Sayaji Shinde Join Ajit Pawar NCP : विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडींना वेग आला आहे. पुढील काही दिवसांमध्ये निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांचे नेते जोरदार कामाला लागले आहेत. अनेक नेत्यांकडून मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरु असून सभा, मेळावे घेण्यात येत आहेत. यातच ऐन निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेते, एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत असल्याचंही पाहायला मिळत आहे. असे असतानाच आता अभिनेते सयाजी शिंदे यांनी आज (११ ऑक्टोबर) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज मुंबईत पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत अभिनेते सयाजी शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला. अभिनेते सयाजी शिंदे हे आता पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून काम करणार आहेत.

हेही वाचा : माणिकराव कोकाटेंची अजित पवारांना मोठी ऑफर; म्हणाले, “सिन्नरमधून…”…

अभिनेते सयाजी शिंदे यांनी हिंदी, मराठी तेलगू आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. तसेच ते गेल्या काही वर्षांपासून सामाजिक क्षेत्रातही कार्यरत होते. सयाजी शिंदे यांनी लाखो झाडे लावत सह्याद्री देवराई उभे केलेलं आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याची राज्यभरात चर्चाही झाली. मात्र, सामाजिक कार्यानंतर आता सयाजी शिंदे यांनी राजकारणात प्रवेश करत अजित पवारांच्या उपस्थितीत घड्याळ हाती बांधलं आहे.

या पक्ष प्रवेशावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी अभिनेते सयाजी शिंदे यांचं कौतुक केलं. भुजबळ म्हणाले, “आता उद्या दसरा आहे. पण आम्हाला आजच दसरा साजरा करण्याचं भाग्य लाभलं. खरं तर महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर सयाजी शिंदे यांनी आपल्या कामाने मोठा ठसा उमटवला आहे. त्यांनी मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य अशा विविध भाषेच्या चित्रपटांमध्ये अभिनय केला. ते अभिनेते आहेतच, पण आता ते नेते देखील झाले आहेत. सयाजी शिंदे यांनी सामाजिक क्षेत्रात मोठं काम केलं आहे. राज्यात ठिकठिकाणी वृक्षारोपण त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे”, असं म्हणत मंत्री छगन भुजबळ यांनी सयाजी शिंदे यांचं कौतुक केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor sayaji shindes join into ncp ajit pawar group in mumbai and maharashtra politics gkt