सांगली : मराठी रंगभूमीवर मानाचा समजले जाणारे विष्णुदास भावे गौरव पदक यावर्षी ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी यांना जाहीर झाले आहे. या पुरस्काराची घोषणा अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी शुक्रवारी सांगलीत केली. या गौरवपदकाचे स्वरूप गौरव पदक, रोख २५ हजार रूपये, स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ असे आहे. पाच नोव्हेंबरला रंगभूमी दिनी हे भावे पदक खास कार्यक्रमात प्रदान केले जाणार आहे.
नीना कुळकर्णी या एक नावाजलेल्या भारतीय अभिनेत्री, लेखिका, निर्माती आणि दिग्दर्शिका आहेत. मराठी, हिंदी आणि इंग्रजी रंगभूमीवर तसेच चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांमध्ये त्यांनी काम केले आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपट सृष्टीतही त्यांनी आपले बहुपरिमित आणि समृद्ध योगदान दिले आहे. १९५५ साली जन्मलेल्या नीना कुळकर्णी यांचे बालपण मुंबईत गेले. त्यांनी कॅनोसा कॉन्व्हेंट हायस्कूलमधून शिक्षण घेतले आणि पुढे एल्फिन्स्टन कॉलेजमधून फ्रेंच भाषेत पदवी प्राप्त केली.
त्यांचा कलात्मक प्रवास १९७० च्या दशकाच्या सुरुवातीला मॉडेलिंगपासून सुरू झाला.श्रीमती कुळकर्णी यांच्या अभिनय प्रवासाची सुरुवात व्यावसायिक मराठी नाटक ‘ गुंतता हृदय हे ‘ मधून झाली. पं. सत्यदेव दुबे यांच्यासारख्या महान रंगकर्मीच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आधे अधूरे, मायावी सरोवर, अबे बेवकूफ, आह, आणि एज्युकेटिंग रीटा यांसारख्या हिंदी प्रयोगशील नाटकांत अभिनय केला. ह्याच काळात त्यांची ओळख दिलीप कुळकर्णी यांच्याशी झाली. त्यांच्याशी त्यांचा विवाह झाला. १९७८ मध्ये डॉ. विजया मेहता यांनी त्यांना मराठी नाटक हमीदाबाईची कोठी मध्ये शब्बोची भूमिका दिली, त्यांनी महासागर, सावित्री, अकस्मात, ध्यानीमनी, सर्वस्वी तुझीच, वटवट सावित्री, आईचं घर उन्हात, देहभान, प्रेमपत्र, आणि असेन मी नसेन मी यांसारख्या नाटकांत उल्लेखनीय भूमिका केल्या.
दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी महासागर नाटकाची पुनर्निर्मिती केली तसेच डॉक्टर तुम्ही सुद्धा आणि त्याची हिंदी आवृत्ती डॉक्टर आप भी यासारखी नाटके दिग्दर्शित केलीत. दिलीप कुळकर्णी दिग्दर्शित नागमंडल, मातीच्या गाड्याचं प्रकरण, आणि अखेरचे पर्व यांसारख्या अर्धप्रयोगात्मक नाटकांमधील त्यांचे अभिनयही खूप गाजले.
इंग्रजी रंगभूमीवर त्यांनी एज्युकेटिंग रीटा, महात्मा व्हर्सेस गांधी, आणि वेडिंग अल्बम यांसारख्या नाटकांत भूमिका साकारल्या. सध्या त्या सांगीतिक नाटक गौहर मध्ये मालिका ए जान आणि वृद्ध गौहर जान या दुहेरी भूमिका साकारत असून, प्रेक्षकांकडून त्यांना मोठा प्रतिसाद मिळतो आहे.
त्यांच्या सवत माझी मुलगी या चित्रपटासाठी त्यांना महाराष्ट्र राज्य पुरस्काराने गौरवण्यात आले, तसेच सरीवर सरी मधील भूमिकेसाठी त्यांना उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. महेश मांजरेकर दिग्दर्शित आई या चित्रपटातील त्यांच्या प्रमुख भूमिकेसाठी त्यांची समीक्षकांकडून वाहवा मिळाली आणि हा चित्रपट यशस्वीही ठरला. २००५-०६ साली त्यांनी शेवरी या चित्रपटाची निर्मिती केली आणि अभिनयही केला. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार आणि पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यामध्ये पुरस्कार मिळाले.
त्यांना बायोस्कोप आणि मोगरा फुलला यासाठी फिल्मफेअर मराठी पुरस्कार मिळाले, तर फोटो प्रेम साठी समीक्षकांचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही प्राप्त झाला. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी दायारा, दाग द फायर, पुरुष, नायक, गुरु, पहेली, हंगामा, रंग, भूतनाथ, फिर भी दिल है हिंदुस्तानी, इंटरर्र, मेरे यार की शादी है, हसी तो फसी, आणि घायल वन्स अगेन’ यांसारख्या चित्रपटांत विविध भूमिका साकारल्या.
दूरदर्शनवर त्यांनी ’ये है मोहब्बतें ‘ या स्टार प्लसवरील सात वर्षे चाललेल्या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली होती. मराठी मालिकांमध्ये त्यांनी स्वराज्य जननी जिजामाता मध्ये जिजामाता आणि सध्या ’येडं लागलं प्रेमाचं मध्ये जिजी या भूमिका साकारल्या. चाळ नावाची वाचाळ वस्ती, साळसूद, नायक, अंक अजूबे, आणि अडोस पडोस या दूरदर्शनवरील जुन्या मालिकांमधूनही त्यांचे योगदान उल्लेखनीय राहिले आहे. अलीकडच्या काळात त्यांच्या कुळकर्णी चौकात देशपांडे, पाँडिचेरी, आणि मिडियम स्पायसी या चित्रपटातील भूमिका वेगळी ओळख निर्माण करणार्या ठरल्या.
अभिनयापलीकडे नीना कुळकर्णी या एक प्रतिभावंत लेखिका देखील आहेत. त्यांनी अंतरंग या लोकप्रिय मराठी स्तंभातून ‘ लोकसत्ता’ मधून लेखन केले. ज्याचे पुढे पुस्तक झाले.
आपल्या बहुआयामी आणि प्रदीर्घ कारकिर्दीत नीना कुळकर्णी यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार, फिल्मफेअर मराठी पुरस्कार, नाट्यदर्पण, आणि नाट्य परिषद यांसारखे अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत. २०२५ मध्ये त्यांना अखिल भारतीय नाट्य परिषद कडून सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार आणि जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झाला.