाराष्ट्रातल्या बदललेल्या राजकीय स्थितीवर अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी भाष्य केलं आहे.

काय म्हणाले मकरंद अनासपुरे?

“राजकारणात जाण्याची इच्छा नसलेल्या एका माणसाला राजकारणात जावं लागतं त्यावर ‘राजकारण गेलं मिशीत’ हा सिनेमा येतो आहे. तसंच आपल्याला निवडणूक लढवायची झाली तर लोकांच्या मनात असेल तिथून लढवेन” असं मकरंद अनासपुरे यांनी म्हटलं आहे. तसंच माझे आवडते नेते नितीन गडकरी आहेत असंही मकरंद अनासपुरेंनी सांगितलं आहे.

हे पण वाचा- ‘राजकारण गेलं मिशीत’ १९ एप्रिलला चित्रपटगृहात

मकरंद अनासपुरेंना कोण आवडतं ठाकरे की पवार?

“ठाकरे आणि पवार ही दोन्ही घराणी बघत आलो आहे. त्यात डावं उजवं करण्यापेक्षा पवार घराणं हेच ठाकरे घराणं झाल्याने त्यांच्यात काही वेगळं करता येणार नाही आता. कारण ते दोघंही एकत्र झाले आहेत.” असं मकरंद अनासपुरेंनी म्हटलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत मकरंद अनासपुरेंनी हे वक्तव्य केलं आहे.

मतदारांची फसवणूक झाल्यासारखं वाटतं

मकरंद अनासपुरे यांना सध्याच्या राजकारणात सुरू असलेल्या घडामोडींबाबत विचारले असता त्यांनी परखड मत व्यक्त केलं आहे. “सध्या सुरू असलेला प्रकार हा आम्हा मतदारांची फसवणूक असल्यासारखे वाटतं, मतदान करताना तो उमेदवार, व्यक्ती पाहून मत दिले असते. आता, ज्याच्यावर विश्वास ठेवून मतदान केले असते त्या माणसाने कोलांटऊडी मारल्यानंतर फसवणूक झाल्यासारखं वाटते, तसंच भवितव्य हे आता तरुणाईच्या हाती आहे असंही अनासपुरेंनी म्हटलं आहे.